आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराईशान्य भारतातील 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जारी झालेत. भाजपला त्रिपुरात सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यात यश आले आहे. तर नागालँड व मेघालयमध्ये ते आघाडी सरकार स्थापन करणार आहेत. या निवडणुकीत काही धक्कादायक घटनाही घडल्यात. त्रिपुरात भाजपला बहुमत मिळाले. पण राज्याचे उपमुख्यमंत्री जिष्णु देव वर्मा यांना पराभवाची चव चाखावी लागली. दुसरीकडे, नागालँडमध्ये 60 वर्षांत प्रथमच एक महिला विधानसभेत पोहोचली आहे. चला तर मग पाहूया या निवडणुकीतील 10 धक्कादायक फॅक्ट्स...
1- त्रिपुरात भाजपचा जय, डेप्युटी CM चा पराजय
त्रिपुरात भाजपला सत्तेत पुनरागमन करण्यात यश आले. 60 सदस्यीय त्रिपुरा विधानसभेत भाजपला सर्वाधिक 33 जागा मिळाल्या. या निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का चारीलाम विधानसभा मतदार संघात बसला. येथे पक्षाने उपमुख्यमंत्री व दिग्गज भाजप नेते जिष्णु देव वर्मा यांना मैदानात उतरवले होते. पण त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. टिपरा मोथाचे सुबोध देव वर्मा यांनी त्यांचा 858 मतांनी पराभव केला.
2- सर्वात छोटा विजय : नागालँडमध्ये 7, तर मेघालयमध्ये 10 मतांनी विजय
तिन्ही राज्यांत सर्वात कमी मतांच्या अंतराने नागालँडमध्ये विजय झाला. येथील पश्चिम अंगामी मतदार संघात नॅशलिस्ट डेमोक्रॅटीक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या (एनडीपीपी) महिला उमेदवार सल्हौतुओनुओ क्रूस यांनी अपक्ष उमेदवार केनिझाखो नखरो यांचा अवघ्या 7 मतांनी पराभव केला.
तर मेघालयच्या राजबाला मतदार संघातही सर्वात कमी अंतराने हारजित निश्चित झाली. येथील तृणमूल काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर मिजानूर रहमान काझी यांनी नॅशनल पीपल्स पार्टीच्या एम डी अब्दुस सालेह यांचा पराभव केला. त्यांचा अवघ्या 10 मतांनी विजय झाला.
3- सर्वात मोठा विजय
त्रिपुराच्या तकरजला मतदार संघात त्रिपुरा मोथा पार्टीच्या बिस्वजित कलाई यांनी इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराचे उमेदवार बिधान देबबर्मा यांचा 32455 मतांनी पराभव केला. हा त्रिपुरातील सर्वात मोठा विजय ठरला आहे. दुसरीकडे, मेघालयच्या मवलाई सीटवर व्हॉइस ऑफ द पीपल पार्टीचे उमदेवार ब्राइटस्टारवेल मार्बानियांग यांनी नॅशनल पीपल्स पार्टीचे उमेदवार टेइबोर्लैंग पथाव यांना यांचा सर्वाधिक 15648 मतांनी पराभव केला. नागालँडमध्ये सर्वात मोठा विजय 20096 मतांनी नोंदवण्यात आला. घासपाणी - 1 मतदार संघात भघाजप उमेदवार एन जेकब झिमोमी यांनी अपक्ष उमेदवार व्ही फुशीका एओमी यांचा 20096 मतांनी पराभव केला.
4- नागालँडमध्ये 60 वर्षांत प्रथमच 2 महिला आमदार
नागालँड निवडणुकीत मतदारांनी इतिहास रचला. मागील 60 वर्षात प्रथमच येथे 1 महिला आमदार झाली. जनतेने प्रथमच 2 महिला उमेदवारांना निवडून देऊन इतिहास रचला. भाजपचा मित्रपक्ष एनडीपीपीच्या (सत्ताधारी राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी) उमेदवार हेकानी जखालू यांनी दिमापूर-III मतदार संघात, तर सल्हौतुओनुओ क्रुस यांनी पश्चिम अंगामी मतदार संघात बाजी मारली.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 183 उमेदवार रिंगणात होते. त्यात 4 महिला उमेदवारही होत्या. हेकानी जखालू, क्रुस यांच्याशिवाय टेनिंग सीटवर काँग्रेसच्या रोझी थॉम्पसन व अटोइजू सीटवर भाजपच्या काहुली सेमा ह्या रिंगणात होत्या. त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
5- नागालँडमध्ये काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही
ईशान्येतील तिन्ही राज्यांत काँग्रेसला एकही चांगली बातमी मिळाली नाही. काँग्रेसला नागालँडमध्ये भोपळा फोडता आला नाही. पक्षाला मेघालयमध्ये 5, तर त्रिपुरात अवघ्या 3 जागांवर समाधान मानावे लागले. त्रिपुरात काँग्रेसने डाव्या पक्षांसोबत आघाडी केली होती. मेघालयमध्ये 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसने 21 जागा जिंकल्या होत्या. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतरही या निवडणुकीत काँग्रेसची हाराकिरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे राहुल यांनी केवळ मेघालयमध्ये पक्षाचा प्रचार केला होता. त्यांनी नागालँड व त्रिपुरात एकही रॅली केली नाही.
6- ईशान्येत भाजपची चमक कायम
त्रिपुरा, नागालँड व मेघालय या तिन्ही राज्यांत भाजपला चांगले यश मिळाले. त्रिपुरात भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करण्यात यश आले. तर दुसरीकडे नागालँडमध्ये भाजपसोबत आघाडी असणाऱ्या एनडीपीपीने बहुमत मिळाले. विद्यमान मुख्यमंत्री कोनराड संगमा यांचा पक्ष मेघालयात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. निवडणुकीनंतर भाजपसोबत युती करून सरकार स्थापन करण्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तथापि, 2018 ची निवडणूक भाजप - एनपीपीने एकत्र लढवून सरकार स्थापन केले होते. पण 2023 च्या निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांच्या वाटा वेगळ्या झाल्या होत्या.
7- त्रिपुरात टिपरा मोथा पार्टीने दिला आश्चर्याचा धक्का
त्रिपुरा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती त्रिपुराच्या राजघराण्याचे उत्तराधिकारी प्रद्योत किशोर माणिक्य देबबर्मा यांच्या टिपरा मोथा पक्षाची. टिपरा मोथाने राज्यातील 13 जागा आपल्या खिशात घातल्या. प्रद्योत 'टिपरालँड' नावाने आदिवासी समाजासाठी स्वतंत्र राज्याची मागणी करत आहे. त्यांचा राजकीय प्रवास काँग्रेसमधून सुरू झाला. त्यांचे आई - वडील दोघेही काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते. 2018 च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने त्रिपुराची सुत्रे त्यांच्याकडे सोपवली. पण त्यांनी या पदाचा राजीनामा देऊन स्वतःचा नवा पक्ष काढला.
8- मेघालयमध्ये ममतांच्या पक्षाने दाखवला दम
मेघालयमध्ये संगमा यांचा एनपीपी सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने त्यांना चांगली टक्कर दिली. ममतांच्या तृणमूल काँग्रेसने येथील 5 जागा जिंकल्या. 2018 च्या निवडणुकीत तृणमूलने येथील 8 जागा लढवल्या होत्या. पण त्यांना भोपळाही फोडता आला नव्हता.
9- तेमजेन इम्ना अलाँग जिंकले
सोशल मीडियावर आपल्या सेंस ऑफ ह्यूमरमुळे नेहमीच चर्चेत राहणारे तेमजेन इम्ना अलाँग यांचा निवडणुकीत विजय झाला आहे. ते नागालँड भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी अलोंगटाकी मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी नितीशकुमार यांच्या जदयुच्या जे लानू लोंगचार यांचा पराभव केला.
10- ईशान्येत नितीश, पवार, चिराग यांच्या पक्षांना काय मिळाले?
नागालँड निवडणुकीत नितीश कुमार यांचा जदयु, चिराग पासवान यांचा पक्ष लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी), शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, केंद्रीय मंत्री आठवले यांची रिपाइ (आ.) ही रिंगणात होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने 7 जागा जिंकल्या, तर जेडीयूला 1 जागा जिंकण्यात यश आले. याशिवाय लोजपा व आरपीआयलाही प्रत्येकी 2 जागा जिंकण्यात यश आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.