आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका भाजी विक्रेत्याची मुलगी इंदूरमध्ये दिवाणी न्यायाधीश झाली आहे. बुधवारी 25 वर्षीय अंकिता नागरने सर्वप्रथम आपल्या आईला ही गोड बातमी दिली. आई हातगाडीवर भाजी विकत होती. निकालाची प्रिंटआऊट घेऊन अंकिता तिच्या आईकडे पोहोचली आणि म्हणाली – आई मी न्यायाधीश झाले आहे. हे ऐकून आईच्या डोळ्यातून आनंदाश्रूचा बांध फुटला. अंकिताने सांगितले की, निकाल आठवडाभरापूर्वी जाहीर झाला होता, पण एका जवळच्या नातेवाईकाच्या मृत्यूमुळे सर्वजण इंदूरच्या बाहेर गेले होते. त्यामुळे घरात शोकाकूल असे वातावरण होते. त्यामुळे मी याबद्दल कोणाला सांगू शकले नाही.
अंकिता नागरने दिवाणी न्यायाधीश परीक्षेत SC कोट्यातून 5 वा क्रमांक मिळविला आहे. अंकिताने सांगितले की, कुटुंबातील सर्व सदस्य भाजीविक्रीचे काम करतात. बाबा पहाटे 5 वाजता उठतात आणि मंडीला जातात. आई सकाळी 8 वाजता सगळ्यांसाठी जेवण बनवते आणि त्यानंतर बाबांना मदत करण्यासाठी भाजीच्या गाडीवर जाते, मग दोघे भाजी विकतात. मोठा भाऊ आकाश हा वाळू बाजारात मजुरीचे काम करतो.
छोट्याशा खोलीत दररोज 8 तास अभ्यास
अंकिताने दिव्य़ मराठीशी बोलताना सांगितले की, ती अभ्यासासाठी दिवसातून 8 तास देत असे. संध्याकाळी गाडीवर गर्दी झाली की ती भाजी विकायला जायची. रात्री दहा वाजता ते दुकान बंद करून घरी यायचे. मग ती रात्री अकरा वाजल्यापासून अभ्यासाला बसायची.
सर्वप्रथम आईला आनंदाची बातमी दिली
अंकिता म्हणाली, मी तीन वर्षांपासून दिवाणी न्यायाधीशपदासाठी तयारी करत आहे. 2017 मध्ये अंकिताने इंदूरच्या वैष्णव कॉलेजमधून LLB केले. यानंतर 2021 मध्ये LLM परीक्षा उत्तीर्ण झाली. कॉलेजची फी भरण्यासाठी वडील कर्ज काढायचे. कॉलेज संपल्यानंतर ती सतत दिवाणी न्यायाधीशा पदासाठी अभ्यास करायची. दोनदा निवड न झाल्यानंतरही तिने हार न मानता अभ्यासात सातत्य ठेवले. यानंतर तिला तिसऱ्यांदा परिक्षेत यश मिळाले. पालकही तिला नेहमी प्रोत्साहन द्यायचे. तिच्या या यशामागे तिच्या पालकांचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळेच अंकिताने निकाल लागताच सर्वप्रथम आई जिथे भाजी विकते त्याठिकाणी जावून ही गोड बातमी तिच्या आईला दिली.
आपला अनुभव सांगून अंकिता म्हणाली की, निकालाने निराश होऊ नका, निकालात कमी-जास्त मार्क्स हे येतच असतात. मात्र विद्यार्थ्यांनी नेहमी हिंमत न हारता पुन्हा प्रयत्न केले पाहिजे.भविष्यात निश्चितच त्याचे चांगले परिणाम दिसून येतील.
कठीण परिस्थितीत केला अभ्यास
अंकिताने सांगितले की, तिच्या घरातील खोल्या खूप लहान आहेत. उन्हाळ्यात छतावरील पत्रे एवढे गरम होतात की, घामाने पुस्तके भिजायची. पावसात पाणी टपकायचे. गर्मी पाहून भावाने मजुरीतून काही पैसे वाचवले आणि काही दिवसांपूर्वीच माझ्यासाठी कूलर घेतला. माझ्या कुटुंबाने माझ्या अभ्यासासाठी खूप काही केले आहे, ज्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.
अंकिता बनली आदर्श मुलगी
अंकिताचे वडील अशोक नागर यांनी सांगितले की, अंकिताने बराच काळ संघर्ष केला. आमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, अशा परिस्थितीत अंकिताच्या अभ्यासासाठी आम्हाला अनेकदा पैसे उसने घ्यावे लागले पण तिचा अभ्यास थांबू दिला नाही. तिच्या या यशामुळे आम्हाला तिचा अभिमान आहे. अंकिताची आई लक्ष्मी यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीच्या न्यायाधीश झाल्याची बातमी ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. खूप वेळ अश्रू थांबले नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.