आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना सवाल:रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकल्यास कसे वाटेल, शिवसेना आता औरंगजेबसेना झाली आहे का?

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फडणवीस सरकारच्या कार्यकाळानंतर ठाकरे सरकारच्या काळात राज्यात बेरोजगारी तिपटीने वाढली, अशी टीका नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. काल मुख्यमंत्र्यांची सभा ही विरोधकांना केवळ टोमणे मारण्यासाठीच होती. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात बेरोजगारी, भारनियमन, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर एक अवाक्षरही काढले नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.

तसेच, कोणताही गुन्हा नसताना रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकल्यास कसे वाटेल, असा बोचरा सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला. महाराष्ट्रात कायद्याचा अशा पद्धतीने गैरवापर कधी झाला नव्हता. केवळ हनुमान चालिसा म्हटले म्हणून एका महिला खासदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तशीच वागणूक रश्मी ठाकरेंना मिळाली असती तर कसे वाटले असते? हनुमान चालिसाला एवढा विरोध का? या प्रश्नांचे उत्तर द्या, असे नवनीत राणा म्हणाल्या.

कालच्या सभेत औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याची काय गरज आहे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली, असा दावादेखील नवनीत राणा यांनी यावेळी केला. यावरून त्यांचे हिंदुत्व दिसून येते, अशी टीका राणांनी केली. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणाऱ्यांना तिथेच गाडले असते. ही बाळासाहेबांची ताकद होती. मात्र, तुम्ही आता बाळासाहेबांच्या हिंदुत्वापासून फारकत घेतली आहे. त्यामुळेच तुम्ही असे वक्तव्य करत आहात. शिवसेनेची आता औरंगजेबसेना झाली आहे का?, असा सवाल राणा यांनी विचारला.

मुन्नाभाई हिट तुम्हीच सुपर फ्लॉप!
राज ठाकरे यांना मुन्नाभाई म्हणत काल मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्यावरही नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिले. राज्यात हाच मुन्नाभाई सुपरहिट आहे आणि तुम्ही सुपर फ्लॉप आहात. राज ठाकरेंना स्वप्नातही बाळासाहेब ठाकरे दिसत असतील, तर यात वाईट काय आहे. तुम्ही तर बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. त्यामुळे भविष्यात हा मुन्नाभाईच राज्याच्या राजकारणात हिट होईल व उद्धव ठाकरे सुपर फ्लॉप होतील. त्यांना तोंड दाखवायलाही जागा मिळणार नाही, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.

बीकेसीच्या त्या मैदानाचे शुद्धीकरण करणार!
बीकेसीत काल मुख्यमंत्र्यांनी ज्या मैदानावर सभा घेतली, त्या मैदानावर आपण हनुमान चालिसा म्हणून आपण मैदानाचे शुद्धीकरण करणार आहोत, असे नवनीत राणा म्हणाल्या. त्याच मैदानावर हनुमान चालिसा पठनाचा मोठा कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहोत. त्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही, असे राणा म्हणाल्या.

जनतेला अजूनही फडणवीसांचा कार्यकाळ आठवतो!
राज्यातील जनतेला अजूनही फडणवीस यांचा कार्यकाळ आठवतो. फडणवीस यांच्या कार्यकाळात शेतकरी, विद्यार्थी व तरुणांसाठी भरीव काम झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर आपल्या मातोश्रीबाहेर कधी निघतही नाहीत. काल आपण मराठवाडा, विदर्भाचा दौरा केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ते कधी कोणत्या शेतकऱ्याच्या बांधावर तरी गेले आहेत का, असा सवाल राणा दाम्पत्याने केला. तरीदेखील काल राज्याचे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी खालच्या पातळीवर टीका केली. महाराष्ट्र हे कधीही विसरणार नाही, असे राणा दाम्पत्य म्हणाले.

हिम्मत असेल तर राऊतांनी आपल्याविरोधात निवडणुक लढवावी!
उद्धव ठाकरे यांना सत्तेचा एवढा अहंकार असेल तर त्यांनी आपल्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान आज पुन्हा नवनीत राणांनी दिले. तसेच, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही राणा दाम्पत्याने आसूड ओढले. आपल्यावर सतत टीका करणाऱ्या राऊतांची लायकी काय आहे. हिम्मत असेल तर राऊतांनीदेखील आपल्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी. जनता त्यांना धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हानच त्यांनी राऊतांना दिले.

बातम्या आणखी आहेत...