आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Monsoon Updates: Meteorological Department, Skymet Comment On Monsoon; News And Live Updates

मान्सून केरळात दाखल!:स्कायमेटचा दावा - मान्सून दाखल, सर्व निकषही पूर्ण; हवामान विभाग - निकष अपुरे, 3 जूनपर्यंत आगमन

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वीलेखक: अनिरुद्ध शर्मा
  • कॉपी लिंक
  • मान्सूनचे आगमन झाले असले तरी पाऊस अजून दमदार नाही, असे स्कायमेटने म्हटले आहे

दाट काळे ढग दक्षिण किनारपट्टीवर आकाशात दाटी करू लागले तशी मान्सून अर्थात मोसमी पावसाची चाहूल लागली आहे. दरम्यान, केरळमध्ये दोन दिवसांपासून पाऊस सुरू असून मान्सूनच्या आगमनाच्या निकषांआधारे हवामानविषयक अंदाज वर्तवणारी खासगी संस्था स्कायमेटने रविवारी दुपारी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा केली. मात्र, भारतीय हवामान विभागाने याला दुजोरा दिलेला नाही. किनारपट्टीवर सध्या पूर्वमोसमी पाऊस सुरू असून मान्सून ३ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

देशाच्या इतर भागांत मान्सूनच्या वाटचालीबाबत हवामान विभागाने म्हटले आहे की, मान्सून त्याच्या अंदाजित वेळापत्रकाच्या दोन-चार दिवस मागे-पुढे या भागांत दाखल होऊ शकतो. केरळमध्ये साधारणपणे १ जून रोजी मान्सून दाखल होतो. या वेळी स्कायमेटने ३० मे रोजीच मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. तर हवामान विभागाने ३१ मे अशी तारीख दिली होती. यापूर्वी अंदमान-निकोबार बेटांवर मान्सून २१ मे राेजीच दाखल झाला आहे. बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरात मान्सूनची वाटचाल सामान्य होती व तो वेगाने पुढे सरकत होता. मात्र, श्रीलंकेचा दोन तृतीयांश भाग आणि मालदीव व्यापल्यानंतर तीन-चार दिवसांपासून मान्सून उत्तर सीमेवर एकाच ठिकाणी रेंगाळला आहे.

अंदाज व दाखल झालेला दिवस
वर्ष अंदाज तारीख
२०१६ ७ जून ८ जून
२०१७ ३० मे ३० मे
२०१८ २९ मे २९ मे
२०१९ ६ जून ८ जून
२०२० ५ जून १ जून

म्हणून मान्सूनबद्दल साशंक
मान्सूनचे आगमन झाले असले तरी पाऊस अजून दमदार नाही, असे स्कायमेटने म्हटले आहे. नेमक्या या मुद्द्याच्या अनुषंगाने हवामान विभागाने केलेल्या याबद्दलच्या विश्लेषणातून मान्सून अजून दाखल झाला नसल्याच्या दाव्याला पुष्टी मिळू शकते. ३० मे ते ३ जून या काळात केरळ किनारपट्टीसह राज्यात पावसाचे प्रमाण वाढत जाईल आणि ३ जून रोजी तो खऱ्या अर्थाने दाखल होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. रविवारी सकाळी हवामान विभागाने मान्सून ३१ मे रोजी दाखल होईल, असे सांगितले होते. परंतु, नंतर हा अंदाज फिरवून ३ जून करण्यात आला.

अजून निकष पूर्ण नाहीत : हवामान विभाग
हवामान विभागाने म्हटले आहे की, मान्सूनच्या आगमनासाठी ३ जूनला सर्व स्थिती अनुकूल असेल तरच तो केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, १० मेनंतर अरबी समुद्रातून तौक्ते वादळाचा प्रवास झाला तेव्हा लक्षद्वीप, केरळ, कर्नाटकाच्या किनारपट्टीवरील भागांत २.५ मिलिमीटरपेक्षा १००-१५० पट जास्त (२०-३० सेमी) पावसाची नोंद झाली होती. रॅडिएशनही खूप खाली आले होते.

या स्थितीत केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची घोषणा करायला हवी होती का? तौक्ते वादळाच्या वेळी वाऱ्याची दिशा वारंवार बदलत होती. या वेळी केरळ व कर्नाटकात पूर्वमोसमी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला हे खरे आहे. मात्र सध्या त्याचा जोर आेसरला आहे. म्हणून मान्सूनसाठी आवश्यक निकष पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागेल. १ जूनपासून केरळमध्ये पावसाच्या हालचाली वाढतील असा अंदाज आहे. वारे वेगाने वाहू लागतील तेव्हा ३ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो.

सर्व निकष पूर्ण : स्कायमेट
स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पलावत म्हणाले, मान्सूनच्या वाटचालीचे सर्व निकष पूर्ण हाेत आहेत. एक म्हणजे केरळ, लक्षद्वीप आणि कर्नाटकातील १४ हवामान केंद्रांपैकी ६० टक्क्यांमध्ये १० मेनंतर दोन दिवस २.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दुसरे, पृष्ठभागापासून तीन-चार किलोमीटरपर्यंत पश्चिम वारे वाहू लागले. तिसरे, हवेचा वेग ताशी ३०-३५ किमी होता. ढगांची जाडी इतकी जास्त असावी की परतणारे रेडिएशन २०० वॅट चौरस मीटरपेक्षा कमी असावे, हा चौथा निकषही यात पूर्ण होतो. म्हणून मान्सून दाखल झाला, असे म्हणता येईल.

बातम्या आणखी आहेत...