आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वयंपाकाच्या गॅसची किंमत कमी करण्याच्या मुद्यावरून तामिळनाडूच्या महिलांनी थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना घेराव घातल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे अवाक झालेल्या सीतारामन यांनी गॅस दरवाढीवरील आपले मत व्यक्त केले. तसेच ही दरवाढ का होत आहे व ती केव्हा थांबेल याचे समर्पक उत्तरही दिले. या अनपेक्षित प्रसंगामुळे सीतारामन यांच्यासोबत असलेले अधिकारी चांगलेच बुचकळ्यात पडले.
गृहिणींनी घातला घेराव
अर्थमंत्री निर्मला सीतारामन तामिळनाडूच्या कांचीपुरम जिल्ह्यातील पाजहियसीवरम या आपल्या गावात गेल्या होत्या. तेथून त्यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ‘वॉल टू वॉल’अभियानाची सुरुवात केली. यावेळी एक अनपेक्षित घटना घडली. आपल्या गावात थेट केंद्रीय अर्थमंत्री आल्याचे पाहून गावच्या महिलांनी थेट त्यांना घेरावर घालून स्वयंपाकाचा गॅस स्वस्त करण्याची मागणी केली. गॅस दरवाढीमुळे आपले बजेट बिघडल्याचेही त्यांनी सांगितले.
अर्थमंत्र्यांनी काढली समजूत
महिलांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने सीतारामन काहीवेळ भांबावल्या. त्यानंतर त्यांनी त्यांना गॅस दरवाढीमागील कारण सांगून त्यांची समजूत काढली. त्या म्हणाल्या - स्वयंपाकाच्या गॅसची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ठरवली जाते. स्वयंपाकाचा गॅस आपल्या देशात तयार होत नाही. आपण तो केवळ आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गॅस दरवाढ झाली तर आपसूकच आपल्याकडेही ती लागू होते.
त्याच धर्तीवर आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतीत घट झाली तर त्याचा फायदा भारतातही दिला जातो. मागील 2 वर्षांत सिलिंडच्या किंमतीत फारशी घट झाली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सीतारामन यांचे हे उत्तर ऐकून गृहिणींचे समाधान झाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे एका सिलिंडरची किंमत 1100 रुपयांच्या घरात पोहोचली आहे.
दुसरीकडे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी स्थानिकांशी संवाद साधून त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे किंवा नाही याची विचारणा केली. त्यानंतर त्यांनी एका स्थानिक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्याच्या घराच्या भींतीवर कमळाच्या फुलाचे चिन्ह काढले. अर्थमंत्र्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मोहिमेला वॉल टू वॉल थीमचे नाव दिले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.