आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरू:महिलांशी कसे वागावे हे आपल्या समाजात लोकांना कळत नाही, महिलांनी प्रगती केल्यास आनंद व्हावा हे मुलांना शिकवत नाहीत

बंगळुरू7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्नाटक हायकाेर्टाची घटस्फोटाच्या एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी कडक टिप्पणी

कर्नाटक हायकोर्टाने सोमवारी पुरुषप्रधान समाजावर कठोर टिप्पणी करताना म्हटले की,‘एका सशक्त महिलेशी कसे वागले पाहिजे हे पुरुषप्रधान समाजात लोकांना माहीत नाही.’ न्यायमूर्ती नटराज रंगास्वामी यांच्या खंडपीठात घटस्फोटाच्या एका याचिकेवर संयुक्तपणे सुनावणी करताना न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना म्हणाल्या की, एका महिलेला अनेक संघर्षांचा सामना करावा लागतो. महिलांना दडपून ठेवावे, असेच समाजाला नेहमी वाटते. समाज महिला सबलीकरणाच्या गोष्टी तर करतो, पण महिलांशी कसे वागावे हे त्याला अद्यापपर्यंत कळलेले नाही. महिलांशी कसे वागावे हे पालकही मुलांना शिकवत नाहीत. महिलांनी प्रगती केली तर आनंद व्हायला हवा. पुरुषांची हीच मोठी समस्या आहे.”

न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या,‘जर महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि शिक्षित असेल तर तिला स्वत:ला आपल्या कुटुंबाशी असे वागता यावे की ज्यामुळे तिचा विवाह मोडू नये आणि ती स्वत: आनंदी राहावी. मुलीचे लग्न झाल्यानंतर तिच्या आईने विनाकारण तिच्या दांपत्य जीवनात हस्तक्षेप करू नये,’ अशी टिप्पणीही खंडपीठाने केली.

मुलीच्या वकिलाने सांगितले की, माझी अशील आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. सासरच्या लोकांशी सामंजस्यपूर्ण संबंध ठेवण्यात ती अपयशी ठरत आहे. त्यावर खंडपीठाने म्हटले की, एकटी असणे याचा अर्थ पतीकडे दुर्लक्ष करावे, असा नाही. जे लोक घटस्फोटाचा अर्ज देतात, त्यांनी समुपदेशनाच्या सत्रात अवश्य उपस्थित राहावे. तसेच जोपर्यंत कायदेशीररीत्या घटस्फोट होत नाही तोपर्यंत चर्चा सुरूच ठेवणे गरजेचे आहे. एकमेकांशी चर्चा केल्यावरच समस्येवर तोडगा निघेल. विवाह म्हणजे परस्परांतील सामंजस्यच आहे. ते अखेर दोन लोकांमध्येच असते. स्वत:साठी संबंध संपवणे योग्य नाही, अशी टिप्पणी करत खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी ६ जानेवारीपर्यंत स्थगित केली आहे.

दांपत्याला म्हटले-नाक मुरडू नका, आम्ही तुमच्यासाठीच उपाय सांगत आहोत
हायकोर्टात जेव्हा ही चर्चा सुरू होती, तेव्हा घटस्फोटासाठी आलेले दांपत्य नाक मुरडत होते. त्यावर न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या, नाक मुरडू नका. आम्ही तुमच्यासाठीच उपाय सांगत आहोत. खंडपीठाने अनेक उदाहरणेही दिली, त्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोविड-१९ महामारीदरम्यान अनेक दांपत्यांनी आपली घटस्फोटाची याचिका मागे घेतली. एका दांपत्याने तर १८ वर्षांनंतर आपली घटस्फोटाची याचिका मागे घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...