आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PFI ची उलटगणती सुरू:सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच संघटनेवर घालू शकते बंदी, लवकरच आणखी एक धाड पडणार

आशिष राय2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI ची उलटगणती सुरू झाली आहे. तपास यंत्रणा या संघटनेविरोधात ऑपरेशन ऑक्टोपस तर चालवतच आहेत. पण सरकारनेही या संघटनेवर बंदी घालण्याची तयारी पूर्ण केली आहे. यासंबंधीचा निर्णय संसदेच्या हिवाळी अधिवेशनात घेतला जाण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.

PFI वर टेरर फंडिंगद्वारे देशातील अनेक शहरांत दंगल घडवण्याचा व हत्यांचा आरोप आहे. केंद्राने या संघटनेवर बंदी घालण्यापूर्वी संघटनेच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारला या संघटनेची आर्थिक रसदही बंद करायची आहे. यामुळेच या संघटनेवरील धाडसत्रात NIA सोबत ED ही दिसून येत आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, केवळ देशातच नव्हे तर मध्य पूर्वेतील देशांतही सुरक्षा यंत्रणा सक्रिय आहेत. भविष्यात ऑपरेशन ऑक्टोपस अंतर्गत परदेशांतही अटकसत्र राबवले जाऊ शकते. दिव्य मराठीला मिळालेल्या माहितीनुसार, सर्वच तपास यंत्रणा अनेक दिवसांपासून या अॅक्शन प्लॅनची तयारी करत होत्या.

PFI वर दोन पद्धतीने येऊ शकते बंदी

  • सूत्रांच्या माहितीनुसार, PFI वर सरकार दोन प्रकारे बंदी घालू शकते. एक - गृह मंत्रालय थेट या संघटनेवर काही वर्षांसाठी बंदी घालण्याची घोषणा करू शकते. त्यानंतर हळूहळू या बंदीची मुदत वाढवत नेली जाईल. दोन - न्यायालयाकडून या संघटनेवर बंदी घातल्याची घोषणा करवून घेतली जाईल.
  • बंदी घातल्यानंतर PFIला पुराव्यांच्या अभावाचा कोणताही फायदा मिळू नये, यासाठी तपास यंत्रणा आताच तिच्याविरोधात ठोस पुरावे गोळा करत आहेत. यामुळेच अटक करण्यात आलेल्या बहुतांश आरोपींच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसची न्यायवैद्यक तपासणी केली जात आहे.

PFI चा दावा - आम्हाला लक्ष्य केले जात आहे

आपल्यावरील कारवाईनंतर पीएफआयने सोशल मीडियावर आपली बाजू मांडली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, प्रिव्हेंटिव्ह कस्टडीच्या (प्रतिबंधात्मक कोठडी) नावाखाली भाजप शासित राज्यांत मोठ्या प्रमाणात अटक होत आहे. हे दुसरे तिसरे काही नसून, केंद्राचा पीएफआयला लक्ष्य करण्याचा प्रयत्न आहे. या पद्धतीने लोकशाही पद्धतीने विरोध करण्याच्या अधिकारावर गडांतर घातले जात आहे.

एखाद्या व्यक्तीने भविष्यात मोठा गुन्हा करू नये म्हणून त्याला खबरदारी म्हणून अटक करणे याला प्रतिबंधात्मक कोठडी म्हणतात.

पीएफआयविरोधातील कारवाईत केंद्रीय तपास यंत्रणांसह राज्य पोलिसांचाही समावेश आहे. या संघटनेच्या छोट्या शहरांतील कार्यकर्त्यांनाही अटक केली जात आहे.

PFI वर आठवड्याभरात दुसरी कारवाई

  • 22 सप्टेंबर : NIA गत गुरूवारी मध्यरात्री 15 राज्यांतील पीएफआयच्या ठिकाणांवर छापेमारी केली. टेरर फंडिंग प्रकरणी करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 106 जणांना अटक करण्यात आली. एनआयए व ईडीच्या तब्बल 500 अधिकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता. ही कारवाई उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, आसाम, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, पद्दुचेरी व राजस्थानात झाली.
  • 27 सप्टेंबर : राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) व ED ने मंगळवारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI)वर 8 राज्यांत छापेमारी केली. तिच्या 170 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. दिल्लीच्या शाहीन बागेतूनही 30 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. याशिवाय महाराष्ट्रातून 15, कर्नाटकातून 6 व आसामातून 25 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. उत्तर प्रदेश एटीएसने गाझियाबाद, मेरठ व बुलंदशहरातून 16 जणांना उचलण्यात आले. मध्य प्रदेशातील 8 जिल्ह्यांतूनही 22 संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

दिव्य मराठीने यापूर्वीच दोनवेळा PFI वर कारवाई होणार असल्याचे सांगितले होते...

1.9 ऑगस्ट रोजी सांगितले होते -केंद्र मोठ्या कारवाईच्या तयारीत

पीएफआयवरील या कारवाईची तयारी ऑगस्ट महिन्यातच पूर्ण करण्यात आली होती. दिव्य मराठीने 9 ऑगस्ट रोजी हे वृत्त दिले होते. हा प्लॅन 4 ऑगस्ट रोजी गृहमंत्री अमित शहा यांच्या बंगळुरु दौऱ्यात तयार झाला. तिथे शहांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई व राज्याचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांच्याशी चर्चा केली होती. याच बैठकीत पीएफआयला संपुष्टात आणण्यासाठी कृती योजना तयार करण्यात आली. त्यानंतर 3 दिवसांनी म्हणजे 7 ऑगस्ट रोजी प्लॅन प्रत्यक्षात आणण्यासाठी टीम तयार करण्यात आली.

2. 26 सप्टेंबर रोजी सांगितले होते- ऑपरेशन ऑक्टोपसचा दुसरा छापा लवकरच

ऑपरेशन ऑक्टोपसच्या पहिल्या टप्प्यात 22 सप्टेंबर रोजी 11 राज्यांत छापेमारी करून पीएफआयच्या 106 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. ऑपरेशनमध्ये एनआयए, ईडी, 11 राज्यांतील पोलिस, सीआरपीएफ व एटीएसचा समावेश करण्यात आला. प्रथमच एवढ्या यंत्रणांनी संयुक्तपणे पीएफआयवर एवढी मोठी कारवाई केली होती. आम्ही सूत्रांचा दाखला देत या ऑपरेशनचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असल्याचे वृत्त दिले होते. त्याची सुरूवात लवकरच दक्षिण व पश्चिम राज्यांतून होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...