आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) यूजीसी़-नेट, इग्नू, ओपनमॅट व पीएचडी, दिल्ली विद्यापीठाच्या परीक्षा आणि आयसीएएमआर, एआईईएसह विविध परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार यूजीसी नेट परीक्षा १६ ते २५ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात येणार आहेत. दिल्ली विद्यापीठाची प्रवेश परीक्षा ६ सप्टेंबरपासून घेण्यात येईल. परीक्षेस बसणारे इच्छुक उमेदवार एनटीएच्या वेबसाइटवर संपूर्ण माहिती पाहू शकतात.
या सर्व परीक्षांचे आयोजन ६ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबरदरम्यान केले जात आहे. याशिवाय एनटीएने २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या एआयएजीपीईटी परीक्षा स्थगित करून २८ सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षांची प्रवेशपत्रे परीक्षा सुरू होण्याच्या १५ दिवस आधी पाठवण्यात येतील. एनटीएने सुरुवातीला या परीक्षा मे व जून महिन्यात घेण्याचे ठरवले होते. परंतु कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या. तत्पूर्वी एनटीएने जेईई मेन्स व एनईईटी यूजी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. आता जेईई मेन्स १ ते ६ सप्टेंबर व एनईईटी यूजी १३ सप्टेंबर रोजी होतील.
अॅडमिट कार्ड जारी केले, जेईई व नीट ठरलेल्या वेळेत
कोरोना साथरोग पाहता जेईई व नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी होत आहे. तथापि, शासनाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या परीक्षा आता स्थगित करू नयेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (एनटीए) जेईई मेन्ससाठी ६.५ लाख अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. या परीक्षा १ते ६ सप्टेंबरदरम्यान होतील, तर नीट १३ सप्टेंबर रोजी घेण्यात येईल. सूत्रांनी सांगितले, कोरोना विषाणूसंदर्भात सरकारने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल. परीक्षा केंद्र प्रत्येक सत्रापूर्वी सॅनिटाइझ केले जाईल. विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास फेस मास्क व ग्लोव्हजही दिले जातील. विद्यार्थ्यांचे करिअर अधांतरी लटकत ठेवणे योग्य नसल्याचे तसेच साथरोगाच्या काळातही पुढे वाटचाल सुरू ठेवावी लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले होते.
परीक्षांच्या तारखा
> यूजीसी नेट : १६-१८ व २१-२५ सप्टेंबर
> इग्नू ओपनमॅट : ५ सप्टेंबर
> डीयूईटी : ६-११ सप्टेंबर
> आयसीएआरए : (यूजी) ७-८ सप्टेंबर
> एआयएजीपीईटी : - २८ सप्टेंबर
> इग्नू पीएचडी : ४ ऑक्टाेबर
पंतप्रधान मोदींनी परीक्षांना स्थगिती द्यावी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढतील : स्वामी
नीट व जेईई मेन्स परीक्षा दिवाळीपर्यंत स्थगित कराव्यात, यासाठी शिक्षण मंत्रालयास निर्देश द्यावेत, असे आवाहन भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधानांना केले आहे. तसे न झाल्यास अनेक विद्यार्थ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल. स्वामी यांनी मुंबईचे उदाहरण देताना सांगितले, तेथे अद्यापही वाहतुकीची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे परीक्षा केेंद्रावर जाण्यासाठी २० ते ३० किमी अंतर गाठणे अवघड जाईल. अशा परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्त्वाच्या असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची पूर्ण तयारी झाल्यानंतरच या परीक्षा घेण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले. स्वामी यांनी यासंदर्भात शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांच्याशी चर्चा केली. स्वामी यांच्याव्यतिरिक्त एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेने या परीक्षा स्थगित करण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.