आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात पुन्हा एकदा नवे रुग्ण वाढण्याचा ट्रेंड दिसू लागला आहे. ८ जून रोजी नव्या रुग्णांची संख्या ७ हजारांवर गेली. २५-२६ मे रोजी हा आकडा हजारांजवळ होता. म्हणजे केवळ १५ दिवसांतच नवे रुग्ण साडेतीनपट वाढले आहेत. नवे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे सक्रिय(उपचाराधीन) रुग्णांची संख्या १५ दिवसांत दुप्पट झाली आहे.
सर्वात चकित करणारी बाब म्हणजे चार राज्ये मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम आणि मणिपूर वगळता देशाच्या सर्व राज्य-केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवीन रुग्णांत वाढ होत आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये नव्या रुग्णांचा आकडा कमी होण्याचे एक कारण असेही होऊ शकते की, या दोन राज्यांत लोकसंख्येच्या हिशेबाने चाचणी दिल्ली-चंदीगडच्या तुलनेत १० पट कमी होत आहे.
चिंतेचे दुसरे कारण संसर्ग दराची(टेस्ट पॉझिटिव्हिटी दर) वेगवान वाढ आहे. देशात संसर्गाचा दर १.४% झाला आहे. हा गेल्या आठवड्यात १% पेक्षा कमी होता.
..सक्रिय रुग्ण दुप्पट पण चौथी लाट नाही
केरळमध्ये संसर्ग दर ११% वर गेला आहे. एवढाच तो अमेरिकेत आहे. तेथे रोज १ लाख नवे रुग्ण नोंदले जात आहेत. महाराष्ट्र आणि गोव्यातही संसर्ग दर ५% पेक्षा जास्त झाला आहे. या कारणामुळे मुंबईत नवे रुग्ण १७०० पार झाले. हा २९ जानेवारीनंतर सर्वात उच्च स्तर आहे.
कोरोनामुळे रोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या १० च्या जवळ आहे. महिन्यापूर्वी हा ३० वर होता. तज्ज्ञांनुसार, आगामी दिवसांत यात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे.
नवा व्हेरिएंट नसल्याने सध्या धोका नाही
(अतुल पेठकर | नागपूर)
सध्या मुंबईसह काही शहरांत आढळून येणारे बीए.४ व बीए.५ हे ओमायक्राॅनचे विस्तारित रूप आहे. हा नवा व्हेरिएंट नसल्याने घाबरून जाण्याचे काही एक कारण नाही. त्यामुळे नवा व्हेरिएंट नसल्याने भारताला सध्या तरी चौथ्या लाटेचा धोका नाही, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथीचे आणि संसर्गजन्य रोग विभागाचे माजी प्रमुख पद्मश्री डाॅ. रमण गंगाखेडकर यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली. भारतात ओमायक्राॅनची तिसरी लाट असतानाच सर्वसाधारणपणे १०० पैकी ७५ जणांना “बीए.२’ या नव्या व्हेरिएंटची लागण होऊन गेलेली आहे. बीए.४ व बीए.५ हे त्याच्याच कुटुंबातील आहेत.
मुंबईत रुग्णसंख्येत वाढ
मुंबई शहर, उपनगरांतील रुग्णालयांमध्ये ५०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. २० दिवसांपूर्वी ५० होते. यात दिलासादायक बाब म्हणजे, व्हेंटिलेटरवर असणारे रुग्ण सध्या केवळ ३ आहेत. २० दिवसांपूर्वीही ही संख्या ३ होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.