आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण:प्रवेशाआधीच राजकारणातून बाहेर, तरीही रजनीकांतचा मतांवर प्रभाव, तामिळनाडूत सर्वांनाच हवा सुपरस्टारचा पाठिंबा

चेन्नई4 महिन्यांपूर्वीलेखक: आर. रामकुमार
  • कॉपी लिंक
  • डीएमकेच्या मंचावर ओवेसींच्या येण्याच्या घोषणेने वाद; स्टॅलिन यांचे घूमजाव, म्हणाले- बोलावले नाही

१९९६ मध्ये रजनीकांत राजकारणापासून लांब होते... मात्र त्यांचे एकच वाक्य -‘जयललिता पुन्हा विजयी झाल्यास देवही तामिळनाडूला वाचवू शकणार नाही’- निवडणुकीच्या निकालाची दिशा ठरवण्यासाठी पुरेसे होते. त्या वेळी झालेल्या राजकीय वादामुळे जयललितांना अखेर पद सोडावे लागले. या वेळीही रजनीकांत निवडणूक मैदानात नाहीत. प्रवेश न करताच राजकारणातून बाहेर गेलेले रजनीकांत तामिळनाडूत तेवढेच प्रभावी आहेत. प्रकृतीच्या कारणामुळे राजकारणात न येण्याच्या त्यांच्या घोषणेमुळे सत्ताधारी एआयएडीएमके व विरोधी पक्ष डीएमके सुटकेचा श्वास घेत असतानाच द्रविड प्रवाहापेक्षा वेगळी राजकीय आघाडी उघडण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या भाजपची प्रतीक्षा अजून लांबली आहे. मात्र, या सर्व पक्षांना रजनीकांतच्या ताकदीची जाणीव आहे. त्यामुळेच त्यांच्या घोषणेनंतर जवळपास सर्वच पक्षांनी त्यांच्या पाठिंब्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तामिळनाडूत यंदा एप्रिल-मेमध्ये निवडणुकीची शक्यता आहे. दोन्ही प्रमुख पक्ष एआयएडीएमके व डीएमके त्यांचे शक्तिशाली नेते जयललिता व करुणानिधी यांच्याशिवाय निवडणूक लढवत आहेत. रजनीकांत मैदानात उतरल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे लोक सहज आकर्षित होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ते निवडणूक लढवत नसले तरी त्यांचा मतदारांवर चांगलाच प्रभाव असेल. त्यामुळेच भाजपचे तामिळनाडू प्रभारी सी. टी. रवी असो की एआयएडीएमकेचे मंत्री डी. जयकुमार दाेघांचे म्हणणे आहे की, त्यांच्या पक्षाच्या विचारसरणीशी रजनीकांत खूप जवळचे आहेत. एआयएडीएमके एनडीएचा घटक असला तरी राज्यात मुख्यमंत्र्यावरून दोन्ही पक्षांत तणाव आहे. दोघांना रजनीकांतच्या नावाचा वापर करायचा आहे. कमल हसन यांचा पक्ष एमएनएमनेही रजनीकांतचा पाठिंबा मागितला आहे. आता राजकारणाला ना म्हणणारे सुपरस्टार या निवडणुकीत कोणत्या पक्षासाठी हुकमाचा एक्का सिद्ध होतात हे बघावे लागेल.

डीएमकेच्या मंचावर ओवेसींच्या येण्याच्या घोषणेने वाद; स्टॅलिन यांचे घूमजाव, म्हणाले- बोलावले नाही
जे थेट मैदानात नाहीत त्यांच्यावरून तामिळनाडूत वाद सुरू आहे. रजनीकांतची एक्झिट चर्चेत असतानाच विरोधी पक्ष डीएमकेच्या मंचावर एआयएमआयएमचे ओवेसी यांच्या येण्यावर वाद सुरू आहे. सोशल मीडियावर या निमंत्रणाचे वृत्त पसरताच स्वत: डीएमकेने स्पष्ट केले की, ते ६ जानेवारीला होणाऱ्या रॅलीत येणार नाहीत. बिहार निवडणुकीनंतर ओवेसींवर भाजपची बी टीम असल्याचे आरोप झाले होते. एकीकडे डीएमकेला राज्यातील ५.८६% मुस्लिम लोकसंख्येचे मन जिंकण्यासाठी आेवेसींची सोबत हवी आहे. मात्र, डीएमकेसोबत असलेले आययूएमएल व एमएमकेच नव्हे तर डीएमकेचा एक गटही त्याविरोधात आहे. या निवडणुकीत ओवेसींच्या पक्षाने उत्तर तामिळनाडूतील २०-२५ जागांवर उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले आहेत. ओवेसींना सोबत घेणे डीएमकेसाठी चांगले असले तरी त्यासाठी आपल्या सहकाऱ्यांना राजी करावे लागेल, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...