आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या व्हेरिएंटचा शिरकाव:मुंबईत सापडला कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण, बाधित महिला आफ्रिकन, 10 फेब्रुवारीपासून भारतातच, डॉक्टर म्हणाले- धोका किती हे आताच सांगणे कठीण!

मुंंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड-19 चा नवा व्हेरिएंट देशात आढळून आला आहे. XE नावाचा हाइब्रिड म्यूटंट स्ट्रेन मुंबईत आढळून आला आहे. नव्या व्हेरिएंट बाधित रूग्णात आतापर्यंत कोणतीही गंभीर लक्षणे दिसलेली नाही असे मुंबई महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वैद्यकीय अहवालानुसार, XE प्रकार हा ओमिक्रॉन उप-प्रकार - BA.1 आणि BA.2 चा हाइब्रिड म्यूटेंट स्ट्रेन असल्याचे म्हटले जात आहे. XE प्रकाराची पहिली केस यूकेमध्ये 19 जानेवारी रोजी आढळून आली. येथे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननेही ओमिक्रॉनच्या XE प्रकारासंदर्भात दक्षतेबाबत सूचना जारी केल्या आहेत.

बाधित महिला दक्षिण आफ्रिकन, 50 वर्ष वय

राज्याच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले की, संबंधित रुग्णाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार असून त्यानंतरच नव्या व्हेरिएंटवर शिक्कामोर्तब केले जाईल. मुंबईत पन्नास वर्षे वयाच्या एका दक्षिण आफ्रिकन महिलेच्या प्राथमिक तपासणीत XE हा नवा व्हेरियंट आढळला आहे.

10 फेब्रुवारीपासून भारतात

बाधित महिला दक्षिण आफ्रिकेतून भारतात 10 फेब्रुवारी रोजी आली होती. 27 फेब्रुवारी रोजी कोरोना चाचणीत ही व्यक्ती कोविड बाधित आढळली. तिचा नमुना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्यात आला. प्राथमिक तपासणीत तो XE व्हेरीयंट असल्याचे आढळले. त्यानंतर GISAID च्या तपासणीतही व्हेरियंट XE असल्याचे आढळले असले तरी या नवीन व्हेरियंटची खात्री करण्यासाठी राष्ट्रीय प्रयोगशाळेत या नमुन्याचे पुन्हा एकदा क्रमनिर्धारण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महिलेला कोणतेही लक्षणे नाही

महिला रुग्णाला कोणतेही लक्षणे दिसून आली नाहीत. दुसऱ्यांदा केलेल्या कोविड चाचणीत महिला कोविड निगेटिव्ह आढळली आहे. विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून यामुळे सर्वसामान्य जनतेने घाबरून न जाता आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे, असं आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

नवा व्हेरिएंट किती धोकादायक आताच सांगणे कठीण

या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) औरंगाबाद येथील मेडीकल विभागप्रमुख तथा कोरोना विषाणुविषयक अभ्यासिका डॉ. मीनाक्षी भट्टाचार्या यांनी सांगितले की, नवा व्हेरीयंट हा प्रकार ओमिक्रॉनचाच आहेत. BA.1, BA.2 असे त्याचे नाव असून हा नवा व्हेरीएंट किती धोकादायक आहे आणि व्हेरिएंट किती लोकांना बाधित करेल हे मात्र अजून स्पष्ट झाले नाही त्यामुळे आताच या व्हेरिएंटची तिव्रता किती हे सांगता येणार नाही.

स्वतःला आणि कुटुंबाला अधिक सुरक्षित करून लसीकरण करून घ्यावे, ज्येष्ठ व्यक्तींना बुस्टर डोस देणे आवश्यक असून कोरोनाविषयक नियमावलींचे पालन प्रत्येकाने करावे ही गरजही त्यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...