आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झारखंडमध्ये राजकीय संकट:CM हाऊसमधून आमदारांना घेऊन निघाल्या 3 बस, खूंटीच्या लतरातू डॅमवरील रिसॉर्टमध्ये थांबणार

रांची3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडमधील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सीएम हाऊसमधून 3 लग्झरी बसच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. बसमध्ये काँग्रेस व झामुमोचे 36 आमदार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री हेमंत सोरेनही बसले आहेत. त्यांनी आमदारांसोबत एक सेल्फीही घेतला.

तिन्ही बस पोलिस सुरक्षेत खूंटीच्या लतरातू डॅम भागात नेल्या जात आहेत. तिथे एक तात्पुरते रिसॉर्ट तयार करण्यात आले आहे. या रिसॉर्टमध्ये हे आमदार थांबतील. यासाठी या भागात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दुसरीकडे, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोठा दावा केला आहे. 'या बसमध्ये केवळ 33 आमदार जात आहेत. सत्ताधाऱ्यांचे 10 ते 11 आमदार अजूनही संपर्कात नाहीत,' असे ते म्हणालेत.

सत्तासंघर्षाचे अपडेट्स...

  • झारखंड काँग्रेसने रात्री 8.30 वा. विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. प्रदेश प्रभारी अविनाश पांडेंच्या नेतृत्वात ही बैठक होईल.
  • राज्यसभा खासदार महुआ माजी म्हणाल्या की, ऑपरेशन लोटस सुरूच राहणार. महाराष्ट्रात झाले, दिल्लीत प्रयत्न झाला. बिहारमध्येही प्रयत्न करण्यात आला. अनेक ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे खबरदारीस्तव सर्वजण एकत्र आलेत.
  • आमदारांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये गाणी वाजत आहेत.
  • आमदारांनी आपण पिकनिकला जात असल्याचे म्हटले आहे.
  • शिफ्टिंगपूर्वी सीएम हाऊसमध्ये महाआघाडीच्या आमदारांची बैठक झाली.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बसमध्ये आपल्या आमदारांसोबत सेल्फी घेतली.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बसमध्ये आपल्या आमदारांसोबत सेल्फी घेतली.

हेमंत सोरेन यांचे छोटे बंधू व दुमकाचे आमदार वसंत सोरेनही बैठकीला आले होते. त्यांच्याच नेतृत्वात आमदारांना अन्यत्र हलवण्यात येणार आहे. पण मंत्री चंपई सोरेन यांनी आमदारांना कुठेही नेले जाणार नसल्याचा दावा केला आहे.

दुसरीकडे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारी रद्द होण्यासंबंधीची अधिसूचना शनिवारी कोणत्याहीवेळी जारी होण्याची शक्यता आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी सोरेन यांची आमदारी रद्द केली आहे. निवडणूक आयोगाने पाठवलेल्या शिफारशीच्या आधारावर त्यांनी ही कारवाई केली.

दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्रभर आमदारांची मोजणी सुरू होती. महाआघाडीच्याने शनिवारी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाआघाडीची एकजूटता दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दररोज मुख्यमंत्री निवासस्थानी येणाऱ्या आमदारांची नोंदही केली जात आहे.

दुसरीकडे, भाजपने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे. सोरेन यांचे विधानसभेचे सदस्यत्व गेल्यास त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल होऊ शकतो, असे भाजपने म्हटले आहे.

त्यातच सोरेन यांनी या संपूर्ण घटनाक्रमावर सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. शुक्रवारी रात्री ते एका ट्विटद्वारे म्हणाले - 'आम्ही सत्तेचे लोभी नाही. केवळ घटनात्मक व्यवस्थेमुळे आम्ही या पदावर आहोत. कारण, याच माध्यमातून लोककल्याणाची कामे करता येतात.'

आता पुढे काय...

नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर सोरेन देणार राजीनामा

या प्रकरणी निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी झाल्यानंतर राज्यपाल मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजीनामा देण्याचे निर्देश देऊ शकतात. तसेच झारखंड विधानसभेचे अध्यक्ष रविंद्रनाथ महतो यांनाही आयोगाच्या अधिसूचनेची माहिती देण्यात येईल.

संख्याबळाच्या आधारावर झामुमोला मिळेल सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण

सोरेन यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राज्यपाल राज्यातील सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देतील. संख्याबळाच्या आधारावर सध्या झारखंडमध्ये झामुमो हाच सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे साहजिकच राज्यपालांना सोरेन यांच्याच झामुमोला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण द्यावे लागेल.

आमदारांचा झामुमोला पाठिंबा

सद्यस्थिती पाहता झामुमोने यापूर्वीच आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे समर्थन पत्र तयार करवून घेतले आहे. झामुमो व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्यात. सूत्रांच्या माहितीनुसार, 42 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र या आघाडीकडे तयार आहे.

CM च्या निवडणूक लढवण्यावर सस्पेन्स

दुसरीकडे, मुख्यमंत्री एका ठराविक मुदतीपर्यंत निवडणूक लढवणार किंवा नाही याविषयी सस्पेन्स आहे. राजभवनातील सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यपालांनी सध्या मुख्यमंत्र्यांची आमदारकी रद्द केली आहे. अपात्र ठरवल्यानंतर अद्याप कुणीही आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व गेले तर ते राजीनामा दिल्यानंतर तत्काळ त्यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड होऊ पुन्हा राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा दावा करतील. पण हे सर्वकाही नोटिफिकेशन जारी झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

CM म्हणाले - झारखंडमध्ये बाहेरची टोळी सक्रिय

हेमंत सोरेन यांनी अन्य एका ट्विटमध्ये झारखंडमध्ये बाह्य शक्तींची टोळी सक्रिय असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले - 'झारखंडमध्ये एक बाहेरील टोळी सक्रिय झाली आहे. मागील 20 वर्षांपासून या टोळीने राज्य उद्ध्वस्त करण्याचा संकल्प घेतला आहे. मतदारांनी 2019 मध्ये त्यांची सत्ता उलथावून टाकली. हे त्यांना सहन झाले नाही. आम्ही येथे टिकलो तर त्यांचे भविष्य संकटात सापडेल याची त्यांना भीती आहे. यामुळेच ते घटनात्मक संस्थांचा गैरवापर करत आहेत.'

बातम्या आणखी आहेत...