आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
३५ दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून बसलेले शेतकरी आणि सरकार यांच्यातील बैठकीत तोडग्याबाबत सकारात्मकता दिसून आली. सरकारने शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या दोन मागण्या मान्य केल्या. दोन मागण्यांबाबत ४ जानेवारीला बैठक होईल. बैठकीनंतर कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले, शेतकऱ्यांच्या निम्म्या मागण्या मान्य झाल्या, असे समजा. नंतर शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल व राकेश टिकेत म्हणाले, आज सरकारची भूमिका चांगली होती. त्यांनी आमच्या अजेंड्यावरील ४ पैकी २ मागण्या मान्य केल्या. यामुळे आम्ही ३१ डिसेंबरची प्रस्तावित ट्रॅक्टर रॅली रद्द केली आहे.
बैठकीनंतर पुन्हा एकदा सरकारने आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले. म्हटले की, उर्वरित दोन मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन केली जाईल. त्यावर शेतकरी म्हणाले, आम्हाला समिती नको. कृषी कायदे रद्द करणे व एमएसपीचा कायदा करण्याच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाहीत. जेवणाच्या वेळी तोमर यांनी अमित शहा यांच्याशी फोनवरून चर्चा केली. नंतर शेतकऱ्यांना सांगितले की, आंदोलन मागे घेतल्यास एमएसपीचा कायदा करण्यावर चर्चा केली जाईल. मात्र, शेतकऱ्यांनी नकार दिला.
पालिका निवडणूक : भाजपने अंबाला, सोनिपत मनपा गमावल्या
चंदीगड | हरियाणात बुधवारी ७ पालिकांची निवडणूक झाली. यात तीन मनपा आहेत. अंबाला व सोनिपतमध्ये भाजपचे महापौरपदाचे उमेदवार पराभूत झाले. सोनिपतमध्ये काँग्रेस विजयी झाली. अंबालामध्ये माजी काँग्रेस नेते (आता नवा पक्ष) विनोद शर्मा यांची पत्नी महापौर झाल्या. महापौरपदासाठी थेट मतदान झाले. आतापर्यंत या दोन्ही शहरांत भाजपचे महापौर होते. या भागात शेतकरी आंदोलनाचा प्रभाव आहे. पंचकुलातही निवडणूक झाली. तेथे महापौर बनवण्यात भाजपला यश आले. तेथे आतापर्यंत काँग्रेसचा महापौर होता. तीन नगरपालिका व एका नगर परिषदेचीही निवडणूक झाली. रेवाडीत भाजप अध्यक्षपद वाचवण्यात यशस्वी ठरला.
पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांच्या स्थितीवर दु:खी आहेत : राजनाथ
शेतकरी आंदोलनावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर दिले. सरकार संवेदनशील नसल्याचे राहुल यांनी म्हटले होते. यावर राजनाथ म्हणाले, ‘राहुल माझ्यापेक्षा लहान आहेत. शेतीबाबत त्यांच्यापेक्षा जास्त माहिती मला आहे. मी शेतकरी तर पंतप्रधानांनी गरीब आईच्या पोटी जन्म घेतला आहे. शेतकरी आंदोलन करत असल्यामुळे केवळ मीच नव्हे तर पंतप्रधानदेखील दु:खी आहेत.
सौहार्दाचा लंगर
शेतकऱ्यांनी ७ व्या बैठकीतही सरकारी भोजन नाकारले. गुरुद्वारामधून लंगर आला होता. मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि पीयूष गोयलांनी स्वत: वाढण्यास सुरुवात केली. ही भूमिका आवडल्याचे शेतकरी म्हणाले.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या २ मागण्या केल्या मान्य
1. पाचट जाळल्यास गुन्हेगारी खटला दाखल होणार नाही: सध्या १ कोटी रुपये दंड आणि ५ वर्षे कैदेची तरतूद आहे. सरकार ही तरतूद हटवण्यास तयार झाले.
2. वीज अधिनियम मसुद्याचे कायद्यात रूपांतर नाही : शेतकऱ्यांना भीती आहे की, या कायद्यामुळे विजेवरील अनुदान बंद होईल. आता तो कायदा होणार नाही.
या २ मागण्यांवर ४ जानेवारीला पुन्हा होणार बैठक
1. तिन्ही नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.
2. एमएसपीचा कायदा करा, जेणेकरून शेतकऱ्यांना याेग्य मूल्य मिळेल.
शेतकरी नेते जगजित डल्लेवाल म्हणाले, ‘४ जानेवारीला तुम्हाला चांगला संदेश देऊ, असे आम्ही मंत्र्यांना सांगितले आहे. यासाठी ३१ डिसेंबरची ट्रॅक्टर रॅली रद्द करत आहोत.’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.