आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ब्रिटनमधून कोरोनाचे नवे स्वरूप समोर आल्यानंतर जगभरात चिंता वाढली आहे. भारताने गेल्या एक महिन्यात (२५ नोव्हेंबर ते २२ डिसेंबरपर्यंत) ब्रिटनमधून भारतात आलेल्या सर्व लोकांची यादी तयार केली आहे. ही यादी राज्यांनाही दिली जात आहे. केंद्रानुसार, एक महिन्यात एकूण ५०,८३२ लोक ब्रिटनमधून भारतात आले आहेत. सर्वाधिक १६,२८१ लोक दिल्लीत आले आहेत. ब्रिटनमधून आलेल्या सर्व लोकांची तपासणी सुरू झाली आहे.
सरकारने मंगळवारी ब्रिटनमधून आलेल्या लोकांच्या निगराणीसाठी एसओपी जारी केली. त्यांची कोरोना तपासणी होईल. पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांचे नमुने लॅबमध्ये पाठवले जातील. ब्रिटनमधून संसर्ग सुरू झालेले कोरोनाचे नवे स्वरूप त्यांच्यात आहे का, हे तपासले जाईल. हे नवे स्वरूप ७०% जास्त वेगाने पसरते. त्यामुळे भारतासह एकूण ४९ देशांनी ब्रिटनहून आलेल्या विमानांवर बंदी घातली आहे. मंगळवारी १५०० वर लोक ब्रिटनमधून भारतात आले. त्यापैकी २४ जण संक्रमित आढळले. सर्वांचे अहवाल रात्रीपर्यंत आले नव्हते, त्यामुळे ही संख्या वाढू शकते.
कोरोनाचे नवे स्वरूप आतापर्यंत भारतात नाही : पॉल
नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही. के. पॉल म्हणाले की, ‘ब्रिटनमध्ये जो नव्या स्वरूपातील कोरोना समोर आला आहे, तो आतापर्यंत भारतात कुठे दिसला नाही. या नव्या स्वरूपाचा कोरोनाच्या सध्याच्या लसींच्या विकसित होण्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाही.
लस नव्या स्वरूपावर परिणामकारक : बायोएनटेक
बायोएनटेक आैषध कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) उगुर साहीन म्हणाले की, ‘घाबरण्याची गरज नाही. कोरोनाची लस नव्या स्वरूपावरही परिणामकारक ठरेल, अशी वैज्ञानिकदृष्ट्या जास्त शक्यता आहे.’ बायोएनटेक अमेरिकी कंपनी फायझरसोबत कोरोना लस विकसित करत आहे.
एसओपी : सेल्फ-डिक्लेरेशन द्या, १४ दिवसांची ट्रॅव्हल हिस्ट्रीही सांगा
1. १५ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर या काळात थेट ब्रिटनमधून किंवा तेथील एखाद्या विमानतळावरून भारतात आलेल्या प्रवाशांवर एसओपी लागू राहील. त्यांना आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल.
2. प्रवाशांना १४ दिवसांची ट्रॅव्हल हिस्ट्री सांगावी लागेल. एक स्वघोषणा (सेल्फ-डिक्लेरेशन) पत्रही भरावेे लागेल.
3. जर ते कोरोनाबाधित आढळले तर नव्या स्वरूपाचा संसर्ग झालेला तर नाही, हे शोधण्यासाठी आणखी चाचणी होईल.
4. बाधित आढळल्यानंतर कोरोनाच्या सध्याच्या उपचारांसोबतच दोन आठवडे आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. जोपर्यंत कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत आयसोलेशन राहील.
5. बाधित आढळलेल्या प्रवाशासोबत प्रवास करणाऱ्यालाही क्वॉरंटाइन केले जाईल. विमानतळ प्राधिकरणास सांगण्यात आले आहे की, त्यांनी या एसओपीबाबत सर्व प्रवाशांना सूचित करावे. एसओपी लागू करण्याची जबाबदारी राज्यांची असेल.
अनेक देशांत, कोरोनाचे नवे स्वरूप, अनियंत्रित नाही : डब्ल्यूएचओ
डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे की, ब्रिटनमध्ये कोरोनाचे जे स्वरूप आले आहे ते अनेक देशांतही आहे. तर, डब्ल्यूएचओचे आपत्कालीन व्यवस्था प्रमुख मायकेल रियान म्हणाले की, ‘कोरोनाच्या नव्या स्वरूपाला नियंत्रित केले जाऊ शकते. याआधी आम्ही या विषाणूच्या घातक संसर्गाला अनेक ठिकाणी नियंत्रित केले आहे.
लसीत भेसळ आढळल्यास मध्य प्रदेशात जन्मठेप : डब्ल्यूएचओ आणि इंटरपोलने लसीत भेसळीची भीती व्यक्त केली आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले, औषधी व खाद्यपदार्थातील भेसळ थांबवण्यासाठी दंड विधी (मप्र दुरुस्ती) विधेयक लवकरच विधानसभेत सादर केले जाईल. याअंतर्गत भेसळखोरांना जन्मठेप होऊ शकते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.