आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला देशातील तीन मोठी मंदिरे - तिरुपती बालाजी, शिर्डीचे साईबाबा व वैष्णाेदेवीच्या दर्शनासाठी उपलब्ध सर्व तिकिटे संपली आहेत. कोरोनामुळे तीनही मंदिरांत दर्शनासाठी आगाऊ बुकिंग आवश्यक आहे. यामुळे तिन्ही मंदिरांच्या व्यवस्थापनाने १ जानेवारीला न येण्याचे आवाहन केले आहे. नवीन वर्षानिमित्त या मंदिरांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत ३०% कमी भाविक येण्याची ही पहिलीच वेळ असेल. दुसरीकडे अयोध्येत भाविकांची संख्या ठरवण्यात आलेली नाही. तेथे कोरोनामुळे रामलल्लांच्या दर्शनासाठी रोज सुमारे ४०० भाविक येताहेत.
वैष्णोदेवी : निगेटिव्ह अहवाल दाखवणे आवश्यक
जम्मूतील कटरामध्ये वैष्णोदेवी मंदिरात १५ हजार भाविकांनी तिकिटे बुक केली आहेत. भाविकांना ऑनलाइन तिकीट काढण्याबरोबरच कटरात आल्यानंतर मागील ४८ तासांत केलेल्या कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल दाखवावा लागेल. दर्शनासाठी पायी जाण्याबरोबरच रोप वे आणि हेलिकॉप्टर सेवेसाठीही आगाऊ बुकिंग करावी लागेल. कटरामध्ये विश्रामगृह आणि हॉटेल्समध्ये बुकिंग दरात ४०% आणि उपाहारगृहात २०% पर्यंत सूट दिली जात आहे.
शिर्डी : १२ हजार भाविकांनाच घेता येईल दर्शन
साईबाबा मंदिरात १२ हजार जणांनाच दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे. पुढील दहा दिवसांतील सर्व ऑनलाइन तिकिटे बुक झाली आहेत. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी सांगितले की, रोजच्या ६ हजार तिकिटांची ऑनलाइन बुकिंग करण्यात आली आहे, तर ६ हजार मंदिराबाहेरील काउंटरवरून दिली जात आहेत. ऑनलाइन बुकिंगची किंमत २०० रुपये आहे. मंदिर काउंटरवर तिकीट नि:शुल्क आहे. बाहेरून येणाऱ्यांनी ऑनलाइन तिकीट बुक करूनच शिर्डीत यावे.
तिरुपती : या वेळी वैकुंठद्वार 10 दिवसांसाठी उघडणार
स्थानिक भाविकांसाठी १० हजार आणि बाहेरच्या भाविकांसाठी ३० हजार तिकिटे देण्यात आली आहेत. या वेळी विशेष म्हणजे २५ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत मंदिराचे विशेष वैकुंठद्वार (उत्तर द्वार) उघडण्यात आले आहे. दरवर्षी ते केवळ वैकुंठ एकादशी आणि द्वादशी हे दोन दिवस उघडते. कोरोनामुळे या वेळी दर्शन तिकीट दाखवल्यानंतरच अलिपिरीहून पुढे जाण्याची परवानगी असेल. १ जानेवारीला व्हीआयपी दर्शनाची सोय नसेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.