आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:स्मशानात चिमुकलीवर बलात्कार करून हत्या; तेथेच केला अंत्यविधी, कर्मकांड करणाऱ्या पुजाऱ्यासह चौघे अटकेत

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीत नऊ वर्षांच्या मुलीवर स्मशानात बलात्कार करण्यात आला. त्यानंतर हत्या करून तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी स्मशानात कर्मकांड करणारा एक पुजारी आणि स्मशानातील तीन कर्मचाऱ्यांना अटक केली. दिल्ली महिला आयाेगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू करत नैऋत्य दिल्लीच्या पोलिस उपायुक्तांना (डीसीपी) पाच ऑगस्टला दुपारी बोलावले आहे. डीसीपी इंगित प्रताप सिंह यांनी सांगितले की, घटना जुन्या नांगल गावची आहे. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता ही मुलगी स्मशानात वॉटर कूलरमधून थंड पाणी आणण्यास गेली होती. सुमारे सहा वाजता पुजारी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मुलीच्या आईला फोन करून बोलावले आणि तिचा मृतदेह दाखवला.

कूलरचे पाणी पिताना विजेचा धक्का बसल्याने तिचा मृत्यू झाला, असा दावा त्यांनी केला. त्यांनी तिच्या मनगटावर, कोपऱ्यावर भाजल्याच्या खुणाही दाखवल्या. प्रकरण पोलिसांत गेले तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला जाईल आणि डॉक्टर महत्त्वाचे अवयव काढून विकतील, अशी भीती कुटुंबीयांना दाखवली. अशा प्रकारे घाबरवून त्यांनी कुटुंबाला अंत्यसंस्कारासाठी राजी केले. पीडित कुटुंबाला संशय आल्याने त्यांनी लोकांसोबत निदर्शने सुरू केली. तेव्हा पोलिसांनी पीडितेच्या आईचा जबाब नोंदवला. पुजारी राधेश्याम (५५) आणि सलीम, लक्ष्मीनारायण, कुलदीप या चौघांना अटक करण्यात आली. सोमवारी पॉक्सोसह इतर कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.

राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले. काँग्रेस खासदार शक्तीसिंह गोहिल यांनी मंगळवारी राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...