आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनगर:काश्मिरातून परप्रांतीयांचे पलायन, खोऱ्यात 2 दिवसांत 4 बिगर काश्मिरींच्या हत्यांनी दहशत

श्रीनगर / हारून रशीद/मुदस्सिर कुल्लूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसांत ४ बिगर काश्मिरींच्या हत्येमुळे बाहेरील राज्यांतून आलेले लोक दहशतीत आहेत. सोमवारी मोठ्या संख्येने लोक काश्मीरहून जम्मूला गेले. अनेक जण जम्मूतूनही आपल्या राज्यात परत गेले. ५ ऑक्टोबरपासून आजवर ज्या ५ जणांना अतिरेक्यांनी मारले, त्यात ४ बिहार आणि १ उत्तर प्रदेशातील होता. या महिन्यात आजवर १२ नागरिकांची हत्या झाली. यात ७ स्थानिक आहेत. साधारणपणे मजूर हिवाळा सुरू झाल्यावर घराकडे परततात. परंतु दहशतीमुळे हे लोक आधीच परतत आहेत. श्रीनगरहून जम्मूपर्यंत रोज डझनभर टॅक्सी चालत होत्या. आता त्यांची संख्या ४० वर पोहोचली. जम्मूला जाणाऱ्या बस खच्चून भरत आहेत. सोमवारी रेल्वेस्टेशन, बसस्टँडवर मजुरांचे समूह रवाना होत होते. नाैगाम स्थानकावर मोठ्या संख्येने प्रवासी मजूर बनिहाल रेल्वेगाडीसाठी रांगा लावून होते.

भारतीय लष्कर, निमलष्करी दलांच्या कॅम्पमध्ये कामगार, मजुरांना आश्रय देण्याचे केंद्राचे आदेश
श्रीनगर | जम्मू आणि काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग वाढल्यामुळे बिहार, उत्तर प्रदेश व झारखंडमधील मजूर, कामगार आणि हातावर पोट असलेल्यांना सैन्यदलांच्या कॅम्पमध्ये आश्रय देण्याचा आदेश भारत सरकारच्या वतीने देण्यात आला आहे. टार्गेट किलिंगमुळे प्रभावित जिल्ह्यांमध्ये विविध सैन्यदलांच्या बटालियन्सला यासंबंधीचे तोंडी आदेश गृह विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी संघटना बाहेरराज्यातील नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्या हत्या करत आहेत. या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख एम. एम. नरवणे, सीआरपीएफचे महासंचालक, एनआयए व आयबीचे महासंचालक श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत. गेल्या आठ दिवसांत काश्मिरात ९ जवान शहीद झाले. शाळेतील शिक्षकांसह १३ नागरिकांना लक्ष्य करण्यात आले असून १३ चकमकीत १४ अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे.

मजुर निघून गेले तर नुकसान : उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंडमधील मजूर बांधकाम क्षेत्रासह सफरचंद बागांमध्ये येथे काम करतात. याशिवाय पर्यटन स्थळांमध्ये हॉटलमध्ये वेटरचे काम करणे, झाडू पोछा मारणे यासह इतरही काम करतात. पोटापुरते धान्य त्यांना मिळते, वर पैसेही मिळतात. थोडे पैसे जमा झाले की हे मजूर छटपुजेला गावी जातात. कोविड काळात लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर मजूर निघून गेल्याने जम्मू आणि काश्मिरच्या पुलवामा, अनंतनाग, गांदरबल, बांदीपोरा, हंदवाडा , पंपोर, बडगाम आदी सफरचंद, अक्रोड आणि केसर उत्पादक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सफरचंद झाडावर सडून गेली होती तर अक्रोडही वेळेत न काढल्यामुळे बाजारपेठेपर्यंत नेता आले नव्हते. त्यामुळे टारगेट किलींग असेच चालू राहिले तर मजूर मिळणे कठीण होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

मोठ्या हत्यारांऐवजी पिस्टलचा वापर : राज्यात शस्त्र परवान्यासंबंधी नवे नियम लागू आहेत. यापूर्वी देशातील अन्य भागातील नागरिकांनाही सहज शस्त्र परवाने दिले जात. सैन्य आणि निमलष्करी दलातील जवानांपासून अधिकारीही मोठ्या प्रमाणावर येथूनच शस्त्र परवाने मिळवत असत. यामुळे मोठी शस्त्रे बाळगण्यावर निर्बंध आले. म्हणून आता दहशतवादीही छोट्या शस्त्राने हल्ले करू लागले आहेत. २०१८ मध्ये २७ पिस्टल, २०१९ मध्ये ४८,२०२० मध्ये १६३ तर २०२१ मध्ये आतापर्यंत १२६ पिस्टल जप्त करण्यात आल्या आहेत.

सुरक्षा वाढवली, सैन्यदल सतर्क
मंगळवारी ईद-उल-मिलादुन्नबी असल्याने सुरक्षा दलांनी सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. संपूर्ण श्रीनगरला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. डल लेक, लालचौक, विविध शासकीय संस्थांना मोठ्या प्रमाणावर सुरक्षा पुरविण्यात आली आहे. रेकी वाढविण्यात आली असून, येणाऱ्या जाणारांची कसून तपासणी केली जात आहे. प्रत्येक जवानाचा बंदूकीच्या ट्रीगरवर बोट आहे. पर्यटन स्थळांची सुरक्षा दुप्पटीने वाढविली आहे. गुलमर्ग, सोनमर्ग, पहेलगाम आदी ठिकाणी जाणारांची संख्या कमी झाली आहे.

केंद्राकडून गंभीर दखल
जम्मू व काश्मिरात सीआरपीएफ तैनात आहे. संपूर्ण राज्याची अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. सीमा सुरक्षा दल, इंडो तिबेट बॉर्डर पोलिस, सशस्त्र सीमा दलासह सैन्याच्या बटालियन्स मोठ्या प्रमाणावर तैनात आहेत. स्थानिक पोलिसांच्या मदतीने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडसह इतर राज्यातील नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्याचे तोंडी आदेश आहेत.

- मशिदींमधून आवाहन - बिगर काश्मिरींनी खोरे सोडून जाऊ नये
- काश्मिरातील विकास प्रकल्पांत ९०% कामगार बाहेरील राज्यातील आहेत. यात सर्वाधिक यूपी, बिहार आणि राजस्थानातील आहेत.
- काश्मिरात ५ लाख लोक बाहेरील राज्यातील आहेत. बहुतांश मजूर आहेत. ते हातगाडी- ठेला लावून आपली उपजीविका करतात.
- दुसरीकडे, मुस्लिम समुदाय प्रवासी श्रमिकांच्या समर्थनासाठी पुढे आला आहे. मशिदींतून त्यांना काश्मीर न सोडण्याचे आवाहन केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...