आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजकाल ऑनलाइन गेमिंग अॅप्सचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. कित्येक जण तासनतास ते खेळत राहतात. काही हरतात, तर काही जिंकतात. या ऑनलाइन खेळांमुळेच एक अतिशय मनोरंजक प्रकरण समोर आले आहे, यात गेमिंग अॅप लुडो (LUDO) खेळत असताना पाकिस्तानमधील एक मुलगी यूपीमधील एका मुलाच्या प्रेमात पडली. दोघांचं प्रेम इतकं वाढलं की, तिने सीमेच्या भिंती झुगारून पाकिस्तानातून थेट भारत गाठले.
दोन्ही प्रेमीयुगुलांना अटक
यानंतर मग या मुलानेही हिंमत दाखवत मुलीला आपली जीवनसाथी बनवण्याचा निर्णय घेतला. दोघांनी लग्न केले आणि बंगळुरूमध्ये एकत्र राहू लागले. पण आता दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक करून भारतात प्रवेश करून येथे वास्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे. मुलीसोबतच या फसवणुकीत तिची साथ देणाऱ्या मुलालाही अटक करण्यात आली आहे.
काय आहे नेमकी घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय मुलायम सिंह यादव हा तरुण मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तो बंगळुरू येथील एचएसआर लेआउट या खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. मुलायम आपला बराच वेळ गेमिंग अॅप लुडो खेळण्यात घालवायचा. याच गेमच्या माध्यमातून तो पाकिस्तानातील हैदराबाद येथे राहणाऱ्या 19 वर्षीय इक्रा जीवनी या तरुणीच्या संपर्कात आला. दोघेही प्रेमात पडले आणि त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मुलायम यांच्या सांगण्यावरून 19 वर्षीय पाकिस्तानी तरुणीने सप्टेंबर 2022 मध्ये नेपाळच्या काठमांडूमार्गे भारतात प्रवेश केला. ही पाकिस्तानी मुलगी आणि तिचा प्रियकर मुलायम दोघेही बंगळुरूच्या बेलंदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेबर क्वार्टरमध्ये राहू लागले. मात्र, त्यांचे हे गुपित फार काळ जगापासून लपून राहू शकले नाही. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी कारवाई करत दोघांनाही अटक केली.
पोलिसांनी या पाकिस्तानी मुलीला फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी मुलाविरुद्धही गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. बनावट पद्धतीने कागदपत्रे बनवून शहरात राहिल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.