आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Positive Decision Regarding The Status Of Marathi As An Elite Language; Union Minister Of State For Culture Meghwal's Answer To Shiv Sena MP Priyanka Chaturvedi | Marathi News

नवी दिल्ली:मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय; शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या प्रश्नाला केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मेघवाल यांचे उत्तर

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी भाषा आणि या दर्जेदार साहित्याचा निश्चित अभिमान आहे. या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारही प्रयत्नशील आहे. त्यानुसार लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून गेली कित्येक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. किंबहुना, या मुद्द्यावर साहित्य वर्तुळात नेहमी आग्रही भूमिका असते. अखिल भारतीय साहित्य संमेलनांसह परदेशात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनांतूनही ही आग्रही मागणी सातत्याने होत आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पूरक प्रश्नाद्वारे मराठी भाषेचा हा मुद्दा उपस्थित केला. या वेळी झालेल्या चर्चेत खा. डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि रजनीताई पाटील यांनीही सहभाग घेतला.

प्रस्ताव भाषातज्ज्ञांच्या समितीकडे
प्रश्नोत्तराच्या तासांत विचारण्यात आलेल्या या प्रश्नावर मंत्री मेघवाल यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जाबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, महाराष्ट्र शासनाचा प्रस्ताव हा सांस्कृतिक मंत्रालयाकडून भाषातज्ज्ञांच्या समितीकडे पाठवण्यात आला आहे. या समितीचा अहवाल साहित्य अकादमीकडे गेला. तेथे काही त्रुटींची पूर्तता झाली आहे. सध्या हा प्रस्ताव विचाराधीन आहे. केंद्रीय गृह मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, शिक्षण मंत्रालय इत्यादी संबंधित मंत्रालयांतर्गत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून या विषयाला आता गती आली आहे.आवश्यक चर्चा व कार्यवाहीनंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मेघवाल यांनी सांगितले. अद्यापपर्यंत देशातील सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने २००४ मध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत मूळ निवेदन निर्गमित केले होते.तद्नंतर २५ नोव्हेंबर २००५ रोजी गृह मंत्रालयाने अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला प्राधिकारी संस्था म्हणून जाहीर केले असल्याचेही मेघवाल यांनी या वेळी सांगितले.

हे आहेत निकष : एखाद्या भाषेला अभिजात दर्जा द्यावयाचा असेल तर ही भाषा प्राचीन असावी आणि ते साहित्य दर्जेदार असावे, असा निकष आहे. शिवाय भाषा स्वयंभू असावी व तिचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे. तिचे प्राचीन व आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा, अशा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. अभिजात दर्जा मिळाल्यानंतर संबंधित भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यांना केंद्राकडून भरीव अनुदान मिळते.

आता आशा पल्लवित
तीन वर्षांपूर्वी हेच शब्द आणि हेच उत्तर लोकसभेत देण्यात आले होते. फरक एवढाच की, उत्तर देणारे आणि प्रश्न विचारणारे निराळे होते. मात्र, तरीही आपण आशावादी आहोत. राजकीय परिस्थिती आता वेगळी आहे. आशा पल्लवित झाल्या आहेत. श्रेयवादाची लढाई असू शकते... तरीही कोणाच्या का कोंबड्याने का होईना, पण पहाट व्हावी हीच इच्छा आहे. - हरी नरके, सदस्य, अभिजात मराठी भाषा समिती

... तर अभिजात भाषेचा दर्जा
तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना भारत सरकारने अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे. मराठीला हा दर्जा मिळावा यासाठी २०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीचा सुमारे साडेचारशे पानांचा अहवाल २०१३ मध्ये केंद्र सरकारला पाठवण्यात आला. परंतु, गेल्या नऊ वर्षांत मराठीला हा दर्जा देण्याबाबत केवळ आश्वासने दिली गेली. प्रत्यक्ष कार्यवाही मात्र झाली नाही.

बातम्या आणखी आहेत...