आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Name In NRC, But Aadhaar Card Is Not Generated; 27 Lakh People Are Deprived Of Government Schemes

ग्राउंड रिपोर्ट:एनआरसीत नाव, तरी आधार कार्ड तयार होत नाही; 27 लाख लोक शासकीय योजनांपासून वंचितच

गुवाहाटी | आदित्य डी10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मी ६२ वर्षांची विधवा आहे. कुटुंबातील सर्वांची नावे एनआरसीमध्ये आहेत. परंतु बायोमेट्रिक डेटा लॉक असल्याने आधार कार्ड तयार होऊ शकत नाही, असे आधार केंद्राचे कर्मचारी सांगतात. बँक केवायसीसाठी आधार मागते. केवायसी केली नाही तर निवृत्तिवेतन थांबेल. तसे झाल्यास आम्ही खायचे काय? तुम्हीच सांगा मी काय करू? असा प्रश्न संध्याराणी यांनी विचारला.

गेल्या ३ वर्षांपासून त्या जोरहाट जिल्ह्यातील मरियानी भागातील आधार केंद्राच्या पायऱ्या झिजवत आहे. आसाममध्ये एनआरसीची अंतिम यादी २०१९ मध्ये जारी झाली होती. हा एक प्रकारचा पथदर्शी प्रकल्पच आहे. कारण त्यानंतर देशभरात ही योजना लागू करण्यात येणार आहे. परंतु आसाममध्येच अद्याप यातील अनेक व्यावहारिक समस्या, त्रुटी दूर होऊ शकलेल्या नाहीत. एकूण २७ लाख नागरिकांची नावे एनआरसीमध्ये आहेत, परंतु त्यांचा बायोमेट्रिक डेटा नसल्याने आधार कार्डसुद्धा तयार होऊ शकलेले नाही. अन् आधार कार्ड नसल्याने त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल त्यांना राज्य सरकारच्या ‘ओरुनोदोई’ योजनेचा लाभ मिळणार नाही, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेंतर्गत गरजू लाभार्थींना दरमहा १००० रुपये दिले जातात. केंद्र-राज्य सरकारच्या १५ पेक्षा अधिक योजनांसाठी आधार अनिवार्य आहे. देशभरात एनआरसी लागू केल्यानंतर त्यात सर्वच नागरिकांचे रेकॉर्ड राहील. ज्यांची नावे रजिस्टरमध्ये नसतील त्यांना भारतीय नागरिक मानले जाणार नाही.

यक्ष प्रश्न ३.३ कोटी लोकसंख्येच्या आसाममध्ये १६०० कोटी खर्च करूनही समस्या कायम; मग १३८ कोटी नागरिकांना एनआरसी कसे लागू करणार ?
उदाहरण-१ : मुलांना शिष्यवृत्ती मिळाली नाही
जोरहाटच्या ढिंगियापारमध्ये चहा मळ्यात काम करणारे राजेश आधार कार्ड तयार होत नसल्याने वैतागले आहेत. ते म्हणाले, माझ्या मुलास १०वी मध्ये ७५ टक्के गुण मिळाले. राज्याच्या योजनेंतर्गत त्याला १६ हजार मिळू शकतात.परंतु आधार कार्ड नसल्याने त्याचे बँकेत खाते उघडू शकत नाही. खाते नसेल तर पैसे मिळणार नाहीत. असे हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत.

उदाहरण-२ : पीएफचे पैसे काढणे मुश्कील झाले
मूळ उत्तर प्रदेशचे रहिवासी, पण आसाममध्ये एका कंपनीत नोकरी करणारे राजेश म्हणतात, माझ्या पूर्ण कुटुंबाचे नाव एनआरसीच्या अंतिम यादीत आहे. परंतु पत्नी आणि दोन मुलांचे आधार कार्ड बनू शकले नाही. माझ्या आई-वडिलांचे कार्ड यूपीत बनले आहे.
ईपीएफओ मला आधार कार्ड मागत असून यामुळे मलाही भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) पैसे काढता येऊ शकत नाहीत.

उदाहरण-३ : कुटुंबात फक्त मला रेशन मिळत नाही
वयोवृद्ध रिमी देब म्हणतात, माझ्यासारख्या गरीब लोकांसाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवतात. परंतु मला कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही. कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड बनले,परंतु माझे कार्ड बनू शकले नाही. त्यामुळे सर्वांच्या नावाचे रेशन मिळते, परंतु माझ्या नावाचे काहीच मिळत नाही. वास्तविक एनआरसीमध्ये ३ वर्षांपूर्वीच माझी नाव नोंदणी झालेली आहे.