आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तीन कृषी कायद्यांबाबब सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये विज्ञान भवनात शुक्रवारी झालेली १२ व्या फेरीतील चर्चाही निष्फळ ठरली. यावेळी पुढील चर्चेची तारीखही ठरली नाही. तर आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश आणि ४१ शेतकरी नेत्यांमध्ये ५ तासांपैकी केवळ अर्धा तास चर्चा होऊ शकली. तोमर म्हणाले, कायद्यांना दिलेली स्थगिती फार तर दोन वर्षे करता येईल. यापेक्षा अधिक काही करता येणार नाही. हा आमचा प्रस्ताव, तुमच्या हिताचा आहे. यावर विचार करावा. यावर प्रस्ताव मान्य नसल्याचे शेतकरी नेते म्हणाले. तीनही कायदे रद्द करणे आणि एमएसपी (किमान आधारभूत किंमत) कायदा बनवण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली.
अकालीचे नेते मनजिंदर सिंग सिरसांवर गुन्हा
शीख गुरुद्वारा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसांविरोधात दिल्ली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मनजिंदर हे शेतकरी आंदोलनाचे समर्थक आहेत.
प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर परेड काढणार
आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर परेडही निघेल. कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी मात्र पोलिसांची राहील, असा इशारा शेतकरी नेते जगजित सिंग दल्लेवाल यांनी दिला.
आंदोलन सुरू राहावे म्हणून कुणाची तरी फूस
आंदोलन सूरूच राहण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करत असल्याचा आरोप कृषी मंत्री तोमर यांनी केला. काही लोकांना केवळ शेतकऱ्यांच्या आडून फायदा करून घ्यायचा आहे, असेही ते म्हणाले.
शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पोहोचल्या राज्यातील शेतकरी विधवा
नाशिक | त्यांच्यापैकी अनेक जणी प्रथमच जिल्ह्याबाहेर पडल्या आहेत. दिल्लीला तर सगळ्याच पहिल्यांदा आल्या. प्रजासत्ताकदिनी परेड पाहण्यासाठी देशभरातून लोक दिल्लीत येतात, पण या प्रजासत्ताकदिनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी “किसान बचाव यात्रा’ घेऊन दिल्लीत पोहोचल्या आहेत. देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद ज्या जिल्ह्याच्या नावेे आहे त्या यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पोहोचल्या आहेत.
शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्याचे प्रयत्न केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू असले तरी अजून ताेडगा दृष्टिपथात नाही. या स्थितीत महाराष्ट्रातून गेलेल्या या महिला दिल्लीच्या सर्व सीमांवर भेट देेऊन त्या शेतकरी कायद्यांबाबत आपले म्हणणे मांडणार असल्याचे व आंदोलनास पाठिंबा देणार असल्याची माहिती अपर्णा मालीकर यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली. ३७ वर्षांच्या अपर्णा १२ वर्षांपासून शेतकरी विधवा म्हणून शेती आणि संसार सावरण्यासाठी संघर्ष करीत आहेत. केंद्र सरकारचे हे कायदे देशातील शेतकऱ्यांची, महिला शेतकऱ्यांची आणि विधवा शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच खालावणारे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी पांढरकवडा या शेतकरी आत्महत्यांसाठी सर्वाधिक संवेदनशील तालुक्यातील विधवांना घेऊन त्या दिल्लीत पोहोचल्या आहेत. “आमची आठ एकर शेती आहे, पण पाणी नाही, भाव नाही, अशा वेळी ते देण्याऐवजी लादले जाणारे हे कायदे आम्हाला मान्य नाहीत’, मालीकर म्हणाल्या.
याच देशातील शेतकऱ्यांचा खरा चेहरा
या कायद्यात जी गाजरं दाखवण्यात आली ते खुले बाजार, करार शेती हे सारे याआधी अनेक वेळा प्रत्येक सरकारने करून झालेले आहे. यातून आत्महत्या थांबल्या नाहीत. त्यामुळेच लाखो शेतकरी विधवा कष्टप्रत जगत आहेत. हे कायदे रद्द करा, हीच या विधवांचीही मागणी आहे. - किशोर तिवारी, किसान बचाव यात्रा संयोजक
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.