आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालक्ष लागून राहिलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता मिळवली. पण मुख्यमंत्री कोण होणार या चर्चेला आता विराम मिळाला आहे. गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची माळ अपेक्षेप्रमाणे प्रमोद सावंत यांच्याच गळ्यात पडली आहे. त्यांच्या नावाची घोषणा भाजप पक्षश्रेष्ठींनी आज गोव्यात केली असून लवकरच शपथविधीचा दिवस जाहीर केला जाणार आहे.
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी प्रमोद सावंत यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजप विधीमंडळ गटाच्या बैठकीत प्रमोद सावंत यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद द्यायचे असा निर्णय घेण्यात आला आहे. आता राजभवनावर जाऊन भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला 20 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर इतर 2 आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून तब्बल 10 दिवस उलटून गेले तरीही मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा झाली नव्हती. या निवडणुकीत भाजपला जवळजवळ स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे गोव्याचे नवे मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब झाले नव्हते.दहा दिवसानंतर आज भाजपने आपला विधिमंडळ नेता म्हणून प्रमोद सावंत यांची निवड केली आहे. त्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा भाजपने प्रमोद सावंत यांची निवड झाली.
विश्वजीत राणेंकडून सावंतांच्या नावाचा प्रस्ताव
विश्वजीत राणे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत पेच निर्माण केला होता. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाला दहा दिवस उलटून गेले तरी गोव्यात भाजपला सरकार स्थापन करता आलेले नाही. या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सावंत आणि राणे यांना दिल्लीला बोलावून घेतले होते. या दोन्ही नेत्यांनी सावंत आणि राणेंशी मॅरेथॉन चर्चा केल्यानंतर आज अखेर मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे विश्वजीत राणे यांनीच आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि तो एकमताने मंजूर करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले.
मोदी आणि शहांचे मानले आभार
गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यानंतर प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत.
कोण आहेत प्रमोद सावंत?
डॉ. प्रमोद सावंत हे गोव्याचे चौदावे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे वय 48 वर्ष इतके आहे. त्यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी झाला. माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या मनोहर पर्रिकरांनंतर डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली होती. 2019 साली डॉ. प्रमोद सावंत यांना पहिल्यांदाच गोव्याचे मुख्यमंत्रीपद मिळाले होते. प्रमोद सावंत हे गोव्याच्या साखळी या मतदारसंघातून आमदार आहेत. प्रमोद सावंत हे आयुर्वेदिक डॉक्टर देखील आहेत. त्यांनी डॉक्टर म्हणून काही काळ काम देखील केले होते. डॉ. प्रमोद सावंत पर्रिकर सरकारच्या काळात विधानसभेचे अध्यक्षही राहिलेले आहेत. त्यांची पत्नी सुरक्षणा सावंत याही भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.