आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज नर्स डे. टिकमगड शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी वाहून घेतलेल्या ३९ वर्षीय परिचारिका प्रफुल्लित पीटर एका फुफ्फुसाच्या आधारे रुग्णांचे प्राण वाचवत आहे. ते जपण्यासाठी ती रोज प्राणायाम व फुगे फुुगवण्याचा व्यायाम करते. ती म्हणते, ‘मी एका फुप्फुसाने कोरोनाला हरवू शकते, मग तुम्हाला का शक्य नाही?’ तिची कहाणी तिच्याच शब्दांत...
रोज अर्धा तास प्राणायाम, फुगे फुगवून फुप्फुस निरोगी राखते, लवकरच सारे काही व्यवस्थित होईल. गेल्या एक वर्षापासून मी २ तास पीपीई किट घालून कोविड वॉर्डात ड्यूटी करत आहे. पहिल्या दिवशी थोडी घबराट झाली. मात्र, नंतर मला धीर आला. कारण, आम्हाला या विषाणूबद्दल खूप काही माहिती मिळाली होती. असा पहिला रुग्ण आला तेव्हा थोडी भीती वाटली. मात्र, हळूहळू आम्हालाही सवय झाली. पीपीई किट आणि दुहेरी मास्क लावून रुग्णांच्या सेवेत असते तेव्हा ‘आम्हाला केव्हा बरे वाटेल. तुम्ही इतके सुरक्षित कसे राहता’, असे रुग्ण विचारतात. मी त्यांना सांगते, तुम्हाला फक्त संसर्ग आहे. धीर धरा. लवकरच तुम्ही बरे होऊन परताल. मी रुग्णांना सांगते, ‘मी तर एकच फुप्फुस घेऊन जगते आहे.’ मी २०१४-१५ मध्ये आजारी पडले तेव्हा मला एक्स-रे काढावा लागला. तेव्हा मला कळले की, डावे फुप्फुस कामच करत नाही.
तिला काकांनी सांगितले की, लहानपणी दुखापत झाल्याने डॉक्टरांनी चक्क एक फुप्फुस काढून टाकले. मी रोज सकाळी साडेपाच वाजता उठून अर्धा तास प्राणायाम आणि फुगे फुगवण्याचा व्यायाम करते. कोरोना रुग्ण महेंद्र विश्वकर्मा आणि संजीव जैन यांची तब्येत खूपच बिघडली तेव्हा ते खूपच घाबरलेले होते. मी त्यांना धीर दिला. सांगितले, देव तुमच्या पाठीशी आहे. दोघेही आठ दिवसांत बरे झाले. माझ्या वॉर्डात ३० बेड आहेत. रुग्णांना वेळेवर औषध व त्यांची देखभाल करते. वर स्वत:ला व कुटुंबाला संसर्ग होऊ नये ही जबाबदारी वेगळीच. पती राजेंद्र आणि मुले ऑस्टिन व आश्विन सतत फोनवर माझी विचारपूस करतात. ही माझी ड्यूटी आहे. मला काही होणार नाही, असे मी त्यांना सतत सांगते. काही दिवसांपूर्वी माझ्या आतेसासूंचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर मलाही कोरोनाचा संसर्ग झाला. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असल्याने मी पूर्ण निरोगी राहिले. मला मनस्वी विश्वास वाटतो की, थोड्या दिवसांत ही सर्व परिस्थिती बदलेल. सारे काही ठीक होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.