आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:कोरोनापाठोपाठ म्यूकरमायकोसिस रुग्णसंख्येत राज्यात लक्षणीय घट, आतापर्यंत 1203 मृत्यू

नाशिक / नीलेश अमृतकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनापाठोपाठ राज्यात म्यूकरमायकोसिस रुग्णांच्या संख्येतही घट होत आहे. गेल्या वर्षभरात सुमारे १० हजार जणांना म्यूकरमायकोसिस आजाराने ग्रासले होते. मात्र रग्णसंख्या नियंत्रणात आली असून सध्या २,३९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात या आजाराने आतापर्यंत १२०३ मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार दिसून आली आहे. एकूण ९,७२२ रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात काेराेना रुग्णसंख्या नियंत्रणात येऊन आटाेक्यात येत असतानाच आराेग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास साेडला. मात्र, त्याच वेळी अचानक जादा दिवस आॅक्सिजनवर राहिलेल्या व उच्च दर्जाच्या अँटिबायाेटिक आैषधांचा जादा मारा झालेल्या रुग्णांना म्यूकरमायकाेसिस (काळी बुरशी) या आजाराची लक्षणे आढळून आली. यामध्ये लहान मुलांपासून ते वयाेवृद्ध मधुमेह, रक्तदाब असणाऱ्या रुग्णांचा समावेश हाेता. या आजाराची लक्षणे दिसू लागताच त्यावर शस्त्रक्रिया हाच उपाय असल्याने व त्यानंतर ‘अॅम्फोटेरिसिन बी’ नावाचे किमान ७० ते १०० इंजेक्शन द्यावे लागत हाेते. साधारणत: एका रुग्णाला किमान आठ ते दहा लाखांचा खर्च खासगी रुग्णालयात करावा लागत हाेता. या रुग्णाची संख्या राज्यभरात हजाराच्या घरात पाेहोचल्यावर तातडीने राज्य शासनाने या आजारावरील उपचार महात्मा फुले जीवनदायी याेजनेत समाविष्ट केले. परंतु, सरकारी रुग्णालयात पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने खासगीतच बहुतांशी रुग्णांना उपचार घ्यावे लागत असल्याचे चित्र हाेते.

राज्यात सर्वाधिक १७६ मृत्यू पुण्यात
म्यूकरमायकाेसिची राज्यभरात २ आॅगस्टपर्यंतच्या रुग्णसंख्येचा आढावा घेतला असता सुमारे ९ हजार ७२२ रुग्णांना काेविडनंतर या आजाराची लागण झाली. त्यापैकी सद्य:स्थितीत २ हजार ३,९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात (१५३१) आढळून आले असून त्यात ८७४ रुग्ण बरे झाले, तर १५५ रुग्णांचा मृत्यू झाला. तशीच परिस्थिती पुणे जिल्ह्यात १३०८ रुग्णांपैकी ७७८ बरे झाले असून १७६ रुग्णांचा मृत्यू व त्यापाठाेपाठ आैरंगाबाद जिल्ह्यात १ हजार ९२ रुग्णांपैकी ७४३ बरे झाले असून १०४ रुग्णांचा व त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यात ७३६ रुग्णांपैकी ५९५ रुग्ण बरे झाले असून ७९ रुग्णांचा मृत्यू झाला.

जून महिन्यात सर्वाधिक रुग्णसंख्या
काेराेनाचा प्रादुर्भाव मे महिन्याच्या शेवटी नियंत्रणात येत असतानाच पाेस्ट काेविड म्यूकरमायकाेसिस आजाराने डाेके वर काढले. जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ हाेऊन या कालावधीत रुग्णसंख्या ७ हजारांच्या घरात पाेहोचून ४३०० हून अधिक सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू हाेते. ५८० रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला हाेता. यामध्ये बहुतांश रुग्णांचे डाेळे, नाक, दात, जबडा, टाळूचा भाग शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकावा लागला हाेता. काही रुग्णांच्या थेट मेंदूपर्यंत ही बुरशी गेल्याने त्यांचा अचानक मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...