आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्ली लगतच्या ग्रेटर नोएडात एका सेवानिवृत्त महिला डॉक्टरचा सडलेल्या स्थितीचा मृतदेह आढळला आहे. ही महिला डॉक्टर आपल्या पती व मुलापासून वेगळी राहत होती. त्यांचा 20 दिवसांपूर्वी केव्हातरी मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. फोन लागत नसल्यामुळे गाझियाबादेत राहणारा मुलगा आईच्या घरी पोहोचला असता ही दुर्दैवी घटना उजेडात आला.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, ग्रेटर नोएडात मुलगा व पतीपासून विभक्त राहणाऱ्या सेवानिवृत्त डॉक्टर अमिया कुमारी सिन्हा (70 ) यांचा मृतदेह त्यांच्याच घरात सडलेल्या स्थितीत आढळला आहे. गत 4 महिन्यांपासून त्यांचा कोणताही संवाद गाझियाबादेत राहणारा त्यांचा मुलगा व सुनेशी झाला नव्हता. फोन लागत नसल्यामुळे त्यांचा मुलगा व सून रविवारी रात्री बीटा-1 स्थित त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. पण घरात आईचा सडलेला मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ त्याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी अमिया कुमारी यांचा मृत्यू 20 दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. न्यायवैद्यक पथकानेही घटनास्थळाचा आढावा घेतला आहे. मृत महिला जवळपास 3 दशकांपासून आपल्या पतीपासून विभक्त राहत होती. बीटा-2 ठाणे प्रभारी विनोद कुमार मिश्रा यांनी सांगितले की, अमिया कुमारी सिन्हा बिहार आरोग्य विभागात डॉक्टर होत्या.
त्यांनी बीटा-1 सेक्टरमध्ये घर बांधले होते. मुलगा प्रणव रंजन सिन्हा गाझियाबादच्या वैशालीत राहत होता. प्रणव त्याची पत्नी गाझियाबादेत नोकरी करत होते. प्रणवने पोलिसांना सांगितले की, तो गत अनेक दिवसांपासून आईला फोन करत होता. पण तिने एकदाही फोन उचलला नाही.
त्याने सांगितले की, आई नाराज होऊन नेहमीच फोन उचलत नव्हती. त्यामुळे मी पत्नी व सासूसह रविवारी बीटा-1 स्थित आईच्या घरी गेलो. दरवाजा ठोठावल्यानंतरही आतून दरवाजा उघडण्यात आला नाही. त्यामुळे आम्ही दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता आईचा मृतदेह आढळला.
प्रमवने या घटनेची माहिती यूपी-112 वर कॉल करून दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली. पोलिसांनी अमियाचा मोबाईल फोनही जप्त केला आहे. हा फोन केव्हापासून स्विच ऑफ होता व त्यावरून शेवटचा संवाद कुणाशी साधण्यात आला याचा तपास पोलिस करत आहेत.
पलंगावरून पडल्याने मृत्यू झाल्याचा संशय
वृद्ध महिला डॉक्टरचा मृतदेह पलंगाजवळ फरशीवर पडला होता. बेडवर मच्छरदानीही लावलेली होती. ती एका साइडने विस्कटलेली होती. त्यामुळे महिलेचा पलंगावरून पडल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घरात सुसाइड नोट आढळली नाही. त्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतरच महिलेच्या मृत्युचे खरे कारण कळेल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
घरात मृतदेह सडला अन् शेजाऱ्यांना काहीच माहिती नाही
जवळपास 4 महिन्यांपासून मुलाची महिलेशी चर्चा झाली नव्हती. तर बीटा-1 सेक्टरमध्ये या महिलेच्या शेजारी राहणाऱ्या शेजाऱ्यांनाही या घटनेचा थांगपत्ता लागला नाही. पोलिसांच्या मते, मृत महिला शेजाऱ्यांशी फारसा संपर्क ठेवत नव्हती. त्यामुळे शेजाऱ्यांनीही त्यांची कोणती माहिती घेतली नाही.
हत्येच्या अँगलनेही तपास
घराच्या पहिल्या मजल्यावरील बेडरूममद्ये महिलेचा मृतदेह तोंडावर पडला होता. त्यामुळे पोलिस हत्येच्या अंगानेही या घटनेचा तपास करत आहेत. यासंबंधीच्या वृत्तानुसार, मृत महिला गत काही दिवसांपासून आपल्या मुलाकडे त्याच्या सासूशी भेटण्याची इच्छा व्यक्त करत होती. यामुळेच प्रणव रविवारी सुट्टीच्या दिवशी आपल्या पत्नी व सासूसह त्यांच्या घरी ग्रेटर नोएडाला आला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.