आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वपक्षीय बैठक:मोदींनी लष्कराला दिला फ्रीहँड; ना कुणी घुसखोरी केली, ना चौकी बळकावली : नरेंद्र मोदी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संपूर्ण गलवान खोरेच आमच्या ताब्यात : चीन

चीनविरुद्ध सर्व राजकीय पक्षांची एकजूट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत या पक्षांनी गलवान खोऱ्यातील हल्ल्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. पंतप्रधान म्हणाले, “लडाखमध्ये आपल्या हद्दीत कुणीही घुसखोरी केलेली नाही किंवा आपल्या लष्करी पोस्टवर ताबा मिळवलेला नाही. आपल्या इंचभर जमिनीकडेही कुणाची वाईट नजर जाऊ शकत नाही. शहीद २० वीरांनी शत्रूला धडा शिकवला. चीनने जे केले त्यामुळे देशात संताप आहे. लष्कराला कारवाईसाठी फ्रीहँड दिला आहे.’ मोदींच्या या वक्तव्यानंतर रात्री उशिरा चिनी परराष्ट्र मंत्रालयाने दावा केला की, “एलएसीवर संपूर्ण गलवान खोरे चीनचाच भाग आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत शांतता कायम ठेवण्याचे ठरले आहे.’

तत्पूर्वी सूत्रांनी दावा केला होता की, सोमवारच्या चकमकीनंतर चीनने भारतीय लष्कराच्या चार अधिकाऱ्यांसह १० जणांचे अपहरण केले होते. सलग तीन बैठकांनंतर गुरुवारी त्यांना सोडून देण्यात आले.

ज्या पुलावर चीनचा आक्षेप त्याचे काम पूर्ण झाले

चीनला ज्या पुलावर आक्षेप होता तो पूल लष्कराने पूर्ण केला आहे. ५५ मीटर हा पूल भारतीय लष्करासाठी खूप महत्त्वाचा आहे. शिवाय ज्या २५५ किमी लांबीच्या रस्त्यामुळे चीन अस्वस्थ आहे त्याच्या रक्षणासाठी हा पूल महत्त्वाचा आहे. चीनच्या ताब्यातून १० सैनिक सुटल्यावर भारताने धोरण बदलले. मेजर जनरल दर्जाच्या अधिकाऱ्याने सांगितले की पाकला ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाते त्याच पद्धतीने चिनी लष्करालाही दिले जाईल.

ग्राउंड रिपोर्ट : दर ५ मिनिटांनी लढाऊ विमानांची गर्जना, आघाडीवर तैनात

( अमितकुमार निरंजन | लेह )

लेहमध्ये लष्कर आणि हवाई दलाच्या हालचाली अचानक वाढल्या आहेत. दर पाच मिनिटांनी आकाशात लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर दिसत आहेत. भास्कर टीमला लेहपासून ५ किमी पुढे करूपर्यंत जाण्याची परवानगी मिळाली. या मार्गावर शे, ठिकसे, चुगलम ही गावे आहेत. येथील लोकांनाही चीनला चाेख प्रत्युत्तर द्यावयाचे आहे. ठिकसे येथील ज्येष्ठ नागरिक एस. दोर्जे म्हणाले, चार-पाच दिवसांपासून लष्कराची वाहने सीमेच्या दिशेने जात आहेत. यात ट्रक, क्रेन, रुग्णवाहिका आणि बसही असतात. आम्ही गावकरी जवानांचे धैर्य वाढवतो.

या तणावातच हवाई दलाचे प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनीही लेह व श्रीनगर हवाई तळांचा दौरा केला. लडाखमध्ये कारवाईसाठी हे दोन तळ महत्त्वाचे आहेत. भदौरिया १७ व १८ जून रोजी लेह तसेच श्रीनगर तळावर होते. आघाड्यांवरील या तळांवर सध्या लढाऊ विमाने तैनात आहेत.

शिस्तीमुळे आमचे हात बांधलेले आहेत, अन्यथा चोख प्रत्युत्तर देता येते... पार्थिव देहासोबत आलेल्या जवानांनी सांगितले...

पंजाबच्या मानसा येथे आपल्या शहीद सहकाऱ्याचे पार्थिव घेऊन आलेल्या शीख रेजिमेंटचे जवान म्हणाले, “आम्हाला सरकारकडून सीमाभागात स्वयंशिस्त बाळगण्याच्या कडक सूचना आहेत म्हणून आमचे हात सध्या बांधलेले आहेत. अन्यथा शत्रूला चाेख प्रत्युत्तर तर आम्हीही देऊ शकतो. घुसखोर चिनी सैनिक आम्हाला भडकावण्याचा प्रयत्न करतात. मात्र, आम्ही नि:शस्त्र असल्याने काहीच करू शकत नाही.’

चीनने कधी घुसखोरी केली, गुप्तहेर यंत्रणेचे हे अपयश आहे का : सोनिया

सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणाल्या, “चीनने आमच्या हद्दीत कधी घसुखोरी केली? सरकारला ५ मेपूर्वी याची माहिती होती का? या भागातील सॅटेलाइट इमेजेस नव्हत्या का? हे गुप्तहेर यंत्रणेचे अपयश आहे असे सरकार मानते का? सरकारने ५ मे ते ६ जून असा वेळ वाया घालवला. २० जवानांचे बलिदान हा त्याचाच परिणाम आहे.’ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले, “सैनिकानी कुठे शस्त्रे घेऊन जायचे ते आंतरराष्ट्रीय करारानुसार निश्चित होते. अशा संवेदनशील मुद्द्यावर काहीही बोलणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी.’ विशेष म्हणजे एक दिवस आधीच काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सरकारला विचारले होते की, भारतीय जवानांना शहीद होण्यासाठी नि:शस्त्र पाठवण्यात आले होते का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनची घुसखोरी झाली असल्याचे नाकारले. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाच्या १७ जूनच्या वक्तव्यानुसार, ‘परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चिनी परराष्ट्रमंत्र्यांना फोनवर सांगितले होते की, चिनी जवानांनी गलवान खोऱ्यात भारतीय सीमा हद्दीत काही तंबू, निवारे उभारले आहेत. यावरूनच नंतर वाद झाला.’

बातम्या आणखी आहेत...