आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pegases Project The Second List Includes Rahul, Prashant Kishor And Former Election Commissioner Lavas

हेरगिरीचा सर्वात मोठा प्रोजेक्ट:दुसऱ्या यादीत राहुल, प्रशांत किशोरांसह माजी निवडणूक आयुक्त लवासांचे नाव

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्रोनोलॉजी बघा, हे गौप्यस्फोट अधिवेशनाच्या आधी का? देशाला बदनाम केलं जातंय : शहा

जगभरातील सरकारांकडून आपल्या नागरिकांवर पाळत ठेवल्याचा गौप्यस्फोट करणाऱ्या १६ मीडिया संस्थांच्या संयुक्त ‘पेगासस प्रोजेक्ट’ अंतर्गत सोमवारी आणखी एक मोठा खुलासा झाला. ‘द गार्डियन’ व ‘वॉशिंग्टन पोस्ट’सह अनेक मीडिया पोर्टलवर जारी यादीत या स्पायवेअरच्या निशाण्यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, त्यांचे ५ जवळचे मित्र, निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा, प. बंगालच्या सीएम ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी व माजी सरन्यायाधीशांवर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी महिलाही हाेती. इतकेच नव्हे तर सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळानंतर स्पष्टीकरण देणारे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि त्यांच्या पत्नीचेही नाव यादीत आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल व त्यांच्याशी संबंधित १८ जणांचे मोबाइल नंबरही यादीत आहेत.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचे माजी ओएसडी संजय काचरू, राजस्थानच्या माजी सीएम वसंुधराराजेंचे खासगी सचिव प्रदीप अवस्थी व विहिंपचे माजी नेते प्रवीण तोगडियांचेही नंबर पेगासस तयार करणारी इस्रायली कंपनी एनएसओच्या डेटाबेसमध्ये आहेत. फक्त प्रशांत किशोर यांनीच फोरेन्सिक विश्लेषणासाठी फोन अॅम्नेस्टी इंटरनॅशनलला दिला. त्यात हॅकिंगला दुजोरा मिळाला. एनएसओनुसार, आम्ही सरकारांनाच स्पायवेअर विकतो. याच आधारे सरकारी संस्थांनी पाळत ठेवल्याचे आकलन पेगासस प्रोजेक्टने केले आहे. संसदेत आरोप फेटाळत आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, देशात अवैधरीत्या फोनची हेरगिरी करता येत नाही. सरकार नागरिकांवर पाळत ठेवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. भाजपने म्हटले, यादीत नंबर आहे म्हणून हेरगिरी केल्याचे सिद्ध होत नाही. गृहमंत्री अमित शहा म्हणाले, क्रोनोलॉजी बघा. हे खुलासे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर का केले जात आहेत. ते देशाला बदनाम करत आहेत.

अशोक लवासा : मोदी-शहांना आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी क्लीन चिट देण्यास विरोध करणारे एकमेव निवडणूक आयुक्त
२०१९ लोकसभा निवडणुकीत ३ निवडणूक आयुक्तांमध्ये लवासांनी मोदी-शहांना आचारसंहिता उल्लंघनात क्लीन चिट देण्यास विरोध केला होता.
केव्हापासून हेरगिरी : आयोगाच्या या बैठकीनंतर काही आठवड्यांनी यादीत नाव. फोनचे विश्लेषण झाले नाही.
यादरम्यान कुटुंबाची चौकशी : सप्टेंबर २०१९ ते डिसेंबर २०१९ दरम्यान पत्नी, मुलगा, बहीण सरकारी तपास संस्थांच्या फेऱ्यात अडकले. काही महिन्यांतच लवासा निवडणूक आयोग सोडून एडीबीत जॉइन झाले, अन्यथा ते मुख्य निवडणूक आयुक्त झाले असते.

महिला कर्मचारी : जिने माजी सरन्यायाधीश गोगोईंवर लैंगिक छळाचे आरोप केले होते, तिच्याशी संबंधित ११ नंबर रडारवर
सुप्रीम कोर्टात एका महिला कर्मचाऱ्याने एप्रिल २०१९ मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोईंवर लैंगिक छळाचे आरोप केले होते. तिच्याशी संबंधित ११ नंबर यादीत आहेत.
केव्हापासून हेरगिरी : आरोपानंतर काही दिवसांनीच नंबर यादीत.
त्याचा अर्थ : महिलेने बंद कक्षात सुप्रीम कोर्टाच्या समितीसमोर जबाब दिला, आपल्या वकिलाशी, कुटुंबीयांशी याबाबत चर्चा केली. ही चर्चा हेरगिरीच्या कक्षेत होती. या माहितीद्वारे महिलाच नव्हे, सीजेआयनाही प्रभावित करता येऊ शकत होते.

प्रल्हाद पटेल: टार्गेट यादीत स्वयंपाकी आणि माळीही
राज्यमंत्री स्वतंत्र प्रभारवरून फक्त राज्यमंत्री केलेले प्रल्हाद पटेल यांच्याशी संबंधित १८ नंबर यादीत.
हेरगिरी झाली की नाही : मंत्र्यांना ई-मेलने माहिती दिली. त्यांनी विश्लेषणात रस दाखवला नाही.
केव्हापासून हेरगिरी : २०१७ ते २०१९ पर्यंत नाव यादीत होते.
त्यांचे नाव का : पटेल यांचे कुटुंबीय, सहकारीच नव्हे, स्वयंपाकी आणि माळी यांचे नंबरही यादीत. उमा भारतींचे निकटवर्तीय. शिवराजसिंह चौहान यांनाही विरोध केला आहे.

अश्विनी वैष्णव: राजकारणात येण्याच्या आधी निगराणी
आधी आयएएस होते. कॉर्पोरेट विश्वाशी जोडलेले वैष्णव व त्यांच्या पत्नीचा नंबर यादीत.
हेरगिरी झाली की नाही : मंत्र्यांना ई-मेलने माहिती दिली. त्यांनी फाॅरेन्सिक विश्लेषणात रस दाखवला नाही.
केव्हापासून हेरगिरी : २०१७ मध्ये, ते तेव्हा भाजपशी जोडलेले नव्हते.
त्यांचे नाव का : वाजपेयींच्या काळात पीएमओशी संबंधित. मोदींच्या गुडबुकमध्ये. ओडिशातून त्यांच्या राज्यसभा सदस्यत्वामुळेच भाजप व बीजदमधील अंतर कमी झाले.

प्रशांत किशोर : राहुल व प्रियंकांसोबतची बैठकही
प्रशांत, टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यादीत.
हेरगिरी झाली की नाही : प्रशांत यांचा फोन हॅक झाल्याला फाॅरेन्सिकचा दुजोरा.
केव्हापासून हेरगिरी : २०१८ ते जुलै २०२१ पर्यंत. १३ जुलैला ते राहुल-प्रियंकांना भेटले होते.
काय होऊ शकत होते : प्रशांत पंजाबात काँग्रेसशी व तामिळनाडूत डीएमकेशी जोडलेले. विरोधकांत घुसखोरी शक्य.
प्रशांत काय म्हणतात : म्हणाले की, बंगाल निवडणुकीत असे झाले तरी निकालावर फरक पडत नाही.

राहुल गांधी : लोकसभा निवडणुकीआधी आले नाव
राहुल गांधींचे दोन नंबर, दोन सहकारी व ५ मित्रांचे नंबरही या यादीत आहेत.
हेरगिरी झाली की नाही : राहुल, सहकारी अलंकार सवाई व सचिन राव किंवा मित्रांचे फोन उपलब्ध नव्हते.
केव्हापासून हेरगिरी : २०१८ च्या मध्यापासून २०१९ च्या मध्यापर्यंत.
काय होऊ शकत होते : राहुल यांचे मित्र, ज्यात २ महिला आहेत, टार्गेट होते. प्रत्येक पावलाची निगराणी शक्य.
राहुल काय म्हणतात : संशयास्पद मेसेजमुळे नंबर व मोबाइल बदलतात.