आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सांगलीतील शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. राज ठाकरेंना 8 जुन रोजी हजर होण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहे. 2008 मधील हे प्रकरण आहे. सांगलीत मराठी पाट्यांसाठी मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन केले होते. तेव्हा काही मनसे कार्यकर्त्यांसह राज ठाकरेंविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचप्रकरणी आता शिराळा कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वाॅरंट जारी केले आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली होती. राज्यात दुकानांवरील पाट्या या मराठीत असाव्यात, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यासाठी मनसैनिकांनी मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी आक्रमक आंदोलन केली होती. सांगलीतदेखील मनसैनिक रस्त्यावर उतरले होते. मराठी पाट्यांच्या मागणीसाठी काही कार्यकर्त्यांनी दुकाने बळजबरी बंद करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधान 109,117,143 आणि मुंबई पोलीस कायदा 135 नुसार मनसे कार्यकर्ते व राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष
तब्बल 10 वर्षांपुर्वी दाखल या गुन्ह्याप्रकरणी सांगलीतील शिराळा कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यानुसार शिराळा कोर्टाने 6 एप्रिलरोजीच हे वॉरंट काढल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी राज ठाकरे यांना कोर्टात हजर करावे, असे आदेश सांगली कोर्टाने पोलिसांना दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पोलिस याप्रकरणी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.