आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअयोध्येत राजकारण करण्यासाठी नाही, तर रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. शिवसेनेचे हिंदुत्व स्पष्ट आहे. त्यामुळे या दौऱ्याला राजकीय रंग देऊ नये, असे पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी अयोध्येतील पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याआधीच दौरा करून त्यांनी आमचे हिंदुत्व खरे हे सांगण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या चार वर्षांत मी अयोध्येत चौथ्यांदा आलाे आहे. २०१८ मध्ये आम्ही अयोध्येत आलो होतो. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
आधी मंदिर नंतर सरकार’ अशी घोषणा केली होती. त्यानंतर योगायोगाने मंदिराच्या बाजूने निकाल लागला आणि संपूर्ण प्रकिया झाली, असेही ते म्हणाले.
आमच्यासाठी शक्ती आणि भक्ती एकच : निवडणुका आणि राजकारण यांचा काहीच संबंध नाही. शक्ती आणि भक्ती आमच्यासाठी एकच आहे. आमची भक्ती हीच आमची शक्ती आहे आणि हाच आमचा धर्म आहे. त्यामुळे आम्हाला शक्तिप्रदर्शनाची गरज नाही. शिवसेनेचे हिंदुत्व सगळ्यांना माहिती आहे. “प्राण जाए पर वचन ना जाए’. मुंबईत रामाच्या आशीर्वादाने रामराज्य येईल, असा विश्वासही या वेळी त्यांनी व्यक्त केला. अयोध्येत साधू-महंतांकडून स्वागत करण्यात आले. ७० च्या दशकात इस्कॉन मंदिराला बाळासाहेबांनी भेट दिली होती. त्यामुळे इस्कॉन ट्रस्टने मला बोलावल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले.
राज ठाकरेंवर बोलणे टाळले : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, मी दुसऱ्याच्या भूमिकेवर बोलणार नाही. भाजप नेते व राज यांना विरोध करणारे बृजभूषण सिंह यांच्याशी फोनवरून बोलणे झाले. कोरोनाकाळात महाराष्ट्रात परराज्यातील लोकांना प्राधान्य दिले. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडू शकतो. दुसऱ्या पक्षाची नाही. केंद्रीय तपास यंत्रणा आता प्रचार यंत्रणा झाल्या असून ते पक्षाच्या अंग झाल्या आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, आदित्य यांच्यासोबत शिवसेना नेते संजय राऊत, अनिल देसाई, मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह हजाराे शिवसैनिकांची उपस्थिती होती.
शरयू तीरावर सायंकाळी महाआरती : आदित्य ठाकरे यांनी आपल्या दिवसभराच्या दौऱ्यात मंदिराला भेटी देण्यासह काही राजकीय मंडळींशी चर्चा केली. सायंकाळी संत-महंतांच्या उपस्थितीत त्यांनी सायंकाळी शरयू नदीच्या तीरावर महाआरती केली. या वेळी हजारो शिवसैनिकांची उपस्थिती होती.
अयोध्येत १०० खोल्यांचे महाराष्ट्र सदन उभारणार
श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून हजाराे भाविक जात असतात. या भाविकांची सोय होण्यासाठी महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी जागा द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करणार आहेत. सरकार अयोध्येत १०० खोल्यांचे महाराष्ट्र सदन बांधणार आहे.
अयोध्येत आदित्य ठाकरे यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते आरतीही झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.