आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमचे लोकेशन पाकमध्ये दिसेल, पण धमाका मुंबईत होईल:26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी; मुंबई पोलिसांना मिळाला मेसेज

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला आला धमकीचा मेसेज

मुंबईत 26/11 सारखा भयावह हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांना शुक्रवारी रात्री पाकिस्तानच्या एका क्रमांकावरून यासंबंधीचा एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज मिळाला आहे. त्यात मुंबईत धमाका करण्याचा व यासाठी भारतात 6 जण कार्यरत असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

मेसेजमध्ये उदयपूर हत्याकांडाचाही उल्लेख आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी धमकीचा मेसेज मिळाल्याची पुष्टी केली आहे. 'नियंत्रण कक्षाच्या मोबाइल क्रमांकावर टेरर मेसेज मिळाला आहे. त्यात मुंबईला उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मेसेजमध्ये अजमल कसाब व अल जवाहिरीचाही उल्लेख आहे. त्या व्यक्तीने भारतातील काही जणांचाही या कटात समावेश असल्याचा दावा केला आहे. मेसेज पाकिस्तानातून आला आहे. तपासात नाव, पत्ता व क्रमांक स्पष्ट होईल,' असे ते म्हणाले.

ATS ची मदत घेणार

आयुक्तांनी मुंबई पोलिसांनी ही धमकी सहजपणे घेतली नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले - 'या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानतंर हे प्रकरण गुन्हे शाखेला सोपवण्यात येईल. आम्ही तपासात एटीएस, क्राइम ब्रँचसह दुसऱ्या यंत्रणांचीही मदत घेणार आहोत.'

मुंबई पोलिसांना व्हॉट्सअॅपवर हा मेसेज मिळाला
मुंबई पोलिसांना व्हॉट्सअॅपवर हा मेसेज मिळाला

काय म्हणाला धमकी देणारा?

'आम्ही मुंबईला पुन्हा एकदा उडवण्याची तयारी केली आहे. यावेळीही 26/11 सारखा हल्ला केला जाईल. मी पाकिस्तानातून बोलत आहे. तुमचे काही भारतीयही आमच्यासोबत आहेत. त्यांचीही मुंबईला उडवण्याची इच्छा आहे. या हल्ल्यामुळे 26/11 हल्ल्याच्या स्मृती ताज्य होतील. ही धमकी नाही याची प्रचिती तुम्हाला लवकरच येईल.'

'माझे लोकेशन पाकमध्ये ट्रेस होईल. पण काम मुंबईत होईल. आमचा कोणताही ठिकाणा नसतो. त्यामुळे लोकेशन तुम्हाला आऊट ऑफ कंट्री ट्रेस होईल. उदयपूरसारखा शीर धडावेगळे करण्याचाही हल्ला होऊ शकतो,' असे मेसेज करणाऱ्याने म्हटले आहे.

धमकीला गांभीर्याने घ्या -अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला ही धमकी गांभीर्याने घेण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले - 'यापूर्वीही अशा प्रकारच्या अनेक धमक्या मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यामुळे सरकारने या धमकीकडे गांभीर्याने पहावे.'

'अशी प्रकरणे हाताळण्यासाठी राज्याची पोलिस यंत्रणा सक्षम आहे. मात्र, केंद्रीय तपास यंत्रणांनीही या धमकीकडे लक्ष द्यायला हवे. या धमकीमागे कोणती शक्ती आहे? सध्या जगात हिंसेच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे धमकीमागे अतिरेकी संघटना आहे का? याचा तपास करायला हवा. राज्य तसेच केंद्र सरकार गांभीर्याने हे प्रकरण हाताळेल अशी अपेक्षा आहे,' असे पवार म्हणाले.

रायगडमध्ये आढळली होती संशयास्पद बोट

उल्लेखनीय बाब म्हणजे 2 दिवसांपूर्वीच रायगड जिल्ह्यात बोटीवर शस्त्रसाठा आढळून आला होता. यात 3 रायफलींसह काडतुसांच्या काही बॉक्सचा समावेश होता. त्यानंतर लगेचच हा धमकीचा मेसेज प्राप्त झाल्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी कान टवकारलेत.

हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी ही संशयास्पद बोट आढळून आली होती. या घटनेनंतर रायगड, मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच महत्त्वाच्या शहरांत हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.

फडणवीसांनी दिले होते स्पष्टीकरण

रायगडमधील संशयास्पद बोटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले होते. ते म्हणाले होते -रायगडच्या हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर एक बोट दुर्घटना झालेल्या स्थितीत सापडली आहे. या बोटीत 3 AK-47सह काही काडतुसे सापडली आहेत. या बोटीचे नाव लेडी हान आहे. ही बोट एका ऑस्ट्रेलियन महिलेची असून, तिचा कॅप्टन या महिलेचा पती आहे.

बोट मस्कतहून युरोपला जात होती. 26 जून रोजी या बोटीचे इंजिन निकामी झाल्यामुळे एका कोरियन युद्धनौकेने त्यांना मदत केली. त्याना ओमानला सुपूर्द केले. समुद्र खवळलेला असल्यामुळे बोट टोइंग करता आली नाही. त्यामुळे ती भरकट हरिहरेश्वरच्या किनाऱ्याला लागली.

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यात 237 जण झाले होते ठार

26 नोव्हेंबर 2008 रोजी रात्री पाकच्या लश्कर ए तोयबा या अतिरेकी संघटनेचे 10 अतिरेकी भारतात शिरले होते. 2 अतिरेक्यांनी दक्षिण मुंबईतील कुलाबा स्थित लियोपोल्ड कॅफेवर हल्ला केला. तर 2 अतिरेक्यांनी नरिमन हाऊस व उर्वरित अतिरेक्यांनी प्रत्येकी 2 च्या गटाने छत्रपती शिवाजी टर्मिनस, हॉटेल ट्रायडेंट ओबेरॉय व ताज हॉटेलवर हल्ला केला. त्यांनी जवळपास 4 दिवस हॉटेल ताज ओलीस ठेवले होते. यामुळे अवघ्या देशाचा श्वास कंठाशी आला होता.

या हल्ल्यात जवळपास 237 जण ठार, तर 300 जण जखमी झाले होते. हा देशावरील सर्वात भयावह अतिरेकी हल्ला होता.

बातम्या आणखी आहेत...