आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • One Country One Exam: Approval For Establishment Of National Recruitment Institute; Improving The Recruitment Process

भरती प्रक्रियेत सुधारणा:एक देश-एक परीक्षा, राष्ट्रीय भरती संस्थेच्या स्थापनेस मंजुरी; ग्रुप 'बी' आणि 'सी'साठी एकच परीक्षा...

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या परीक्षा 12 वेगवेगळ्या भाषांमध्येही घेता येतील, देशभरात एक हजारावर परीक्षा केंद्रे उभारली जाणार

सरकारी नोकर भरतीच्या प्रक्रियेत केंद्राने मोठा बदल केला आहे. केंद्रीय कॅबिनेटने बुधवारी राष्ट्रीय भरती संस्थेच्या (एनआरए) स्थापनेला मंजुरी दिली. बी व सी ग्रुपच्या अतांत्रिक पदांसाठी उमेदवारांच्या स्क्रीनिंगसाठी ही संस्था सामायिक पात्रता परीक्षा (सीईटी) घेईल. यामुळे परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना अनेक पदांसाठी पात्र हाेण्याची संधी मिळेल. प्राथमिक परीक्षेत पात्र ठरणारे उमेदवार व्हेकन्सीनुसार परीक्षेला बसू शकतील.

या निर्णयामुळे दरवर्षी सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षेला बसणाऱ्या अडीच ते तीन कोटी तरुणांना मोठा दिलासा मिळेल. त्यांना विविध अर्जांसाठी वेगवेगळी फीस भरावी लागणार नाही. केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह म्हणाले, देशभरात हजारापेक्षा जास्त केंद्रे स्थापली जातील. प्रत्येक जिल्ह्यात किमान एक केंद्र असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, राष्ट्रीय भरती संस्था कोट्यवधी तरुणांसाठी वरदान ठरेल. सीईटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या परीक्षा संपुष्टात आणून वेळ व संसाधनांची बचत होईल, पारदर्शकताही वाढेल. सरकारने एनआरएसाठी १,५१७.५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

सीईटीचा स्कोअर ३ वर्षांपर्यंत मान्य, राज्ये आणि खासगी क्षेत्रांनाही जोडणार

> राष्ट्रीय भरती संस्था कोणकोणत्या परीक्षा घेईल?

स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी), सर्व रेल्वे भरती बाेर्ड व इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग सर्व्हिस पर्साेनलद्वारे (आयबीपीएस) अतांत्रिक पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा आता ही संस्था घेईल. भविष्यात जवळपास सर्व संस्थाही त्याच्याशी जोडल्या जातील.

> राज्य सरकारी संस्थांचा यात समावेश नाही का?

सध्या सीईटीच्या गुणांचा वापर उपरोक्त प्रमुख संस्थाच करतील. कालांतराने केंद्राच्या इतर भरती संस्थाही त्याचा अवलंब करतील. सीईटीचे गुण केंद्र, राज्य सरकारे व खासगी क्षेत्रातील इतर भरती संस्थांशी शेअर होतील.

> एनआरएद्वारे संचालित सीईटीमध्ये पात्र ठरताच उमेदवारांची नाेकरी पक्की होईल का?

तूर्त नाही. मात्र, भविष्यात असे शक्य आहे. सीईटी सध्या फक्त टिअर-१ परीक्षा आहे. म्हणजेच ती फक्त स्क्रीनिंग/शाॅर्टलिस्टिंगसाठी आहे. सीईटी देणारे परीक्षार्थी व्हेकन्सीनुसार पुढील उच्चस्तरीय परीक्षेसाठी सर्व संस्थांकडेही अर्ज करू शकतील. सीईटी स्काेअरच्या आधारावर या संस्था स्वतंत्रपणे टिअर-२ व टिअर-३ च्या विशेष परीक्षा घेतील. तथापि, काही सरकारी विभागांनी भरतीसाठी दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा समाप्त करणे व फक्त सीईटी गुणांच्या आधारावर उमेदवारांची शारीरिक व वैद्यकीय चाचणी करून नियुक्तीचे संकेत दिले आहे.

> १२वी पास वा पदवीधरांसाठी वेगळी भरती परीक्षा असते. सीएटीत व्यवस्था कशी असेल?

शैक्षणिक पातळीच्या आधारावर एनआरएही ३ पातळ्यांवर सीएटी घेईल. अतांत्रिक पदांसाठी १० वी, १२ वी पदवीधर उमेदवारांसाठी वेगवेगळ्या परीक्षा होतील. मात्र अभ्यासक्रम एकच असेल. आता प्रत्येक परीक्षेसाठी वेगवेगळा अभ्यासक्रम नसेल.

> सीईटीचे गुण किती वर्षे मान्य असतील? तसेच ही परीक्षा किती वेळा देता येईल?

सीईटीचा स्कोअर निकालाच्या तारखेपासून ३ वर्षांपर्यंत वैध असेल. तो वाढवण्यासाठी उमेदवारांना कितीही वेळा परीक्षा देता येईल. वयोमर्यादा सध्याच्या नियमांनुसार असेल. सध्याच्या धोरणानुसारच एससी, एसटी, आेबीसी व इतर श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

> सीईटीसाठी नावनोंदणीची प्रक्रिया कशी असेल? परीक्षा केंद्रे कशी ठरवली जातील?

परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांना पोर्टलवर नावनोंदणी करावी लागेल. सोबतच पसंतीचे परीक्षा केंद्र नोंदवता येईल. उपलब्धतेच्या आधारावर त्यांना परीक्षा केंद्र दिले जाईल. सरकारने देशभरात एक हजार परीक्षा केंद्रे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

> नव्या व्यवस्थेमुळे काय फायदा होईल?

उमेदवारांना नोकरीसाठी परीक्षेत भाग घेणे व तयारीसाठी लागणारा महत्त्वाचा वेळ, पैसे व काठिण्य बऱ्याच अंशी कमी होईल. सीईटीद्वारे भरतीचे चक्रही कमी होईल. प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असल्यामुळे दूरवरच्या क्षेत्रात राहणाऱ्या उमेदवारांना फायदा होईल. उमेदवारांना परीक्षा शुल्कासह प्रवास, राहण्यावरही बराच खर्च करावा लागतो. सीईटीसारख्या एकाच परीक्षेमुळे उमेदवारांवरील आर्थिक बोजा कमी होईल.

बातम्या आणखी आहेत...