आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • National Family Health Survey 5 For The First Time In The Country's Population 1020 Females Per 1000 Males

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5:देशाच्या लोकसंख्येत प्रथमच 1000 पुरुषांमागे 1020 महिला, जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तरही 2015-16 च्या तुलनेत 10 अंकांनी सुधारले

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशासाठी दिलासादायक वृत्त आहे. प्रथमच भारताच्या एकूण लोकसंख्येत प्रति १००० पुरुषांमागे महिलांचे प्रमाण १०२० झाले आहे. बुधवारी जारी नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-५ च्या आकडेवारीत ही माहिती आहे. यापूर्वी २०१५-१६ मधील एनएफएचएस-४ मध्ये हे प्रमाण १००० पुरुषांमागे ९९१ महिला असे होते. इतकेच नव्हे तर जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तरही वाढले आहे. २०१५-१६ मध्ये ते प्रति १००० मुलांमागे ९१९ मुली असे होते. ताज्या सर्व्हेत हा आकडा १००० मुलांमागे ९२९ मुलींवर गेला आहे. एकूण लाेकसंख्येत लिंग गुणोत्तर शहरांऐवजी गावांत चांगले आहे. गावांत प्रति १००० पुरुषांमागे १०३७ महिला आहेत. शहरांत मात्र हे प्रमाण ९८५ इतकेच आहे.

३०% लोकसंख्येजवळ स्वत:चे आधुनिक टॉयलेट नाही...३.२% घरांत वीजही नाही
२०१५-१६ मध्ये स्वत:चे आधुनिक टॉयलेट असलेली घरे ४८.५% होती. २०१९-२१ मध्ये ही संख्या ७०.२% झाली. मात्र अद्याप ३०% वंचित ओत. देशातील ९६.८% घरांपर्यंत वीज पोहोचलेली आहे.

देशात प्रथमच प्रजनन दर २.१ पेक्षा घसरला
प्रथमच देशात प्रजनन दर २ च्या खाली आला आहे. २०१५-१६ मध्ये तो २.२ होता. विशेष म्हणजे २.१ चा प्रजनन दर रिप्लेसमेंट मार्क मानला जातो. म्हणजेच २.१ च्या प्रजनन दरावर लोकसंख्येतील वाढ स्थिर राहते. प्रजनन दर त्यापेक्षा कमी असल्यास तो लोकसंख्येची वाढ मंदावल्याचा संकेत आहे.

मात्र हे शल्य...फक्त ४१% महिलांनाच १० वीच्या पुढे शिकता आले, केवळ ३३.३% महिलांनी आयुष्यात कधीतरी इंटरनेटचा वापर केला
लाेकसंख्येत महिलांचे प्रमाण वाढले असले तरी आजवर त्यांची स्थिती सुधारलेली नाही. आजही देशात ४१% महिलांनाच १० वर्षांपेक्षा जास्त शालेय शिक्षण म्हणजे त्या दहावीनंतर पुढे शिकल्या आहेत. ५९% महिला दहावीनंतर शिकल्या नाहीत. ग्रामीण भागांत तर फक्त ३३.७% महिलाच दहावीच्या पुढे शिकल्या आहेत. 5-जीच्या काळातही देशातील केवळ ३३.३% महिलांनाच इंटरनेटचा अॅक्सेस मिळालेला आहे.

स्वत:चे बँक खाते असलेल्या महिलांची संख्या २५% वाढली, प्रॉपर्टीची मालकी असलेल्या महिलांत ५% वाढ
७८.६% महिला आपले बँक खाते चालवतात. २०१५-१६ मध्ये हा आकडा ५३% होता. ४३.३% महिलांच्या नावावर काही ना काही मालमत्ता आहे. २०१५-१६ मध्ये हे प्रमाण ३८.४% होते. मासिक पाळीच्या काळात सुरक्षित सॅनिटेशन उपाय अवलंबणाऱ्या महिला ५७.६% वरून ७७.३% वर गेल्या. तथापि, मुले व महिलांत अॅनिमियाचे प्रमाण चिंताजनक आहे. ६७.१% मुले व १५ ते ४९ वर्षे वयोगटातील ५७% महिला अॅनिमियाने ग्रस्त आहेत.

बातम्या आणखी आहेत...