आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाक लष्कर व आयएसआयला भारतात अशांतता निर्माण करावयाची असून, ते आपल्या स्वार्थासाठी काश्मिरी तरुणांचा गैरवापर करत आहेत. हे मत आहे पाकव्याप्त काश्मिरात शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या एका माजी अतिरेक्याचे. दिव्य मराठीच्या मुदस्सर कुल्लु यांच्यासोबतच्या एका मुलाखतीत मोहम्मद फारुख खान उर्फ सैफुल्ला फारुख यांनी आपला पाकने कसा गैरवापर केला याविषयीची आपबिती कथन केली.
श्रीनगरमध्ये राहणाऱ्या मोहम्मद फारुख खान यांनी सांगितले की, 1989 मध्ये खोऱ्यात दहशतवादाची लाट आली होती. तेव्हा ते अल्पवयीन होते व अन्य मुलांसारखेच ते सुद्धा अतिरेकी कारवायांत सहभागी झाले होते. त्यांना नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मिरात नेण्यात आले. तिथे त्यांना एके-47 सह अनेक शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर ते परत काश्मीरला आले व अतिरेकी झाले. 1991 पर्यंत ते एक सक्रिय दहशतवादी होते.
काश्मिरी तरुणांचा वापर करुन पैसे कमावत आहेत फुटिरतावादी
फारुख यांनी सांगितले की, पाक लष्कर व आयएसआयला भारतात अशांतता निर्माण करावयाची आहे. ते आपल्या स्वार्थासाठी काश्मिरी तरुणांचा गैरवापर करत आहेत. असे करुन फुटिरतावादी अमाप पैसे कमावत असून, मोठ-मोठे हॉटेल तयार करत आहेत.
तिहार तुरुंगात फारुख यांनी जैश ए मोहम्मदचे संस्थापक मौलाना मसूद यांची भेट घेतली होती
निष्पाप लोकांच्या हत्येनंतर दहशतवादापासून झाले दूर
ते म्हणाले, एक दिवस अतिरेक्यांनी एका विद्यापीठाचे कुलगुरु मुशीर उल हक यांची हत्या केली. त्यामुळे त्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले. ‘आपण स्वातंत्र्यासाठी लढत असताना तुम्ही निष्पाप लोकांना का मारले,‘ असा प्रश्न त्यांनी आपल्या सहकारी अतिरेक्यांना विचारला. त्याचे त्यांना कोणतेच उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी हा मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला. ते पोलिसांना शरण आले.
माजी अतिरेक्यांच्या पुनर्वसनासाठी स्थापन केली संघटना
फारुख यांनी सांगितले की, ते 8 वर्ष तुरुंगात राहिले. या काळात तिहार तुरुंगात त्यांनी जैश-ए-मोहम्मदचे संस्थापक मौलाना मसूद यांची भेट घेतली. सुटकेनंतर ते एखाद्या सर्वसामान्य नागरिकासारखे जीवन जगत आहेत. त्यांनी काही माजी अतिरेक्यांच्या मदतीने दहशतवादाचा मार्ग सोडणाऱ्या तरुणांच्या पुनर्वसनासाठी जम्मू-काश्मीर मानव कल्याण संघटना स्थापन केली आहे. यासाठी अनेक पोलीस अधिकाऱ्यांनीही त्यांची मदत केली. त्यांच्या मते, भारत आपली मातृभूमी आहे. आता आम्ही आमच्या अधिकारांसाठी लढत आहोत. आम्हाला आमच्यासाठी पासपोर्ट हवा आहे. मुलांच्या भविष्यासाठी सरकारची मदत हवी आहे.
दिशाभूल झालेल्या तरुणांना दहशतवाद सोडण्याचे आवाहन
‘तुम्ही दहशतवादी संघटनेत का सहभागी झालात?’ असा प्रश्न त्यांना केला असता फारुख म्हणाले, ‘1989 मध्ये अनेक मुले दहशतवादी संघटनांत सहभागी झाले. 1986 च्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्यामुळे असे घडले होते. यूनायटेड जिहाद काउंसिलचे प्रमुख सय्यद सलाउद्दीन, जे सध्या पाकमध्ये आहेत, त्यांनीही निवडणूक लढवली होती. पण, ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी बंदूक हाती घेतली. सलाउद्दीन यांचा पराभव झाला नसता, तर कदाचित त्यांनी बंदूक हाती घेतली नसती’. फारुख यांनी दिशाभूल झालेल्या तरुणांना दहशतवाद सोडण्याचेही आवाहन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.