आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना काळामुळे व्यवसाय जगतातील सर्वच समीकरणे बदलली. लॉकडाऊन ते अनलॉक ते न्यू नॉर्मल अशा अभूतपूर्व टप्प्यांनी उद्योग- व्यवसायांची परंपरागत चौकट मोडली. वर्क फ्रॉम होम, ऑटोमेशन, घरपोच सेवा, इनोव्हेशन, कमी खर्चात दर्जेदार उत्पादन आणि बिझनेस मॉडेल्सची पुनर्रचना या बाबी आता सर्वच व्यवसायांच्या केंद्रस्थानी राहतील. कर्मचाऱ्यांची काळजी, व्यवसायातील जोखमीचा विमा याकडेही व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक आणि कॉर्पोरेट जगताचे लक्ष राहील.
उद्योगविश्वाला तेजीची आशा
तज्ज्ञांच्या मते, नव्या वर्षात राज्यातील ऑटोमोबाइल, वस्त्रोद्योग, बिल्डिंग मटेरियल, वित्तीय पुरवठा या क्षेत्रांत तेजी राहील. माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, सॉफ्टवेअर क्षेत्रात संमिश्र स्थिती राहण्याची अपेक्षा आहे. एफएमसीजी, अन्न प्रक्रिया, आरोग्य, विमा, बँकिंग, औषध निर्माण, सोने, चांदी, ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रात मात्र मोठी तेजी राहील. पर्यटन, व्हॉस्पिटॅलिटी, पीआर, इव्हेंट्स, आयात-निर्यात, विमान वाहतूक, पेट्रोलियम उत्पादने व पुरवठा आदी क्षेत्रे नव्या संकल्पना, सहभाग आणि उपक्रमांना चालना देत गेल्या वर्षभरात आलेली मरगळ घालवण्यासाठी पुढे सरसावतील.
इनोव्हेशनला पर्याय नाही
व्यवसाय, व्यापारात टिकायचे असेल तर नवीन संकल्पना, इनोव्हेशनला पर्याय नाही हे कोरोना काळाने दाखवून दिले. त्यामुळे सातत्याने नवे काही करत ग्राहकांचे समाधान करणारी सेवा देण्यावर यापुढे भर राहील. कॉर्पोरेट जगतात ऑनलाइन मीटिंग हा नवा ट्रेंड आता चांगलाच रुजला आहे. छोट्या दुकानदारांनीही विविध पेमेंट अॅपची मदत घेत आपले ग्राहक टिकवले. तत्पर सेवा, कमी खर्चात दर्जेदार उत्पादन आणि ग्राहकांचे समाधान यासाठी प्रत्येक व्यवसायात नवनव्या संकल्पना उदयास येतील.
नवतंत्रज्ञानाचा वापर आणि कौशल्य विकासात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. नव्या वर्षात राज्यातील अनेक उद्योगांमध्ये, विशेषत: ऑटोमोबाइल, आयटी, फार्मा, हेल्थ केअर इक्विपमेंट निर्मिती कंपन्यांमध्ये ऑटोमेशनचा वापर वाढत जाईल. कोरोनामुळे रोख व्यवहारांना चालना मिळाली. डिजिटल पेमेंटमध्ये दुपटीने वाढ झाली, यूपीआय निर्देशांक १.८ पटीने वाढल्याचे रिझर्व्ह बँकेचा अहवाल सांगतो. छोट्या फेरीवाल्यांपासून ते अब्जावधीची उलाढाल असलेल्या कॉर्पोरेट कंपन्यात डिजिटल व्यवहार वाढले. दुसरीकडे, ‘असोचेम’ने २०२१-२२ पर्यंत अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल, असा अंदाज वर्तवला आहे. या संभाव्य सुधारणेत उद्योगविश्वातील नव्या कार्यप्रणालीचा मोठा वाटा असेल.
कोरोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ ही नवी संस्कृती उदयाला आली. कॉर्पोरेट कंपन्यापासून ते लघुउद्योगांपर्यंत साऱ्यांना तिचा लाभ झाला. आगामी काळात घरातून काम करण्याची ही संस्कृती चांगलीच रुजण्याची चिन्हे आहेत. कोरोनामुळे बिझनेस ऑटोमेशनला नव्याने झळाळी मिळते आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ऑटोमेशनच्या मदतीने स्वयंपूर्णता, ग्राहकांच्या अपेक्षापूर्तीसाठी डेटा अॅनालिसिस यावर भर राहील. त्याला अनुसरूनच व्यावसायिक धोरणे ठरतील. उत्पादन प्रक्रिया ते तयार उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रत्येक टप्प्यावर ‘एआय’चा आधार घेतला जाईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.