आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) भारतीय सागरी हद्दीत सुमारे 15,000 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केलेत. NCB उपमहासंचालक (ऑप्स) संजय कुमार सिंह यांनी शनिवारी सांगितले की, NCB व भारतीय नौदलाने हिंदी महासागरात एक मोहीम राबवली. त्यात किंमतीच्या बाबतीत आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचा स्रोत पाकिस्तान आहे. हे अंमली पदार्थ इराणच्या चाबहार बंदरातून आले होते.
उल्लेखनीय बाब म्हणजे एनसीबीने शनिवारी एका विशेष कारवाईत केरळच्या कोची किनारपट्टीवरून 12,000 कोटी रुपयांचे 2,500 किलो ड्रग्ज जप्त केले होते.
संजय कुमार यांच्या माहितीनुसार, मदर शिप समुद्रात अनेक ठिकाणी तैनात करण्यात आले होते. वेगवेगळ्या देशांच्या छोट्या बोटी मदर शिपपर्यंत पोहोचायच्या आणि तेथून ड्रग्ज आपापल्या देशात नेत होत्या. अंमली पदार्थांची ही खेप श्रीलंका, मालदीव व भारतासाठी आली होती. या कारवाईत एका पाकिस्तानी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
ऑपरेशन समुद्रगुप्त फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू
संजय कुमार म्हणाले की, आम्ही फेब्रुवारी 2022 मध्ये ऑपरेशन समुद्रगुप्त सुरू केले. या कारवाई अंतर्गत पथकाने आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे 4 हजार किलो ड्रग्ज जप्त केले. या कारवाईत फेब्रुवारी 2022 मध्ये NCB व भारतीय नौदलाच्या संयुक्त पथकाने पहिल्यांदा गुजरातच्या किनारपट्टीवरून 529 किलो चरस, 221 किलो मेथॅम्फेटामाइन व 13 किलो हेरॉईन जप्त केले होते.
हे ड्रग्ज बलुचिस्तान व अफगाणिस्तानमधून आले होते. या प्रकरणी एका संशयित पाकिस्तानी नागरिकालाही ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये संयुक्त पथकाने केरळ किनारपट्टीवर एक इराणी बोट रोखली. तिच्यातूनही 200 किलो उच्च दर्जाचे हेरॉईन जप्त करण्यात आले. या कारवाईत 6 इराणी ड्रग्ज तस्करांनाही अटक करण्यात आली.
एनसीबीची श्रीलंका - मालदीवसोबत संयुक्त मोहीम
भारतीय नौदलाशिवाय एनसीबीने ऑपरेशन समुद्रगुप्तसंबंधी श्रीलंका व मालदीवसोबतही काम केले आहे. त्यांनी एकमेकांशी माहिती सामायिक केली. त्यानुसार श्रीलंकेच्या नौदलाने डिसेंबर 2022 व एप्रिल 2023 मध्ये 2 मोहिमा राबवल्या.
या प्रकरणी 286 किलो हेरॉईन व 128 किलो मेथाम्फेटामाइन जप्त करून 19 ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली. त्यानंतर मार्च 2023 मध्ये, मालदीव पोलिसांनी 4 किलो हेरॉईन जप्त करत 5 तस्करांच्या मुसक्या आवळल्या.
मदरशिप म्हणजे काय
मदरशिप हे एक मोठे जहाज असते. ते पाकिस्तान व इराणच्या आसपास मकरान किनार्यालगत वेगवेगळ्या बोटींना ड्रग्जचा पुरवठा करते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.