आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमेने बदलली चाल:हत्येचा कट, तृणमूलचा आरोप; गांभीर्याने तपास व्हावा : भाजप

कोलकाताएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
पायांना प्लास्टर, व्हिडिआे जारी करून शांततेचे आवाहन - Divya Marathi
पायांना प्लास्टर, व्हिडिआे जारी करून शांततेचे आवाहन
  • नंदीग्राममध्ये ममतांना इजा झाल्याने निदर्शने, संघर्षाला सुरुवात

ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये बुधवारी पायाला इजा झाल्यानंतर पश्चिम बंगालमधील राजकीय ज्वर वाढलाय. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, निदर्शने, संघर्षाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी तृणमूलचे नेते डेरेक आेब्रायन, राज्यमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य, पार्थ चटर्जी यांनी प्रकरणाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली. ममतांच्या हत्येचा कट होता, असा आरोप या नेत्यांनी केला. भाजपनेदेखील निवडणूक आयोगाकडे याप्रकरणी गांभीर्याने चौकशी करण्याची मागणी केली. या घटनेनंतर राज्यातील निवडणुकीसंबंधीची चाल बदलल्याचे दिसून आले.

कोलकाताच्या रुग्णालयात दाखल ममतांनी यादरम्यान समर्थकांसाठी एक व्हिडिआे संदेश जारी केला. शांतता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले. मला धक्का देण्यात आला. त्यामुळे माझ्या पायाला दुखापत झाली आहे. रात्री मला ताप व डोकेदुखी होती, परंतु नियोजित बैठकांना सोडणार नाही. व्हीलचेअरवरून प्रचार करणार आहे, असे ममतांनी सांगितले. तृणमूलचे खासदार डेरेक आेब्रायन म्हणाले, ९ मार्च रोजी निवडणूक आयोगाने डीजीपी बदलला. १० मार्च रोजी भाजप खासदार दिलीप घोष यांनी एक पोस्ट केली होती. पाच वाजेनंतर काय होणार आहे? असे ते विचारतात आणि सहा वाजता ममतादीदींवर हल्ला होतो. आम्ही या घटनेचा निषेध करतो.

आता किसान मोर्चाही मैदानात, १३ रोजी महापंचायत
पश्चिम बंगालच्या निवडणूक मैदानात आता संयुक्त किसान मोर्चानेही उडी घेतली आहे. मोर्चाने नंदीग्राममध्ये १३ मार्चला किसान महापंचायत आयोजित केली आहे. त्यानंतर १४ रोजी सिंगूरला महापंचायत होणार आहे. मोर्चा कोलकाता प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदेत रणनीती जाहीर करणार आहे. त्यानंतर दुपारी गांधी पुतळ्यापासून रामलीला पार्कपर्यंत वाहन रॅली काढली जाणार आहे. त्यानंतर मजूर महापंचायत होणार आहे.

काळ्या कपड्यांनी चेहरा झाकून तृणमूल निषेध करणार
ममतांवरील हल्ल्याच्या विरोधात राज्यात निदर्शने सुरू झाली आहेत. ममता सरकारमधील मंत्री पार्थ चटर्जी म्हणाले, शुक्रवारी दुपारी ३ ते ५ पर्यंत नंदीग्राममध्ये झालेल्या घटनेच्या विरोधात आम्ही काळे झेंडे दाखवणार आहोत. काळ्या कपड्यांनी चेहरा झाकून मौन निदर्शने करणार आहोत. भाजप नेते सत्यपाल सिंह म्हणाले, पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांना विश्वास नसल्यास प्रकरण सीबीआयकडे सोपवावे.

तृणमूल घटनेचे राजकारण करतेय : विजयवर्गीय
भाजपचे पश्चिम बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय गुरुवारी म्हणाले, तृणमूल या घटनेचे राजकारण करत आहे. अशा घटनांचे राजकारण होता कामा नये. निवडणूक आयोग पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचार रोखण्यासाठी पुरेसे सुरक्षा दल पाठवेल, अशी आमची अपेक्षा आहे. याआधी भाजपसह काँग्रेसच्या नेत्यांनीही ममतांची दुखापत म्हणजे निवडणुकीत ‘नौटंकी’ असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...