आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा दिल्लीला पोहचले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पोलिस व तुरुंग प्रशासनाने महिला खासदाराला जी वागणूक दिली, त्याची तक्रार ल्लीत करणार असल्याचे रवी राणा यांनी सांगितले आहे.
आता मी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटले. पुर्ण परिस्थिती मी त्यांना सविस्तर सांगितली. मला अटक केल्यानंतरची पुर्ण स्थितीची माहिती दिली. मुंबईचे पोलिस आयुक्त यांच्यासह पोलिस आणि राज्य सरकारची मी तक्रार केली आहे. माझा तोंडी आणि लेखी जबाबही 23 मे रोजी संसदीय अधिकार समिती घेणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी महिलांचा अहवाल मागवणे चुकीचे
मुख्यमंत्र्यांनी मी महिला असल्याचे भान ठेवावे. महिलांचा वैद्यकीय अहवाल मागणे चुकीचे आहे असे म्हणत नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा लक्ष्य केले असून आज चौथ्यांदा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला हे विशेष!
नवनीत राणा यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. हनुमान चालिसाचा आग्रह केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गुंडांनी आमच्या मुंबई व अमरावतीतील घरांवर हल्ला केला. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आम्हाला 20 फूट गाडण्याची भाषा केली. त्यासाठी स्मशानभूमीत सामान पोहोचवल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याप्रकरणी आम्ही मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी अद्याप त्यावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे व संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्याकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती नवनीत राणा यांनी दिली.
महाराष्ट्रात तुरुंगात जाणारी मी पहिली महिला खासदार - नवनीत राणा
महाराष्ट्रात तुरुंगात जाणारी मी पहिली महिला खासदार आहे. तुरुंगात प्रत्येकाला कैद्याप्रमाणेच वागणुक दिली जाते, हे मला मान्य आहे. मात्र, त्याबाबतही काही नियम आहे. मला तुरुंग प्रशासनाने जाणूनबुजून हिन वागणूक दिली. तुरुंगात माझा छळ करण्यात आला. माझी तब्येत बिघडल्यानंतरही योग्य उपचार दिले गेले नाही. माझी तब्येत बिघडल्यानंतरही रुग्णालयात दाखल करण्यासाठी जाणूनबुजून उशीर करण्यात आला. हे सर्व उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावरच करण्यात आले. अहंकारी मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर अन्याय केला, असा आरोप करत या सर्व बाबींची माहिती आपण दिल्लीत देणार असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या.
कोर्टाचा अवमान केला नाही!
काल लिलावती रुग्णालयातून बाहेर येताच नवनीत राणा व रवी राणा यांनी हनुमान चालिसावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यामुळे राणा दाम्प्त्याने जामिनाच्या प्रमुख अटीचे उल्लंघन केल्याचा दावा सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी केला होता. त्यामुळे राणा दाम्पत्याला मिळालेला जामीन रद्द करावा, यासाठी आज कोर्टात अर्जदेखील करणार असल्याचे प्रदीप घरत यांनी सांगितले होते. त्यावर नवनीत राणा म्हणाल्या, आम्ही कोर्टाचा कोणताही अवमान केलेला नाही. खार येथील घरामध्ये पोलिसांसोबत जी काही बाचाबाची झाली व मातोश्रीसमोर हनुमान चालिसाच्या आग्रहाबाबत, कोणतेही वक्तव्य करू नका, अशी कोर्टाची अट होती. या दोन्ही प्रकरणांबाबत आम्ही कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मात्र, सरकारकडून जाणूनबुजून आम्हाला अडकवण्याचा कट आखला जात आहे, असा आरोप नवनीत राणा यांनी केला.
आमच्याकडे राऊत, परबांसारखे 10 फ्लॅट नाहीत!
मुंबई महापालिकेने राणा दाम्पत्याच्या खार येथील घरात अनधिकृत बांधकाम झाल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. मुंबई महापालिकेचे पथक लवकरच त्यांच्या घराची पाहणी करणार आहे. यावर रवी राणा म्हणाले की, मुंबई पालिकेच्या नोटीशीचे आम्ही स्वागत करतो. पालिकेच्या पथकाने घराची पुर्ण पाहणी करावी. त्यांना आम्ही पुर्ण सहकार्य करू. मुंबईत हा एकच फ्लॅट आम्ही 10 वर्षांपुर्वी एका बिल्डरकडून खरेदी केला होता. आमच्याकडे संजय राऊत, अनिल परबांसारखे 10 फ्लॅट नाहीत, असे राणा म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांकडे क्लास लावावा!
राज्यात सध्या शेतकरी, विद्यार्थी, महिला सर्वच वर्ग त्रस्त आहे. मात्र, मुख्यमंत्री केवळ घरात बसून राहतात. समस्या सोडवण्यासाठी ते पुढाकार घेत नाहीत. त्यांनी आतापर्यंत विदर्भातील शेतकऱ्यांना भेट दिलेली नाही. मात्र, एका महिला खासदाराची त्यांच्याकडून पिळवणूक केली जात आहे. त्याऐवजी राज्यातील समस्या सोडवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडे क्लास लावावा, असा टोला रवी राणा यांनी लगावला.
अजित पवारांच्या वक्तव्याबद्दल खेद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मुंबई पोलिसांवर खोटे आरोप लावल्याबद्दल राणा दाम्पत्यावर टीका केली होती. त्यावर नवनीत राणांनी अजित पवारांच्या या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला. अजित पवार नेहमी रोखठोक बोलतात. त्यांच्याबाबत आपल्या मनात आदर आहे. मात्र, खार येथील घरापासून तुरुंगापर्यंत पोलिसांनी आपल्याला कशी वागणूक दिली, याची माहिती अजित पवारांनी घ्यावी आणि मग वक्तव्य करावे, असे नवनीत राणा म्हणाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.