आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Prashant Kishor And Sharad Pawar Meeting In Delhi Residence, 15 Opposition Party Meeting On 22nd June 2021; News And Live Updates

दिल्लीत राजकीय योगासने:शरद पवारांच्या नेतृत्वाखाली 15 पक्षांची आज बैठक; दिल्लीतील पवारांचे घर बनले राजकीय घडामोडींचे केंद्र

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • आजपासून विरोधकांची मोट बांधण्याचे काम : राष्ट्रवादी

आंतरराष्ट्रीय योग दिवस पार पडल्यानंतर आता मंगळवारी राजधानी दिल्लीत राजकीय योगासने होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी १५ पक्षांची बैठक बोलावण्यात आली अाहे. भाजपविरोधात मजबूत तिसरी आघाडी उभारण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्यात येणार आहे. दरम्यान, या बैठकीच्या पूर्वसंध्येला निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी पवारांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. उभयतांमध्ये सुमारे दीड तास खलबते झाली. बिगर काँग्रेस आणि बिगर भाजप अशी तिसरी आघाडी उभारण्यासाठी ही राजकीय योगासने होणार आहेत.

पवारांचे दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थान हे सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. दुपारी ४ वाजता १५ राजकीय पक्षांची बैठक होणार आहे. तृणमूलचे रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी ११ जून रोजी मुंबईत पवारांची भेट घेतली होती. त्याच वेळी भाजपविरोधात विरोधकांची तिसरी आघाडी उभारण्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. त्यापाठोपाठ मंगळवारी प्रशांत किशोर यांनी पुन्हा पवारांची भेट घेतली. ही खासगी भेट होती, राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा किशोर यांनी केला.

संभाव्य तिसऱ्या आघाडीतील पक्षांचे लोकसभेतील विद्यमान बलाबल

 • द्रमुक 24
 • तृणमूल काँग्रेस22
 • राष्ट्रवादी काँग्रेस 05
 • समाजवादी पार्टी05
 • आम आदमी पार्टी01
 • माकप03

यशवंत सिन्हा यांच्या नावाने निमंत्रणे

 • तीन वर्षांनी होणारी लोकसभा निवडणूक तसेच पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशसह विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा एकजुटीने मुकाबला करण्यासाठी तिसरी आघाडी उभारण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी माजी अर्थमंत्री व पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी पुढाकार घेतला आहे.
 • पंतप्रधान मोदींंचे कट्टर विरोधक यशवंत सिन्हा यांनी सन २०१८ मध्ये ‘राष्ट्रमंच’ची स्थापना केली. मंगळवारी होणाऱ्या बैठकीसाठी ‘राष्ट्रमंच’च्या वतीनेच सर्व पक्षांना निमंत्रणे धाडण्यात आली आहेत. शरद पवार आणि यशवंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली ही मंगळवारची बैठक होणार आहे.

१५ पक्षांच्या उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह
‘शरद पवार आणि यशवंत सिन्हा हे विद्यमान राष्ट्रीय परिस्थितीवर विचारविनिमय करणार आहेत. या बैठकीस आपली उपस्थिती आणि सहभाग असावा यासाठी यशवंत सिन्हा यांच्याकडून हे अगत्याचे अावतण’ अशा आशयाची निमंत्रण पत्रिका राष्ट्रमंचच्या वतीने विविध राजकीय पक्षांना धाडली गेली अाहे. मात्र नेमके किती पक्ष या बैठकीला हजेरी लावतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे.

सारे काही ममता बॅनर्जींसाठी
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीं यांना दणदणीत यश मिळवून दिल्यानंतर आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून ममतादीदींसाठी समर्थन मिळवण्याचा प्रयत्न म्हणून प्रशांत किशोर प्रयत्न करीत आहेत. बंगालसोबतच तामिळनाडूत द्रमुकला विजयी करण्यासाठी प्रशांत यांनीच रणनीती तयार केली होती.

द्रमुकने अंग काढले
तृणमूलच्या वतीने यशवंत सिन्हा, राष्ट्रीय जनता दल नेते मनोज झा, आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते विवेक तनखा आणि कपिल सिब्बल यांनाही निमंत्रणे धाडण्यात आली आहेत, मात्र सिब्बल यांनी निमंत्रण नाकारल्याचे सांगितले जाते. तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकलाही बैठकीस आवतण दिल मात्र द्रमुकने अंग काढून घेतले आहे.

शिवसेना, काँग्रेसला निमंत्रण नाही
राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातील सहकारी पक्ष शिवसेना आणि काँग्रेस यांना या बैठकीचे निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही. केंद्रात यूपीएचे नेतृत्व शरद पवारांनी करावे, अशी वारंवार मागणी शिवसेनेने केली होती हे उल्लेखनीय. दरम्यान,बैठकीला निमंत्रण नसल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. कुणालाही बैठक बोलावण्याचा लोकशाहीत हक्क आहे, परंतु देशात काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी शक्य नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सांगितले.

आजपासून विरोधकांची मोट बांधण्याचे काम : राष्ट्रवादी
राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मंगळवारी सकाळी ११.३० वाजता होत आहे. दुपारी मोजक्या पक्षांसोबत चर्चा होणार असून त्यानंतर हळूहळू इतर पक्षांना कसे एकत्र आणता येईल त्याबाबतीत हे नेते बसून ठरवणार आहेत. मंगळवारपासून देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम शरद पवार करणार आहेत, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

भाजपविरोधात पवारांची आतापर्यंतची पावले

 • १२ मे - लक्षद्वीप प्रशासनाविरोधात पंतप्रधानांना पत्र
 • २६ मे - दिल्लीतील शेतकरी आंदोलनास ६ महिने पूर्ण झाल्याबद्दल १२ विरोधी पक्षांसह पंतप्रधानांना पत्र
 • ११ जून - प्रशांत किशोर यांच्यासोबत मुंबईत बैठक.
बातम्या आणखी आहेत...