आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच गृह राज्यमंत्री आणि पश्चिम बंगालमधील खासदार निशीथ प्रमाणिक यांच्या राष्ट्रीयतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. मोदी मंत्रीमंडळातील सर्वात कमी वयाचे मंत्री प्रमाणिक हे बांगलादेशी नागरिक असल्याचा दावा आसाममधील काँग्रेसचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा यांनी पंतप्रधानांना लिहलेल्या पत्रात केला आहे. त्यांनी प्रमाणिक यांचे जन्म ठिकाण आणि राष्ट्रीयता तपासण्याची मागणी आपल्या पत्राव्दारे केली आहे. परंतु, आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीदेखील हा मुद्दा उचलून धरला आहे.
खासदार बोरा यांनी काही माध्यमांचा हवाला देत प्रमाणिक हे बांगलादेशी नागरिक असल्याचे सांगितले होते. त्यासोबतच परदेशी नागरिक हे देशाचे केंद्रीय मंत्री आहेत ही किती गंभीर आणि चिंताजनक बाब असल्याचे म्हणाले होते. बोरा यांनी पंतप्रधानांना पत्र लिहित ही परिस्थिती स्पष्ट करत सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी केली होती.
भाजपने हे आरोप फेटाळून लावले
खासदार बोरा यांच्या या मागणीचे काही नेत्यांनी समर्थन केले आहे. परंतु, भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहे. त्यांनी यासंदर्भांत पुरावे द्यावे केवळ बोट दाखवणे पुरेसे नाही असे पश्चिम बंगाल राज्याचे प्रवक्ता समिक भट्टाचार्य यांनी म्हटले आहे. गृह राज्यमंत्री प्रमणिक यांच्या नागरिकत्वाच्या संदर्भात अद्याप कोणी पुरावे सादर केलेले नाहीत असेही ते म्हणाले.
बांगलादेशाच्या पोस्टरवरुन झाला होता वाद
निशिथ प्रमाणिक यांच्या नागरिकत्वावर सर्वात आधी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने वाद सुरु झाला. जेंव्हा प्रमाणिक यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा पदभार स्विकारला होता. तेंव्हा 'बांगलादेशातील गायबंधा जिल्ह्यातील हरिनाथपूरचा यशस्वी मुलगा' असे त्यांचे वर्णन त्या पोस्टमध्ये करण्यात आले होते.
तसेच त्यांनी पश्चिम बंगालमध्ये संगणक शास्त्राचे शिक्षण घेतल्याचेही उल्लेख या पोस्टमध्ये केले गेले होते. हे पोस्टर पूजार मेळा नावाच्या एका संघटनेने शेअर केले असून ते स्वत:ला बांगलादेशमधील धार्मिक संघटन असल्याचे सांगतात. त्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलेट केली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.