आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात राजकीय उलथापालथ:इम्रान खान यांनी 172 चे समर्थन दाखवावे अन्यथा घरी जावे, विरोधकांचे आव्हान, लष्कर गप्प

इस्लामाबादहून नसीर अब्बास2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात विरोधकांनी आणू पाहत असलेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान राजकीय उलथापालथीस सुरुवात झाली आहे. खुर्ची वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या इम्रान खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ पक्ष (पीटीआय) फुटीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळेच पीटीआयने शनिवारी कथित पक्षांतर करणाऱ्या १४ खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २६ मार्चपर्यंत त्यांना याविषयी उत्तर द्यावे लागणार आहे.

नोटिसीत तुम्हाला दलबदलू म्हणून घोषित का केले जाऊ नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. तसे झाल्यास नॅशनल असेंब्लीत त्यांना अपात्र घोषित केले जाऊ शकते. त्यातच पंतप्रधान इम्रान खान यांनी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांची भेट घेतली. विरोधी आघाडीने शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी पीडीएमचे मौलाना फजलूर रहेमान, विरोधी पक्ष नेते शाहबाज शरीफ, पीपीपीचे बिलावल भुत्तो, बीएनपी-एमचे अख्तर मेंगल उपस्थित होते. बिलावल म्हणाले, इम्रान यांनी उगाच बॉल टॅम्परिंग करू नये. ३४२ सदस्यीय संसदेत १७२ चा आकडा सिद्ध करावा. एवढा पाठिंबा दाखवता आला नाही तर इम्रान यांनी सत्ता सोडून घरी निघून जावे.

सरकारच्या कालावधीबद्दल साशंकता, केवळ दीड वर्ष सत्ता
पत्रकार व राजकीय विश्लेषक उस्मान खान दैनिक भास्करला म्हणाले, विरोधकांच्या एकजुटीमुळे इम्रान खान सरकार सत्तेवरून पायउतार होईल. विरोधक सक्षम आहेत. तसे झाल्यास पंतप्रधान पीएमएल-एनचा असेल. नवीन पंतप्रधान नवाज यांच्या पक्षाचा असावा यावर सर्व विरोधकांची एक महिन्यानंतर सहमती झाली आहे. नव्या सरकारची स्थापना दीड वर्षांसाठी होईल, असे उस्मान यांना वाटते.

नव्या सरकारचा संभाव्य अजेंडा; इम्रान सरकारचे वादग्रस्त कायदे रद्द करणार
इम्रान सरकार सत्तेवरून गेल्यानंतर विरोधकांचे आघाडी सरकार सर्वात आधी इम्रान यांच्या कार्यकाळातील ‘वादग्रस्त कायदे’ रद्दबातल करेल, असे काही राजकीय विश्लेषकांना वाटते. पीएमएल-एन खासदार ताहिरा आैरंगजेब म्हणाल्या, आमचे सरकार स्थापन झाल्यास पीटीआय सरकारने आणलेले सर्व वादग्रस्त कायदे रद्द केले जातील.

लष्कराचा विश्वास, समर्थन इम्रान खान सरकारने गमावले
पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या लष्कराचा विश्वास व समर्थन दोन्ही गमावले आहे, असे राजकीय विश्लेषकांना वाटते. चार वर्षांपूर्वी लष्कर इम्रान यांच्यासोबत उभे होते. तसे आता मुळीच दिसत नाही. आता स्थिती बदलली आहे. लष्कर पाकिस्तानातील राजकीय घडामोडींबाबत तटस्थ असल्याचे काही दिवसांपूर्वी प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी म्हटले होते.

..तर विरोधकांचे धरणे आंदोलन
विरोधी पक्षाने शनिवारी इम्रान खान सरकारला एक संयुक्त इशारा दिला आहे. सोमवारी अविश्वास प्रस्ताव पटलावर मांडला जावा. अन्यथा नॅशनल असेंब्लीबाहेर धरणे आंदोलन केले जाईल. विरोधी पक्ष नेते व पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज यांनी असेंब्लीचे अध्यक्ष असद कैसर यांना इम्रान यांची बाजू घेऊ नये, असा इशारा दिला आहे.

राष्ट्रीय सरकारचा आराखडा तयार
पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन पर्यायी सरकार देण्याची तयारी केली आहे. तशी योजना तयार करण्यात आली आहे. त्यासाठी अविश्वास प्रस्तावाला पारित करण्यासाठी जोर लावला जात आहे. प्रमुख विरोधी पक्ष पीएमएल-एनचे प्रमुख शाहबाज व पीपीपी अध्यक्ष बिलावल भुत्तो यांनी कौमी जनता सरकार स्थापनेचा सल्ला दिला आहे. यातून पाकिस्तान प्रगतिपथावर वाटचाल करेल, असा विश्वास उभय नेत्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, विरोधकांना समान अजेंड्यावर काम करावे लागेल. लोकशाही सरकारचा पुढील पंतप्रधान हा बहुमताच्या आधारे कोणीही होऊ शकतो. आमचा पक्ष पीएमएल-एनच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी तयार आहे. कारण पीएमएल-एनकडे बहुमताचा आकडा आहे, असे पीपीपी नेता बिलावल भुत्ताे यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...