आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Speech : Pariksha Pe Charcha 2022 Updates| Delhi Talkatora Stadium Latest News Today

परीक्षा पे चर्चा:पंतप्रधान मोदी म्हणाले - फक्त परीक्षेसाठी अभ्यास करू नका, ऑनलाइन ज्ञान घ्या आणि ऑफलाइन स्वप्न साकार करा

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमातून देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर नुकताच हा कार्यक्रम पार पाडला. यावेळी 1 हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधत पंतप्रधानांनी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. परीक्षेमुळे येणारा ताण, आपली स्वप्ने पालकांना कशी समजावून सांगावीत, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी तालकटोरा स्टेडियमवर देशभरातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रकल्पांची पाहणीही केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा कशी द्यावी, याचा कानमंत्र दिला. परीक्षेचा ताण घेऊ नका. परीक्षा हा जीवनाचा जन्मजात भाग आहे. हे छोटे टप्पे आहेत. त्यांनी घाबरू नका. तुम्ही पहिल्यांदाच परीक्षा देत आहात का? तुम्ही अनेकवेळा परीक्षी दिली आहे. अशा अनुभवांना तुमची ताकद बनवा. तुम्ही जे करत आहात, त्यावर विश्वास ठेवा. आपण एवढ्या परीक्षा दिल्या आहेत की त्यांचा आता आपल्याला सराव झाला आहे. त्यामुळे आपण परीक्षेसाठी कधीही तयार आहोत, असे समजूनच परीक्षा द्या. ताण घेण्याची गरज नाही, असे सांगत मोदींनी विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेविषयीची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.

अभ्यास करता की रील बघता?
सोशल मीडियाच्या व्यसनाबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर मोदी म्हणाले, की तुम्ही ऑनलाइन अभ्यास करता तेव्हा तुम्ही खरंच अभ्यास करता की रील बघता? दोष ऑनलाइन किंवा ऑफलाइनचा नाही. तुम्ही वर्गात बसल्यानंतरही अनेकदा तुमचं शरीर वर्गात असतं, डोळे शिक्षकांकडे लागलेले असतात, पण एकही गोष्ट कानात जात नाही. कारण तुमचं मन कुठेतरी दुसरीकडे असते. ज्या गोष्टी ऑफलाईन होतात, त्याच गोष्टी ऑनलाईन होतात. याचा अर्थ माध्यम ही समस्या नसून मन ही खरी समस्या आहे. माध्यम कोणतंही असल तरी मन जर त्याच्याशी जोडले गेल तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन काहीही फरक पडत नाही, असे मोदींनी सांगितले.

स्वत:ला ऑफलाईन घडवा!
आज आपण डिजीटल गॅजेट्सच्या माध्यमातून खूप सहज आणि मोठ्या प्रमाणावर गोष्टी साध्य करू शकतो. समस्या म्हणून नाही तर एक संधी म्हणून आपण याचा विचार केला पाहिजे. ऑनलाईन अभ्यासाला तुम्ही बक्षीस म्हणून समजायला हवं. तुम्ही शिक्षकांनी दिलेल्या नोट्स आणि ऑनलाईन मिळालेल्या नोट्स या दोन्ही वाचल्या तर तुम्ही तुमच्या अभ्यासात आणखी भर घालू शकाल. दोन्ही एकत्र करून अभ्यास केला तर तुम्हाला फायदा होईल. शिक्षणाचा एक भाग आहे ज्ञानार्जन करणे. ज्ञान ऑनलाईन मिळवा. मात्र स्वत:ला ऑफलाईन घडवा, असा सल्ला मोदींनी विद्यार्थ्यांना दिला.

खेळही गरजेचा -
नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पंतप्रधान म्हणाले, की हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व्यक्तिमत्व विकासावर भर देत आहे. ज्ञानाच्या भांडारापेक्षा कौशल्य विकास महत्त्वाचा आहे. 21 व्या शतकाच्या अनुषंगाने आपण आपल्या सर्व यंत्रणा आणि धोरणे तयार केली पाहिजेत, असे मोदी म्हणाले. तसेच खेळही गरजेचा असल्याचे त्यांनी म्हटलं. आपण पुस्तकांमध्ये जे वाचतो ते खेळाच्या मैदानातून सहज शिकता येते, असेहा ते म्हणाले.

पालक मुलांची स्वप्ने समजून घेत नाहीत -
आजच्या युगात पालक आपल्या महत्त्वाकांक्षा आणि स्वप्ने मुलांवर लादण्याचा प्रयत्न करतात. दुसरे म्हणजे, शिक्षकही त्यांच्या शाळेचे उदाहरण देऊन त्यांच्यावर दबाव आणतात. मुलांचे कौशल्य समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, त्यामुळे अनेक वेळा मुले अडखळतात. जुन्या काळी शिक्षकांचा कुटुंबाशी संपर्क असायचा. कुटुंबे आपल्या मुलांसाठी काय विचार करतात, याबाबत शिक्षक परिचित होते. शिक्षकांनी काय केले याची माहिती कुटुंबाना होती. म्हणजे शिक्षण शाळेत असो की घरात, सगळे एकाच व्यासपीठावर होते. प्रत्येक मुलाची स्वतःची खास बाब असते. तो कुटुंबाच्या, शिक्षकांच्या तराजूत बसेल किंवा नसेल, पण देवाने त्याला काही खास शक्ती देऊन पाठवले आहे. त्याची शक्ती, त्याची स्वप्ने समजून घेऊ शकत नाही, हीच पालकांची कमतरता आहे, असे मोदी म्हणाले.

निराश होण्याचे खरे कारण जाणून घ्या -
प्रेरणा मिळावी, यासाठी कोणतेही इंजेक्शन नाही. कोणतेही सूत्र नाही. निराशेचे खरे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तसेच कोणावरही अवलंबून राहू नका. तुमच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाबी समजून घ्या. अशाने तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल आणि इतर कोणाच्या प्रेरणेची गरज भासणार नाही, असा कानमंत्र मोदींनी विद्यार्थ्यांना दिला.

परीक्षेलाच पत्र लिहा -
मोदींनी विद्यार्थ्यांना म्हणाले, की आत्मपरीक्षण करत राहा. स्व:ताची परीक्षा घ्या, माझ्या Exam Warriors या पुस्तकात लिहिले आहे, एक दिवस तुम्ही परीक्षेलाच पत्र लिहा. हे प्रिय परीक्षे असं लिहून पत्राची सुरूवात करा. पत्रात लिहा, की मी पूर्णपणे तयार आहे, हिंमत असेल तर माझी परीक्षा घे. अरे तू काय माझी परीक्षा घेणार, मीच माझी परीक्षा घेईन.

जिथे आहात तो क्षण आनंदाने जगा -
अनेकदा अभ्यास केल्यानंतर परीक्षा देताना उत्तर आठवत नाही, यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना; मोदी म्हणाले, की आता तुम्ही येथे बसला आहात. पण, घरी आई टिव्ही पाहत असेल, असा विचार तुमच्या मनात आहे. म्हणजेच तुमचे लक्ष दुसरीकडे आहे. जिथे आहात तो क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. वर्तमान जगलात कर भविष्याचा प्रश्नच नाही.

निकालाची काळजी करू नका -
दोन परीक्षा असल्यानंतर काय करावे, या प्रश्नावर उत्तर देताना मोदी म्हणाले, की परीक्षेसाठी अभ्यास केला पाहिजे यावर माझा विश्वास नाही. इथेच आपली चूक होते. मी या परीक्षेसाठी अभ्यास करेन, मग त्या परीक्षेसाठी अभ्यास करेन. याचा अर्थ असा की तुम्ही अभ्यास करत नाही, तुम्ही औषधी वनस्पती शोधत आहात ज्यामुळे तुमचे काम सोपे होईल. तुम्ही पात्र होण्यासाठी अभ्यास केला असेल, तर निकालाची काळजी करू नका. परीक्षेची तयारी करण्यात आपले मन खर्ची न करता, संबंधित विषयात पारंगत होण्यासाठी, स्वत:ला पात्र व सुशिक्षित व्यक्ती बनविण्यासाठी कठोर परिश्रम करायला हवे. खेळाडू जेव्हा सराव करतो, तेव्हा तो तालूक स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर खेळण्याचे पाहत नाही. तो फक्त खेळतो.

मुलगा-मुलगी असा भेद करू नका -
मुलगा-मुलगी असा भेद करू नका, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मुलींचे सामर्थ्य जाणून घेण्यात समाज मागे राहिला, तर तो समाज कधीच प्रगती करू शकत नाही. आई-वडिलांच्या सुखासाठी आणि सेवेसाठी लग्नही न केलेल्या मी अनेक मुली पाहिल्या आहेत. क्रीडा आणि विज्ञान क्षेत्रात आपल्या मुलींची ताकद दिसून येते. दहावी, बारावी उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे, असेही मोदी म्हणाले.

'परीक्षा पे चर्चा २०२२' चा उद्देश -
बोर्ड आणि प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांना सुलभरित्या देता याव्यात हा 'परीक्षा पे चर्चा २०२२' मागचा उद्देश आहे. २०१८ पासून 'परीक्षा पे चर्चा'चे दरवर्षी आयोजन केले जाते. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थी आणि शिक्षकांशी थेट संवाद साधतात.

बातम्या आणखी आहेत...