आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हायकोर्टात आणखी एक प्रतिज्ञापत्र सादर करून बिनशर्त माफी मागितली आहे. दादर येथे चैत्यभूमीला भेट दिल्यानंतर 6 डिसेंबर रोजी मलिक यांनी एक विधान केले होते. त्याविरुद्ध एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हायकोर्टात तक्रार अर्ज केला होता. त्यावरूनच मलिकांनी 4 पानांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
यापुढे कोणतेही वैयक्तिक विधान करणार नाही
ज्येष्ठ वकील एसपी चिनॉय यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. यामध्ये नवाब मलिक म्हणाले, मी माझ्या सरकारी पदाच्या अधिकारात राहून विधाने केली आहेत. मी कुणाच्याही संदर्भात वैयक्तिक विधान केलेले नाही. यापूर्वी व्यक्त केलेल्या विधानांबद्दल मी खेद व्यक्त करत आहे. बिनशर्त माफीही मागतो असेही मलिकांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी नवाब मलिक चैत्यभूमीवर पोहोचले होते. याच दरम्यान, एनसीबीचे महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे अधिकारी समीर वानखेडे सुद्धा पोहोचले होते. त्यांचेच नाव न घेता मलिक यांनी सूचक विधान केले होते. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एखाद्या विशिष्ट जात किंवा समुदायातून असणे गरजेचे नाही. त्यांना अभिवादन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. परंतु, काही लोक आताच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. काही लोक माझ्यासोबत नमाजसाठी यायचे. आता पहिल्यांदाच त्यांना चैत्यभूमीवर पाहिले. असे विधान नवाब मलिकांनी केले होते.
मुंबईच्या किनारपट्टीवर 2 ऑक्टोबरच्या क्रूझ पार्टीवर एनसीबीने धाड टाकली होती. यातून अभिनेता शाहरुख खानच्या मुलासह अनेकांना अटक करण्यात आली. त्यानंतरच नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकानंतर एक आरोप करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी वानखेडेंवर आर्यन खानचे अपहरण करून 25 कोटींची खंडणी मागितल्याचे आरोप केले.
यानंतर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय मुस्लिमच असून सरकारी सेवा आणि इतर लाभ मिळविण्यासाठी त्यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बनवल्याचे आरोप केले. या दरम्यान, मलिकांनी वेळोवेळी माध्यमांसमोर येऊन वानखेडे यांच्या वडिलांचे नाव सुद्धा ज्ञानदेव नसून दाऊद असल्याचा दावा केला. त्यावरूनच ज्ञानदेव वानखेडेंनी मलिकांच्या विरोधात गुन्हेगारी स्वरुपाच्या मानहानीचा खटला दाखल केला. सध्या हा खटला हायकोर्टात असून आधीच मलिकांनी एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यात वानखेडे कुटुंबियांवर काहीही बोलणार नाही असे त्यांनी लिहून दिले होते. मात्र, 6 डिसेंबर रोजी केलेल्या सूचक विधानानंतर मलिक पुन्हा अडचणीत सापडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.