आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाशी लढा:नववर्षाच्या सुरुवातीस भारतात एकापेक्षा जास्त कोरोना लसी! - आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा दावा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन लाख एएनएम, 9 लाख आशा कार्यकर्त्यांसह 12 लाखांवर अंगणवाडी सेविका घरोघरी पोहोचवतील लस

जानेवारी २०२१ पर्यंत भारतात एकापेक्षा जास्त कंपन्यांच्या कोरोना लसी असतील, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंगळवारी मंत्रिसमूहाच्या बैठकीत दिली. बैठकीत लसीची उपलब्धता व वितरण धोरणावरही चर्चा झाली. हर्षवर्धन म्हणाले, ‘जुलै २०२१ पर्यंत देशातील २०-२५ कोटी लाेकांचे लसीकरणही झालेले असेल. प्राधान्यक्रमाच्या लोकांना आधी लस मिळावी म्हणून तज्ज्ञ वेगाने वितरणाच्या कार्ययोजनेवर काम करताहेत. जगात विशेषकरून अमेरिकेत लसीचे वितरण कसे होईल, याचीही माहिती घेतली जात आहे. तज्ज्ञांची टीम त्यावर लक्ष ठेवून आहे.’

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, ‘सध्या लसीच्या किमतीबाबत काही सांगितले जाऊ शकत नाही. अनेक कंपन्या लसीच्या क्लिनिकल ट्रायल घेत आहेत. एकापेक्षा जास्त कंपन्यांच्या लसी भारतात आल्यास दुहेरी फायदा होईल. पहिला- लसीची टंचाई नसेल आणि दुसरा- किंमतही कमी असेल.’

२५ लसी दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यात : जगात सध्या कोरोनावरील २०० लसी तयार करण्यात येत आहेत. ९२ लसी या प्री-क्लिनिकल ट्रायल व ४४ मानवी चाचण्यांच्या टप्प्यात आहेत. २५ लसी चाचण्यांच्या दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यात आहेत. पैकी ३ भारतात आहेत. त्यात भारत बायोटेक, झायडस कॅडिला आणि ऑक्सफर्ड-सीरम इन्स्टिट्यूटच्या लसीचा समावेश आहे.

तयारीचा आराखडा / संपूर्ण भारतात कोरोनावरील लसीच्या वितरणासाठी केंद्र सरकारने खास व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन समिती बनवली आहे. या समितीचे सर्व ग्रुप तयार करण्यात आले आहेत. ही समिती आणि ग्रुपमध्ये वितरणाच्या तयारीबाबत सातत्याने चर्चा करण्यात येत आहे. तसेच कुठल्या वयोगटास प्राधान्य द्याल, अशी विचारणा राज्य सरकारांकडे करण्यात आली आहे. या जय्यत तयारीचा हा आढावा...

गावागावांत अशी पोहोचवली जाणार लस
- नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये वापरण्यात येणाऱ्या कोल्ड चेनशिवाय (शीतसाखळी) लस देणाऱ्या खासगी कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली आहे. म्हणजेच या कामात खासगी कंपन्यांचीही मदत घेतली जाणार आहे.
{व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन समितीचे प्रमुख डॉ. व्ही.के. पॉल यांनी सांगितले, उपलब्ध संसाधनांशिवाय आणखी गरज भासेल. याचे आकलन करून तयारी सुरू आहे.
- भारतात अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत लस पोहोचण्यात अडचण येणार नाही. कारण अनेक वर्षांपासून देशात लसीकरण सुरू असल्याचा दावा डॉ. पॉल यांनी केला आहे.
- प्रत्येक कोल्ड सेंटरवर किती लसी आहेत हे रिअल टाइम कंट्रोल रूममधून जाणण्यासाठी इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क (ई-विन) मजबूत केले जात आहे.

सिरिंजचे उत्पादन वाढवण्याचे निर्देश
- भारतात जुलै २०२१ पर्यंत २५ कोटी नागरिकांना कोरोनावरील लस देण्याची तयारी केली जात आहे. प्रत्येक व्यक्तीला दोन डोस देण्यासाठी ५० कोटी सिरिंजची आवश्यकता असेल.
- देशात दरवर्षी ०.५ मिलीच्या १०० कोटी सिरिंज तयार केल्या जातात. जून २०२१ पर्यंत अशा सिरिंजचे उत्पादन १४० कोटी करण्यासाठी उत्पादकांसोबत बैठका घेतल्या जात आहेत.
- सक्षम उत्पादन साखळीमुळे भारत सिरिंजच्या बाबतीत इतर देशांच्या गरजाही पूर्ण करू शकतो. यामुळे कोरोनाकाळात निर्यात रोखणे शक्य नाही. उत्पादन वाढवणे हाच उपाय आहे.
- देशभरात आजमितीस २ लाख एएनएम (ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी), ९ लाख आशा कार्यकर्त्या आणि सुमारे १२ लाखांवर अंगणवाडी सेविका आहेत. कोरोनावरील लसीकरणासाठी केंद्र सरकार यांचीच मदत घेणार आहे.

दररोजच्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घसरण कायम
देशात राेज आढळणाऱ्या काेराेना रुग्णांच्या संख्येत घसरण सुरू आहे. महिन्याच्या सुरुवातीस ८५ हजारांवर नवे रुग्ण येत होते. आता ते ५५ ते ६० हजारांवर आले आहेत. यामुळे कोरोना संसर्ग घटत असल्याचे समजले जात आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, दर १०० चाचण्यांत आता ६ पेक्षा कमी रुग्ण आढळत आहेत. यामुळे नव्या रुग्णांची संख्या घटली आहे. याचप्रमाणे सक्रिय रुग्णांतही ४ आठवड्यांपासून घसरण होत आहे. या कालावधीत सक्रिय रुग्णांच्या संख्येत सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त घट झाली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser