आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Power Outages In Half Of India; Crisis In Coal Mines Due To Lack Of Monsoon Preparations

समस्या बिकट:निम्म्या भारतात वीज गुल; कोळसा खाणींत पावसाळ्याच्या तयारीअभावी ओढवले संकट, चीन-युरोपनंतर आता भारतात वीज संकट

नवी दिल्ली / अनिरुद्ध शर्मा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कोळसा उत्पादक असलेल्या देशात सध्या कोळशाचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. यामुळे उत्तर, मध्य आणि ईशान्येकडिल राज्यांत वीज संकट निर्माण झाले आहे. २० हून जास्त राज्यांत दीर्घकाळ वीज गूल होत आहे. वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार, दिवाळीपर्यंत वीज संकटातून सुटकेची शक्यता कमी आहे. ऊर्जा तज्ज्ञांच्या मते, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात कोळसा खाणींवर अनिष्ट परिणाम झाला. तर वीज निर्मिती केंद्रात एकही दिवस वीज उत्पादन बंद नव्हते. कोळश्याची मागणी तेवढीच राहिली, मात्र पुरवठा थांबला. कोरोना हे वीज संकटाचे प्रमुख कारण आहे. वास्तविक कोरोन सर्वोच्च पातळीत असताना खाणींत मान्सूनपूर्व तयारी आणि दुरुस्ती होऊ शकली नाही. दरम्यान ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये वीजेची मागणी १६%नी वाढली. नंतर सप्टेंबरमध्ये कोळसा उत्पादक भागात मुसळधार पावसाने खाणींत पाणी घुसले. त्यामुळे एप्रिल-मे प्रमाणेच सप्टेंबरमध्ये अनेक दिवस कोळसा पुरवठा ठप्प झाला.

आता अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. कोरोनाकाळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी उद्योगात जास्तीचे काम सुरू असल्याने वीजेची औद्योगिक मागणी वाढली. दिवसाकाठी ४ अब्ज युनिटहून जास्त मागणी झाली. यापैकी ६५ते ७०% वीज कोळश्यावरील निर्मिती केंद्रातूनच मिळते. ऑक्टोबरच्या पहिल्या ८ दिवसांत मागणीच्या तुलनेत ११.५% कमी कोळसा पुरवठा झाला आहे.

जगभरात कोळशाच्या किमती तिप्पट, त्यामुळेही वाढला दबाव
आयात कोळशाच्या किमती मार्च ते सप्टेंबरपर्यंत ६ महिन्यांतच तिपटीने वाढल्या. त्यामुळे देशांतर्गत पुरवठ्याची मागणी आणखी वाढली. मागील दशकात २०१८-१९ मध्ये कोळशाची मागणी सर्वाधिक ६४३.७ दशलक्ष टन होती, त्यात ६१.७ दशलक्ष टन आयात कोळसा होता. कोळसा मंत्रालयानुसार, आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ७२३.३ दशलक्ष टन कोळसा लागेल. मात्र केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी सांगितले की, साधारणपणे प्रत्येक वीज केंद्रात ४ दिवसांचा साठा असतो, त्यामुळे यास संकट म्हणता येणार नाही. सध्या स्थिती गंभीर असून सरकारचे त्यावर लक्ष आहे. आगामी काळात विजेची मागणी कमी होऊन संकट निवळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. पावसाळा आता संपला आहे. कोळसा पुरवठा वाढत आहे. सात ऑक्टोबरला खणींतून २६८ रॅक कोळसा पाठवण्यात आला आहे.

एप्रिलपासूनच स्थिती बिघडली होती, परिणाम आता दिसताहेत
एका ऊर्जातज्ज्ञांच्या मते, एप्रिलपासून सुरू असलेला तुटवडा ऑक्टोबरमध्ये संकटस्तरावर पोहोचला. देशातील १३५ औष्णिक वीज केंद्रांपैकी ७२ केंद्रांत ३ दिवसांचा, ५० केंद्रांत ४ ते १० दिवसांचा आणि १३ केंद्रांत १० दिवसांपेक्षा जास्तीचा कोळसा साठा उपलब्ध होता. ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत २०१९ मध्ये ( कोरोना नसतानाचे सामान्य वर्ष) विजेची मागणी प्रतिमहिना १०६.६ अब्ज युनिटची वाढ झाली होती, २०२१ मध्ये याच काळात ती १२४.२ अब्ज युनिट प्रतिमहिना झाली. या दोन्ही वर्षी औष्णिक वीज निर्मिती केंद्राचा वाटा २०१९ मध्ये ६१.९१ % नी वाढून २०२१ मध्ये ६६.३५ % झाला. अशा रीतीने कोळशाच्या मागणीत १८ % वाढ झाली, तर पुरवठा वाढण्याऐवजी कमी होऊ लागला. त्यामुळे संकट अधिक गंभीर झाले.

असे संकट यापूर्वी पाहिलेले नाही- इंजिनिअर्स फेडरेशनचे अध्यक्ष
ऑल इंडिया पाॅवर इंजिनिअर्स फेडरेशनचे अध्यक्ष शैलेंद्र दुबे यांनी सांगितले की, वीज केंद्रात एवढा कोळशाचा तुटवडा आणि वीज संकट यापूर्वी कधीच अनुभवले नाही. सर्वसाधारणपणे या दिवसांत विजेची मागणी घटू लागते, मात्र ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सरासरी १,७०,००० मेगावॅट मागणी होती, गतवर्षीच्या तुलनेत ही मागणी १५ हजार मेगावॅट जास्त आहे. यामुळेच उत्तर प्रदेशात युनिटमागे २१ रुपयांप्रमाणे वीज विक्री होत आहे. कोरोनाची दुसरी लाट शिखरावस्थेत असताना कोळसा खाणींवर अनिष्ट परिणाम झाला. याच काळात वीज केंद्रात अहोरात्र वीजनिर्मिती सुरू होती. त्यात कोळसा साठा वापरला गेला. खाणींतून पाणी उपसा करणारी यंत्रे लावणे, ड्रेनेज सिस्टिमची डागडुजी करणे ही पावसाळ्यापूर्वीची कामे झाली नाहीत. यासाठीची यंत्रे व सुटे भागदेखील उपलब्ध नव्हते.

देशातील ५ राज्यांत मागील २४ तासांतील वीजपुरवठा स्थिती
राजस्थान
: मागणी १२,५०० मेगावॅट, उत्पादन ८५०० मेगावॅट. सात यूनिट बंद आहेत. रोज ११ रॅक कोळसा लागतो, मात्र सध्या राज्याला फक्त ७ ते ८ रॅक मिळताहेत.
मध्य प्रदेश : मागणी १० हजार मेगावॅट, उत्पादन २३००. निम्म्याहून कमी क्षमतेने उत्पादन. ऑक्टोबर २०२० च्या दुसऱ्या आठवड्यात १५.८६ लाख टन कोळसा होता, सध्या ५.९२ लाख टन. आहे.
दिल्ली : सीएम अरविंद केजरीवाल यांची पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी आहे. ऊर्जामंत्री सत्येंद्र जैन म्हणाले- दिल्लीला ज्या केंद्रांकडून वीज मिळते तेथील कोळसा संपला आहे.
उत्तर प्रदेश : ८ निर्मिती केंद्रे बंद, यामुळे २७०० मेगावॅट विजेचा तुटवडा आहे. रोज ४ ते ५ तास वीज कपात सुरू. एनर्जी एक्स्चेंजकडून राज्य २१ रु. प्रतियुनिट वीज खरेदी करते आहे.

केंद्र सरकारने शनिवारी या संकटातून मार्ग काढण्यासाठी विशेष व्यवस्थापन पथकाची (सीएमटी) स्थापना केली. कोळशाच्या दैनंदिन पुरवठ्यावर हे पथक लक्ष ठेवेल. यामुळे कोल इंडिया आणि रेल्वेच्या मदतीने सर्व राज्यांना योग्य पुरवठाही होऊ शकेल. विविध राज्यांशी हे पथक संपर्कात राहील.

बातम्या आणखी आहेत...