आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअदानी उद्योग समूहावर होत असलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी संसदेच्या संयुक्त समितीऐवजी (जेपीसी) सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक उपयुक्त ठरेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केले. दरम्यान, सहा राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस विरोधकांच्या आघाडीत एकाकी पडल्याचे दिसत आहे. काँग्रेससह १९ विरोधी पक्ष जेपीसीच्या मागणीवर ठाम आहेत. हिंडेनबर्ग अहवालानंतर विरोधकांनी, विशेषतः काँग्रेसने अदानी समूहाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी समूहाचे गौतम अदानी यांच्यातील कथित संबंधांवरून टीकेची झोड उठवली आहे. अदानी समूहात गुंतवलेले २० हजार कोटी रुपये कुणाचे आहेत? असा सवाल राहुल यांचा आहे. संसदेच्या विरोधी बाकावरचे बहुतांश अदानी प्रकरणात आक्रमक झाले असताना संपुआचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने जेपीसी नकोची भूमिका घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शनिवारी’ सिल्व्हर ओक’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेत जेपीसीच्या मर्यादा स्पष्ट केल्या. २१ सदस्यांची जेपीसी असेल तर त्यात १५ सदस्य सत्ताधारी भाजपचे असतील आणि फक्त ७ जण विरोधी पक्षातील असतील. विरोधी पक्षाच्या सदस्यांची संख्या कमी आणि सत्ताधारी सदस्यांची संख्या अधिक असल्याने, त्या समितीविषयी शंका व्यक्त करायला संधी आहे , असे पवार म्हणाले. विरोधी पक्षातील नेत्यांच्या जेपीसीच्या मागणीचा मी सन्मान करतो. त्याचवेळी त्यांना मी माझे मतही सांगेन. याप्रकरणात १९ विरोधी पक्ष एकत्र आले असले तरी या पक्षातील लोकांना त्या जेपीसीमध्ये संधी मिळणार नाही. जेपीसीत ठराविक जणांनाच संधी मिळेल, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.
उद्धव ठाकरे, नितीशकुमार, स्टॅलिन यांना खरगेंचे फोेन
सहा राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुका आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अदानी मुद्द्यावर देशभरात राळ उडवून देण्याची काँग्रेसची रणनीती आहे. त्यासाठी विरोधकांची मजबूत आघाडी करण्याच्या दृष्टीने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पुढाकार घेतला असून खरगे यांनी पुढील महिन्यात विरोधी पक्षांची एकत्रित बैठक घेण्यासाठी उद्धव ठाकरे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि इतर काही विरोधी पक्षनेत्यांना फोन केले. तसेच ते आणखी काही नेत्यांशीही संपर्क साधणार आहेत.
दरम्यान, पवारांच्या एकमेव वक्तव्याने विरोधकांमध्ये फूट पडणार नाही,असाही मतप्रवाह आहे. यापूर्वी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनेही नुकत्याच संपलेल्या संसद अधिवेशनावेळी जेपीसीच्या मुद्यावर वेगळी भूमिका घेतली होती. पवारांचे स्वत:ची भूमिका असू शकते त्यामुळे विरोधकांच्या आघाडीवर परिणाम होणार नाही,असे काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते दिल्लीतील पत्रकार परिषदेत म्हणाल्या.
अदानी मुद्द्यावर विरोधी पक्षांमध्ये संभ्रमाची स्थिती
१. शरद पवार हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी एखाद्या विषयावर भूमिका मांडली की त्यावर आम्ही कुणी काही बोलू शकत नाही. तीच पक्षाची भूमिका असते. त्यामुळे गौतम अदानी जेपीसी चौकशी प्रकरणावर त्यांची भूमिका अंतिम असेल, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले.
२. संपुआ सरकारच्या काळात कोळसा घोटाळ्यासाठी कोर्टाची समिती स्थापन करण्यात आली होती. तरीही विरोधकांच्या मागणीवरून जेपीसी स्थापन केली होती. अदानी घोटाळ्याबाबत जेपीसी चौकशीवर काँग्रेस ठाम असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
३. लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार आहे. परदेशी कंपनीने आपल्या देशातील उद्योग समूहावर केलेल्या आरोपांना महत्त्व देणे योग्य नाही. ही पवारांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
४. मविआत मतभेद नाहीत व पवारांच्या भूमिकेमुळे मविआत फूटही पडणार नाही. आम्ही जेपीसीचा अाग्रह धरला होता. पवारांनी फक्त जेपीसीसंदर्भात पर्याय सांगितला,असे खासदार संजय राऊत म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.