आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या कहरात अनेक कुटुंबांवर एकापेक्षा अधिक सदस्यांना गमावण्याची वेळ आली. सगळ्यांसाठीच मानसिक, आर्थिक, भावनिक या सर्वच पातळ्यांवर हा माेठा धक्का हाेता. त्यातून सावरण्याचा आता हे सारे प्रयत्न करताहेत. काेराेनाने घाला घातलेल्या कुटंुबांच्या या वेदना आणि परिस्थितीला सामाेरे जाण्यासाठी त्यांनी एकवटलेले बळ “दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींनी जाणून घेतले.
दुसरी लाट घेऊन आलेल्या कोरोनाने नांदूरशिंगोटे येथील शेळके कुटुंबातल्या पाच कर्त्यांचा जीव घेतला. त्यानंतरचा काळ कुटुंबासाठी भयंकर होता. एकीकडे दुःखाचा डोंगर तर दुसरीकडे सैरभैर कुटुंबाला सावरण्याची धडपड. घरातील महिला अजूनही दुःखातून सावरल्या नाहीत. पाच कर्ती माणसे गमावलेल्या या कुटुंबाचे उपचारांच्या खर्चामुळे सारे अर्थचक्रच मोडून पडले.
अवघी दोन एकर कोरडवाहू शेती असलेले शेळके कुटुंब दुधाच्या जोडधंद्याने आपला उदरनिर्वाह करीत होते. त्यात ठाण्याला खासगी कंपनीत नोकरीला असलेला मोठा भाऊ आणि महाराष्ट्र सुरक्षा बलात नोकरीला असलेला सागर यांच्या पगाराची कुटुंबास मदत होत होती. पण कोरोनाने कुटुंबातील पाच जणांवर घाला घातला आणि त्यामुळे झालेली सैरभैर मानसिक स्थिती आणि उपचारांच्या खर्चाने खालावलेली आर्थिक परिस्थिती यात सागर अडकला. शेवटी नोकरीतून रजा घेऊन घरची शेती आणि दररोज १० लिटर दूध विक्रीतून कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न तो करत आहे. आजोबा बाबूराव शिवराम शेळके (७५), आजी लक्ष्मीबाई (७०), वडील रमेश बाबूराव शेळके (५४), चुलते सुरेश बाबूराव शेळके (६०), मोठा भाऊ सचिन रमेश शेळके (२९) असे तब्बल पाच मृत्यू या घराने दोन महिन्यांपूर्वी पाहिले. उद्ध्वस्त कुटुंबाला आता केवळ सागरचा आधार उरला आहे. आई राजूबाई, चुलती छबाबाई, वहिनी आणि भावाचा चिमुकला शिव असे सारे कुटुंब उघड्यावर पडले आहे. शोकाच्या खोल गुहेतून बाहेर येऊ न देणारा भूतकाळ सगळ्यांना भविष्यातल्या अंधाराचे भय दाखवतो आहे. खडतर वर्तमान स्वीकारण्याचे बळ गमावलेल्या परिवाराला सावरणे हे मोठे आव्हान होऊन बसले आहे. आजोबा, आजी, वडील, चुलते आणि मोठा भाऊ यांच्या रूपाने घराचे पाच खा॑ंबच उन्मळून पडले.
आई, चुलती व भावजयी दुःखावेगाने अजूनही सुन्न मन:स्थितीत आहेत. धीर देण्याच्या चार गोष्टी रोज सांगून त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न सागर करतोय. गमावलेल्या जीवाभावाच्या माणसांच्या आठवणींनी महिला रोज डोळे भिजवतात. तेव्हा सांत्वनाचे शब्दही गोठून जातात. अशा स्थितीत सागर दु:ख गिळून सर्वांना आधार देत आहे. या परिस्थितीत लहानगा शिव हाच या साऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालण्यास निमित्त ठरतो आहे. त्याच्याकडे बघूनच या परिस्थितीत उभे राहण्याचे बळ मिळाल्याचे सागर म्हणतो. नातलगांनीही सावरण्यासाठी आधार दिला. त्यातून जीवन जगण्याच्या लढाईसाठी बळ मिळाल्याचे तो सांगतो. भविष्याकडे आशेने पाहावे अशी या कुटुंबाची मन:स्थिती अजूनही नाही. आधी वर्तमान सावरण्याचा प्रयत्न आहे, नंतरच भविष्याच्या आशेचे किरण दिसू शकतील. तोपर्यंत रोजच्या जगण्याच्या लढाईसाठी बळ मिळावे एवढीच अपेक्षा आहे. सागरच्या या जिद्दी दृष्टिकोनावरच कुटुंबाच्या वर्तमान आणि भविष्याचीही मदार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.