आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाहरुख खान-दीपिका पदुकोणच्या पठाणला 7 राज्यांत विरोध सुरू झाला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि महाराष्ट्रात निदर्शने होत आहेत. बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसह पाच जणांवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि अश्लीलता पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्तीसगडमधील शिवसैनिकांनी चित्रपटातून बेशरम रंग गाणे काढून टाकण्याची मागणी केली आहे. तसे न केल्यास हा चित्रपट छत्तीसगडमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. यूपीच्या मथुरेत हिंदू महासभेचा या चित्रपटाला विरोध आहे. याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
का होतोय वाद?
पठाण चित्रपटाच्या 'बेशरम रंग' या गाण्यात दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. भगवा रंग हा हिंदू धर्माचे प्रतीक असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे आणि दीपिकाने हा रंग परिधान करून बेशरम रंगच्या गाण्यावर नृत्य केले आहे, जे अत्यंत आक्षेपार्ह आहे. बिकिनीसाठी भगव्यासारख्या पवित्र रंगाचा वापर स्वीकारला जाणार नाही, असे विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे.
चित्रपटावरून देशाच्या या भागांत वाद सुरू...
1. उत्तर प्रदेशात हिंदू महासभेने म्हटले– हा सनातन संस्कृतीचा अपमान
उत्तर प्रदेशातील मथुरा येथे अखिल भारत हिंदू महासभेशी संबंधित सदस्यांनी चित्रपटाला विरोध जाहीर केला आहे. भगवे कपडे घालून सनातन धर्माला कमकुवत दाखवण्याचे षडयंत्र या चित्रपटात रचण्यात आल्याचे संघटनेचे राष्ट्रीय खजिनदार दिनेश शर्मा यांचे म्हणणे आहे. हिंदू महासभेचे म्हणणे आहे की, ते न्यायालयात चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणार आहेत.
2. बिहारमध्ये शाहरुख-दीपिकाविरुद्ध खटला
बिहारच्या मुझफ्फरपूर न्यायालयात पठाणविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. मुझफ्फरपूरचे वकील सुधीर कुमार ओझा यांनी शुक्रवारी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात चित्रपट निर्माते आदित्य चोप्रा, अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्यासह 5 जणांविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि अश्लीलता पसरवल्याबद्दल खटला दाखल केला.
हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी हा चित्रपट मुद्दाम बनवण्यात आला आहे, असे फिर्यादीच्या वकिलांचे म्हणणे आहे. याप्रकरणी 3 जानेवारीला सुनावणी होणार आहे.
3. छत्तीसगडमध्ये चित्रपटातून बेशरम रंग गाणे काढून टाकण्याची मागणी
छत्तीसगड शिवसेनेचे राज्य सरचिटणीस सुनील कुकरेजा यांनी चित्रपटाचे निर्माते, सिनेमा हॉल ऑपरेटर आणि मल्टिप्लेक्स व्यवस्थापनाला पत्र लिहिले आहे. बेशरम रंग हे गाणे हटवले तरच आम्ही चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ, असे सुनील यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.
4. बेशरम रंग गाण्यावरून मध्य प्रदेशातही तीन दिवसांपासून वादंग
मध्य प्रदेशातही या चित्रपटाबाबत निदर्शने होत आहेत. नुकतेच मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले होते की, जर गाण्याचे बोल आणि वेशभूषा बदलली नाही तर मध्य प्रदेशात चित्रपट प्रदर्शित करायचा की नाही यावर विचार करू.
5. राजस्थानमधील थिएटर मालकांना इशारा
राजस्थानच्या अलवरमध्ये पठाण चित्रपटाच्या विरोधात हिंदू संघटनांनी दुसऱ्या दिवशीही निदर्शने केली. त्यांनी हातात पोस्टर घेतले होते, ज्यावर लिहिले होते – ‘पठाण मूव्हीचा बहिष्कार करा, बहिष्कार करा.’ भगव्याचा अपमान सहन करणार नाही. जर कोणी पठाण चित्रपट दाखवला तर त्याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
6. गुजरातमध्येही थिएटर मालकांना धमक्या
गुजरातमध्येही पठाणांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. हा चित्रपट राज्यात प्रदर्शित झाल्यास कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला थिएटर मालक जबाबदार असतील, असे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने म्हटले आहे. अश्लीलतेसोबत भगवा जोडून चित्रपटाच्या गाण्याचे नाव 'बेशरम रंग' ठेवण्यात आल्याचे ते सांगतात. हे गाणे बॉलीवूडची विकृत हिंदूविरोधी मानसिकता दाखवते. ही दृश्ये असलेला चित्रपट आम्ही गुजरातमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
7. महाराष्ट्रात भाजप आमदाराचा निषेध
कोणत्याही चित्रपटातून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या तर ते खपवून घेतले जाणार नाही, असे महाराष्ट्राचे भाजप आमदार राम कदम यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात सध्या हिंदुत्ववादी सरकार असून हिंदूंच्या भावना दुखावणारा कोणताही चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
रामकदम या चित्रपटावर बंदी घालण्याबाबत बोलत नसले तरी चित्रपट निर्मात्यांनी पुढे येऊन हिंदू संत समाजाचा चित्रपटाला काय आक्षेप आहे याचा विचार करायला हवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
वादादरम्यान शाहरुखची आली प्रतिक्रिया
पठाण वादाच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खानने मौन सोडले आहे. चित्रपटाच्या वादात त्याने पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केले. गुरुवारी कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुख इशाऱ्यांमध्ये म्हणाला, 'जगाने काहीही केले तरी मी आणि तुम्ही जेवढीही सकारात्मक माणसं आहोत... सर्व जिवंत आहोत. शाहरुखचा संदर्भ सोशल मीडियावर चित्रपटाला ट्रोल करणाऱ्यांकडे होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.