आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mumbai Ahmedabad Highway Dangerous, Gadkari's Confession, Latest News And Update

मुंबई-अहमदाबाद हायवे धोकादायक, गडकरींची कबुली:म्हणाले - जड वाहतुकीमुळे अपघाताचा धोका जास्त, येथेच गेला सायरस मिस्त्रींचा बळी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका अपघातात बळी गेला. आता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः हा महामार्ग धोकादायक असल्याचे मान्य केले आहे. सायरस यांची कार ओव्हरटेक करण्याच्या नादात सूर्या नदीच्या पुलावरील दुभाजकाला धडकली होती. गडकरी सोमवारी म्हणाले -'अहमदाबाद-मुंबई एक्सप्रेस वेवर ट्रॅफिक व्हॉल्यूम 1 लाख 25 हजार प्रवाशी कार यूनिट (पीसीयू) आहे. त्यामुळे त्यावर ड्रायव्हिंग करताना अपघात होण्याची शक्यता खूप जास्त आहे.'

'20 हजार किंवा त्याहून अधिक पीसीयूची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी 6 पदरी रस्त्यांची गरज असते. गडकरींनी सायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूवरही दुःख व्यक्त केले. कार चालवताना सीट बेल्ट न लावणे चुकीचे आहे. कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या लोकांसाठी सीट बेल्ट लावणे तेवढेच गरजेचे आहे, जेवढे समोरच्या सीटवर बसलेल्या लोकांसाठी आवश्यक आहे,' असे गडकरी आयएए वर्ल्ड समिटमध्ये बोलताना म्हणाले. कार अपघातात बळी गेलेल्या सायरस मिस्त्रींनी सीट बेल्ट लावला नव्हता.

गडकरी म्हणाले - 4 सीएमच्या कारमध्ये सीट बेल्टच्या जागी क्लिप होती

गडकरींनी यावेळी कारमधील सीट बेल्टसंबंधी 4 मुख्यमंत्र्यांचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले - 'काही काळापूर्वी मी 4 मुख्यमंत्र्यांच्या गाडीत बसलो. त्या सर्वांच्या गाडीच्या फ्रंट सीटवर सीट बेल्ट लावण्याच्या ठिकाणी (सॉकेट) क्लिप लावण्यात आली होती. मी त्यावर आक्षेप घेतला असता त्यांनी इशारा अलार्म वाजू नये यासाठी ती क्लिप लावल्याचे सांगितले. त्यावर मी चालकाला झापले व क्लिप काढून टाकण्यास सांगितले.'

गडकरी म्हणाले - तरुणपणात मी स्वतः नियमांचे उल्लंघन करत होतो

मुलाखतीत गडकरींनी आपल्या तरुणपणाचाही किस्सा सांगितला. ते म्हणाले - 'तरुणीपणी मी स्वतः नियमांचे उल्लंघन करत होतो. तेव्हा वाहन चालवणे एवढे धोकादायक आहे याची जाणीव नव्हती. निवडणुकीच्या वेळी आम्ही एका स्कुटरवरून 4 जण फिरत होतो. दंड लागू नये यासाठी नंबर प्लेट हाताने झाकत होतो. ही तेव्हाची गोष्ट होती. पण आता लोकांना आपली मानसिकता बदलावी लागेल. नियमांचे पालन करावे लागेल.'

सीट बेल्ट न लावल्यामुळे देशात दररोज 41 बळी

सरकारने 1 जुलै 2019 पासून कार कंपन्यांना सीट बेल्ट रिमायंडर (अलार्म) लावणे अनिवार्य केले आहे. पण ते केवळ समोरच्याच सीटसाठी आहे. हा नियम आता मागच्या सीटसाठीही आवश्यक आहे. सीट बेल्ट न लावल्यामुळे 2020 मध्ये देशात 15,146 जणांचा बळी गेला. म्हणजे दररोज 41 मृत्यू झाले. रस्ते अपघातांमुळे दरवर्षी दीड लाखांहून अधिक जणांचा बळी गेला.

2024 पर्यंत रस्ते अपघात 50% कमी करण्याचे उद्दीष्ट

'सरकारने 2024 पर्यंत रस्ते अपघात 50 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षा मापदंडांचे पालन केले जाईल. गडकरींनी 6 ऐवजी 4 एअरबॅग्ज देणाऱ्या कार कंपन्यांनाही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कार कंपन्या दुसऱ्या देशांत कारची निर्यात करताना 6 एअरबॅग्ज देतात. पण भारतात विक्री करताना केवळ 4 एअरबॅग्जच देतात. त्यांच्यासाठी भारतीयांचा जीव महत्वाचा नाही काय,' असे गडकरी म्हणाले.

'6 एअरबॅग्ज लावल्यामुळे कारची किंमत 50-60 हजारांनी वाढणार नाही. मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले तर एका एअरबॅगची किंमत केवळ 900 रुपये पडेल,' असे गडकरी म्हणाले. भारतातही 6 एअरबॅग्ज असणारी वाहने बाजारात आणण्याचे काम सुरू असल्याचेही गडकरींनी यावेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...