आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाद:पीएमनी भारताचा भूभाग चीनला दिला : राहुल, हे तर लष्कराचे मनोबल खच्ची करताहेत : सरकार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिनी घुसखोरी झाल्याचे नाकारल्याबद्दल विरोधकांनी पंतप्रधानांना घेरले

लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी घुसखोरी केली असल्याचे वास्तव नाकारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर राजकीय वाद पेटला आहे. काँग्रेसने पंतप्रधानांवर देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला. हा वाद वाढल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने यावर भाष्य करत भारतीय सीमांचे रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांचे मनोबल खच्ची करण्यासाठीच हा वाद पेटवला जात असल्याचे नमूद केले. मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत भारतीय सीमेत कुणीही घुसखोरी केलेली नाही किंवा चौकीवर कुणी ताबा मिळवलेला नाही, असे नमूद केले होते. यावर टीका करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट केले की, “पंतप्रधानांनी आपला भूभागच समर्पित केला आहे.’ राहुल यांच्या ट्विटवर गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट केले. ते म्हणाले, राजकारण करण्यापेक्षा राहुल यांनी राष्ट्रहिताच्या बाजूने उभे राहावे.

स्पष्टीकरण : सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप चुकीचाच

- वाद वाढल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने एक सविस्तर स्पष्टीकरण देत नमूद केले, एलएसीवर अतिक्रमण करण्याच्या कोणत्याही प्रयत्नास भारत सडेतोड प्रत्युत्तर देईल.

- दुर्लक्ष केल्याचा आरोप चुकीचा आहे. उलट भारतीय लष्कर एलएसीचे उल्लंघन करणाऱ्यांना निर्णायक प्रत्युत्तर देत आहे.

- एलएसीवर भारतीय हद्दीत चिनी सैनिक नसल्याचे वक्तव्य आपल्या जवानांनी दाखवलेल्या शौर्यानंतरच्या स्थितीशी संबंधित आहे. कारण, त्यानंतर भारतीय लष्कराने चिनी सैनिकांचे एलएसीवर अतिक्रमण करण्याचे प्रयत्न हाणून पाडले होते. तोच संदर्भ घेऊन सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान बोलले होते.

कठोर : गलवानवर चीनचा दावा कदापिही मान्य नाही

- भारत सरकारने नमूद केले की, गलवान खोऱ्यावर चीनचा दावा मान्य नाहीच. हे चीनच्या पूर्वीच्या भूमिकेविरुद्ध आहे.

- गलवानबाबत फार पूर्वीपासून स्थिती स्पष्ट आहे. भारतीय जवान एलएसीवर कराराचे काटेकोरपणे पालन करतात.

- भारताने कधीही एलएसी ओलांडली नाही. तिथे कित्येक वर्षांपासून गस्त सुरू आहे. जी काही बांधकामे झाली आहेत ती भारतीय हद्दीतच करण्यात आली आहेत.

- चीनने हालचालींत सुधारणा करावी. दोन्ही बाजूंकडील अधिकारी नियमित संपर्कात आहेत. लष्करी व राजकीय मार्गाने चर्चा सातत्याने सुरू आहे. : परराष्ट्र मंत्रालय

सावधगिरी : चीन देशावर सायबर हल्ला करू शकतो

चीनशी संबंधित उत्तर कोरियाचे हॅकर्स रविवारी २० लाखांहून अधिक भारतीयांवर सायबल हल्ला करू शकतात. यासाठी कोरोना सब्जेक्टसह फिशिंग मेल पाठवले जाऊ शकतात. संगणक सुरक्षेसंबंधी कंपनी सीईआरटीने याबाबत इशारा दिला आहे की, अनोळखी आयडीवरून आलेल्या ई-मेलवर क्लिक करू नका. हुबेहूब सरकारी आयडी वाटेल अशा ncov2019gov.in सारख्या आयडीवरून हे मेल केले जाऊ शकतात. सीईआरटीने सांगितले, की या संभाव्य सायबर हल्ल्यात भारतातील अनेक नामांकित कंपन्यांसह काही प्रमुख माध्यम समूहांनाही लक्ष्य केले जाऊ शकते.

वाद संपलेला नाही, मर्यादित युद्धाची तयारी करावी लागेल - जनरल वेदप्रकाश मलिक, माजी लष्करप्रमुख

पंतप्रधानांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर पीएमओने स्पष्टीकरण दिले आहे. सरकारकडून खुलासा आल्यानंतर हा विषय थांबवला पाहिजे. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की, हा विषय अद्याप संपलेला नाही. लष्करी आणि राजकीय पातळीवर बोलणी सुरू आहेत. ती सुरूच राहतील. या वादावर लगेच ताेडगा निघेल असे दिसत नाही. त्यामुळे आपण दक्ष राहिले पाहिजे. चीनच्या बाेलण्यात आणि कृतीत माेठा फरक आहे. प्रत्यक्ष सीमेवर जे घडत आहे तेच खरे मानावे. चीनचे दावे अतिशय खाेटे आहेत. गलवान येथील १५ जूनच्या घटनेनंतर त्यांच्यावरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. माझ्या मते, दोन्ही देशांमधील अर्थव्यवस्था किंवा गुंतवणूकच नाही, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक कळीचे मुद्दे असल्याने तूर्तास युद्धाची शक्यता नाही. सध्याच्या परिस्थितीवरून चिनी सैन्य युद्ध सुरू करेल असे वाटत नाही. तरीसुद्धा आपण लढाईसाठी सज्ज राहिले पाहिजे.

चीनशी सध्या युद्ध नाही, मात्र काेणतेही आव्हान स्वीकारण्यास तयार : हवाई दल प्रमुख

चीनशी सध्या युद्धाची स्थिती नाही. मात्र, एलएसीवर कोणत्याही परिस्थितीशी निपटण्यास हवाई दल, सैनिक सज्ज आहेत. आवश्यक तेथे सैनिक तैनात आहेत. भारतीय सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. -आरकेएस भदौरिया, हवाई दल प्रमुख

बातम्या आणखी आहेत...