आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबमध्ये फिरोजपूर येथे बुधवारी आयोजित जाहीर सभेसाठी दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडवून हमरस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांमुळे सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर चूक स्पष्ट झाली. याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली असून यात कॅबिनेट सचिव सुधीरकुमार सक्सेना, आयबीचे सहसंचालक बलबीरसिंग आणि एस. सुरेश यांचा समावेश आहे. समितीने लवकरात लवकर अहवाल दाखल करावा, असे बजावण्यात आले आहे. दरम्यान, पंजाब सरकारनेही याप्रकरणी दोन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली असून यात निवृत्त न्यायाधीश मेहताब गिल आणि गृह विभागाचे मुख्य सचिव अनुराग वर्मा यांचा समावेश आहे.
पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेली चूक गंभीर असून याची सखोल चौकशी केली जाईल, असे पंजाब सरकारने म्हटले आहे. दरम्यान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्लीसह अनेक राज्यांत भाजप नेत्यांनी या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी मंदिरांत पूजा-प्रार्थना केली. दुसरीकडे देशातील माजी पोलिस महासंचालकांसह २७ आयपीएस अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी करणार
पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीप्रकरणाची चौकशी कोर्टाच्या निगराणीत करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय राजी झाले आहे. शुक्रवारी सुनावणी होईल. वरिष्ठ अधिवक्ता मणिंदरसिंग यांनी ही गंभीर बेपर्वाई असल्याचे सांगत चौकशीची मागणी केली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या पीठाने लॉयर्स व्हॉइस या संघटनेतर्फे हजर असलेल्या वकिलाला म्हटले की, याचिकेची एक प्रत राज्य सरकारलाही देण्यात यावी.
गृह मंत्रालय कठोर निर्णय घेणार : ठाकूर
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांना सांगितले की, पंतप्रधानांच्या दौऱ्यात झालेल्या सुरक्षा चुकीबाबतची माहिती घेतली जात आहे. मोठी आणि कठोर पावले उचलली जातील. या प्रकरणात काही लोक सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.
सोनिया गांधींची चन्नी यांच्याशी चर्चा; म्हणाल्या, चौकशी व्हावी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री चन्नी यांच्याशी चर्चा करून पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाली असेल तर दोषींविरुद्ध कठोर कारवाई व्हायला हवी, असे बजावले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, पंतप्रधानांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. हवामान खराब असल्याची माहिती पंतप्रधानांना दिली होती की नाही. माजी पंतप्रधान एच. डी. देवगौड़ा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आदींनीही या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.